• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - २३

राजकारण-प्रवेशाची पूर्वतयारी

विद्यार्थी असतानाच यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला होता.  मॅट्रिकला पोचेपर्यंतच्या शालेय जीवनातली तीन वर्षे त्यांनी निरनिराळ्या चळवळींच्या निमित्ताने तुरुंगात व्यतीत केली होती.  यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उमेदवारी करण्याचा हा कालखंड तत्पूर्वीच्या साठसत्तर वर्षांच्या तुलनेत खूपच संस्कारक्षम होता.  या काळात अभूतपूर्व वेगाने घटना घडून येत असल्यामुळे अल्पावधीत जे शिकणे नवोदित नेतृत्वाला शक्य झाले होते, ते आधीच्या पिढीला दीर्घकाळ घालवूनही साध्य झाले नव्हते.  यशवंतरावांना याचा बराच लाभ झाला.  वाढदिवसांनी मोजले जाणारे त्यांचे वय जरी लहान असले, तरी त्यांची राजकीय समज मात्र मजल मारून बरीच पुढे गेली.  त्यांचे जिल्हा काँग्रेसमधील नेतृत्व निर्विवादपणे मान्य केले होते.  'मनाने प्रौढ व वयाने लहान असे उमेदीने भरलेले हे तरुण गृहस्थ आमच्या नव्या गटाचे नेतृत्व आत दाखल होताच थोड्याच वर्षांत करू लागले.'  (श्री यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ, ७) अशा शब्दांत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सातारा जिल्हा काँग्रेसमधील यशवंतरावांच्या स्थानाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.  अन्य क्षेत्रात आपण कितीही मोठे असलो, तरी जिल्हा काँग्रेसपुरते चव्हाणांनाच आपले नेते मानीत असू, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे.  

बहुजन-स्तरातून आले असल्यामुळे यशवंतरावांना स्वातंत्र्याचा सकारात्मक आशय पांढरपेशा नेत्यांच्या नकारात्मक स्वातंत्र्य-कल्पनेपेक्षा अधिक भावला होता.  ब्रिटिशांना देशातून हाकलून लावणे हा स्वातंत्र्याचा नकारात्मक किंवा अभावात्मक अर्थ होता, तर सामान्य जनतेच्या जीवनातील क्रांती व आर्थिक बंधमुक्ती, समता, सामाजिक व आर्थिक न्याय व शोषणमुक्ती हा त्याचा सकारात्मक किंवा भावात्मक संदर्भ होता.  १९३० साली गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीद्वारे काँग्रेसचे शहरी मध्यमवर्गीय स्वरूप जाऊन तिला जन-आंदोलनाचे स्वरूप येईल, अशी शक्यता बहुजन समाजाच्या अनेक नेत्यांप्रमाणेच यशवंतरावांसारख्या कार्यकर्त्यालाही जाणवली होती.

तत्पूर्वी काँग्रेसने ग्रामीण जनसामान्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कधीच फारसा केला नव्हता.  यशवंतरावांना ती काँग्रेस चळवळीची मोठीच उणीव वाटायची.  शेतक-यांशी केलेल्या चर्चेतून हा वर्ग काँग्रेस चळवळीत का सहभागी होऊ इच्छित नाही, याची कारणे यशवंतरवांना उमगली होती; आणि हेही त्यांना पक्के समजले होते, की जोपर्यंत ग्रामीण समाज काँग्रेसच्या झेंड्याखाली उभा राहत नाही, तोपर्यंत ती चळवळ वाढण्याची सुतराम शक्यता नाही.  खेड्यापाड्यांत जाऊन लोकजागृतीचे कार्य त्यांनी सुरू केले.  लोकांना चळवळीसंबंधी समजणे ही संप्रेषणाची (कम्युनिकेशन) एक बाजू होती.  तितकीच महत्त्वाची दुसरी बाजू म्हणजे लोकांच्या प्रश्नांना चळवळीने हातांत घेणे.  त्याखेरीज संप्रेषणाची क्रिया प्रभावीपणे घडून येणे अशक्य होते.  पण त्यासाठी आधी लोकांच्या मनात ब्रिटिश सत्तेविषयी असलेले भय आणि धाक घालवणे आवश्यक होते.