यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ६१

नानासाहेब कुंटे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात असा एक मुद्दा मांडला आहे की, आपण राज्यघटना स्वीकारली व तिने संसदीय राज्यपध्दती अमलात आणली. या स्थितीत राज्यपुनर्रचना इत्यादी प्रश्न संसदेच्या पातळीवर हाताळले जाणे अनिवार्य होते. पण मराठी नेत्यांनी संसदेच्या सभासदांपुढे आपली मागणी कशी न्याय्य आहे हे पटवण्याचे पध्दतशीर प्रयत्न कधी केले नाहीत. नुसता महाराष्ट्रात प्रचार करून उपयोग नव्हता. मराठी लोकांना महाराष्ट्र राज्य हवे हे पटलेलेच होते. प्रश्न होता, इतर राज्यांतल्या खासदारांचा. तो हाताळण्यास काहीच स्थान नव्हते. याचा उपयोग होवो वा न होवो, पण हा मार्ग चोखाळण्याची आवश्यकता होती हे निर्विवाद. काकासाहेब गाडगीळ यांनी हाच मुद्दा, औरंगाबादमध्ये भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनातील अनंत काणेकर यांच्या भाषणापासून अनेकांनी केलेल्या भाषणांच्या संदर्भात लिहिताना मांडला आहे. काकासाहेब लिहितात, ‘एक गोष्ट निर्विवाद होती, ती ही की, पश्चिम महाराष्ट्राला महाराष्ट्र हवा होता. मुंबईत काँग्रेसचे बहुमत होते. पण व-हाडात व नागपूरभागात वस्तुस्थिती निराळी होती-एक गोष्ट स्पष्ट होती की, व-हाड, नागपूर महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नव्हते-लोकसभा व राज्यसभा म्हणजे संसदेने हा कायदा पास करून द्विभाषिक अमलात आले आहे. तो बदलून नवा कायदा पास करून ते नष्ट करावयाचे आहे. मुर्दाबाद म्हणून ते मरणार नाही. ५०० सभासद लोकसभेचे आहेत. त्यातील २५१ जणांची मने वळवून हे कार्य करावयाचे आहे. विरोधी पक्ष १५० पेक्षा कमी आहे. शिवाय यांतील सर्व संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल नाहीत-आपण संयम व मर्यादा सांभाळून कार्यभाग साधावयाचा आहे. (पथिक, खंड ३ पृष्ठे ११ व १५)

संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या मागणीचा असा घोळ चालू राहण्याची जबाबदारी काँग्रेसश्रेष्ठींची होती, पण महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांतही एकमत नव्हते. त्यातच शंकरराव देव व हिरे धोरण धरसोडीचे होते. दोघेही वैचारिकरीत्या गोंधळलेले होते हे नाकबूल करून चालणार नाही. या वातावरणात यशवंतरावांनी वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. शंकरराव देव यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र मिळवण्याबाबतचे आपले दोघांचे दृष्टिकोन भिन्न आहेत असे लिहिले होते. तेव्हा उपायही भिन्न होणे क्रमप्राप्त होते. तसे त्यांनी २ डिसेंबर १९५५ रोजी फलटण इथे मनमोहन राजवाड्यात केलेल्या भाषणात जाहीर केले.

यशंवतराव म्हणाले, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी पदरात पाडून घेण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे सर्वाधिकारी श्री. शंकरराव देव यांचे नेतृत्व मान्य करण्यास आपण तयार नाही. शंकरराव यांनी पाच वर्षांपूर्वीच काँग्रेसचे सभासदत्व सोडले होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करू नये असे यशवंतरावांचे मत होते. तेच या भाषणात प्रगट झाले. म्हणून संयुक्त महाराष्ट्र मिळवण्याचे महाराष्ट्र काँग्रेस व शंकरराव यांचे मार्ग भिन्न आहेत असा अभिप्राय त्यांनी दिला. देव यांच्या नेतृत्वासंबंधी यशवंतराव यांनी सांगितले की, मनात एक ठेवायचे व लोकांना दुसरेच सांगायचे हे आता बंद करण्याची वेळ आली आहे. राजीनामे, उपास, निदर्शने, संप हे संयुक्त महाराष्ट्र मिळवण्याचे मार्ग नाहीत. उलट यामुळे मुंबईत नुकतीच जी निदर्शने झाली त्यामुळे मुंबई व महाराष्ट्र यांतील अंतर वाढले आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने शंकरराव देवांनी उपासाची भाषा बंद करावी नाहीतर काँग्रेसच्या वतीने न बोलता बाजूस राहावे. देव व काँग्रेस यांच्यात आपण काँग्रेसचे नेतृत्व मान्य करतो, असा खुलासा यशवंतरावांनी केला. महाराष्ट्राला मुंबई काँग्रेसश्रेष्टींकडूनच मिळवायची आहे. यामुळे वरिष्ठांशी वाटाघाटी करून तडजोडीचा मार्ग काढला पाहिजे. तोच मार्ग श्रेयस्कर आहे. याच भाषणात यशवंतरावांनी स्पष्ट केले की, संयुक्त महाराष्ट्र व पंडित नेहरूंचे नेतृत्व असा प्रश्न आल्यास नेहरूंच्या नेतृत्वावर आपली पूर्वीप्रमाणेच श्रध्दा राहील. नंतर वृत्तपत्रांत यशवंतरावांच्या मुलाखती प्रसिध्द झाल्या व अधिक खुलासे झाले. यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी करताना द्वैभाषिकाचा पर्याय देवांनी आयत्या वेळी आणला आणि दुही पडल्याचे दिसू नये म्हणून आपण त्यास मान्यता दिली, आणि ती देताना हा देवांचा पर्याय असल्यातेही स्पष्ट केले, असे सांगितले.

राजीनामे देण्याच्या प्रश्नावरून मतभेद झाले काय? या प्रश्नाचे उत्तरही यशवंतरावांनी दिले. ते म्हणाले की, २१ नोव्हेंबरला खाजगी बैठकीत शंकरराव यांनी राजीनाम्यास अनुकूलता दाखवल्यामुळे आपण चकित झालो. १७ नोव्हेंबरला झालेल्या ठरावाने नेहरूंशी वाटाघाटी कराव्या असे नमूद होते. यामुळे ही भूमिका नुसती चुकीचीच नव्हे तर नैतिकदृष्ट्या चुकीची होती. जे राजीनामा देतील ते आपले प्रतिनिधी असे देव यांनी आपल्याला सांगितले तेव्हा आपण यास नकार दिला, असे यशवंतराव म्हणाले. देव आपण यांचा काँग्रेस संघटनेबद्दल मतभेद असल्याची माहिती यशवंतराव यांनी दिली. ते म्हणाले की, काँग्रेसनिष्ठा याचा अर्थ काँग्रेसच्या तत्त्वांशी निष्ठा असा देव यांनी अर्थ लावला आहे. यामुळे काँग्रेस संघटनेविषयीच्या निष्ठेला ते कमी लेखतात असे झाले. आम्हांला नुसती काँग्रेसशी निष्ठाच नव्हे, तर काँग्रेस संघटनाही सांभाळायची आहे. कालांतराने महाराष्ट्र काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेसमधून बाहेर पडणे अपरिहार्य होईल अशी कोणतीही पावले पडता कामा नयेत. स्वराज्यप्राप्तीनंतर कोणत्याही कारणास्तव उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यास आपला विरोध असल्याचाही खुलासा यशवंतरावांनी केला.