यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३०

या संबंधात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची आठवण उल्लेखनीय आहे ते लिहितात की, “तीस साली ते स्वत: सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा प्रचार करत होते ३४-३५ च्या सुमारास काँग्रेसच्या नेतृत्वावर परंपरागत राष्ट्रवादी विचारांची छाप होती. पण सामान्य माणसाची सामाजिक व आर्थिक बंधमुक्ती हा खोल आशय बनला पाहिजे, अशी वैचारिक बैठक परंपरावादी राष्ट्रवादाला लाभलेली नव्हती-सातारा जिल्ह्यातील काँग्रेसजनांत असा नवा अर्थ पाहणारा जो नवा लहानसा गट तयार झाला होता, त्यांत माझ्याबरोबर जी विशीच्या आंतबाहेर असलेली तडफदार तरूण मंडळी सामील झाली; त्यांत श्री.यशवंतराव अधिक चमकून दिसू लागले. मनाने प्रौढ व वयाने लहान असे उमेदीने भरलेले हे तरूण गृहस्थ या आमच्या गटाचे नेतृत्व आत दाखल होताच थोड्याच वर्षात करू लागले—

जहाल विचारांच्या या नव्या गटाच्या हाती अनेक वर्षे जिल्हा काँग्रेस कमिटी होती. हे पाहून १९३६ मध्ये काँग्रेसच्या (मध्यवर्तीसुध्दा?) नेत्यांकडून चक्रे फिरवली गेली. उजव्या गटाचे या जिल्ह्यातील प्रमुख भाऊसाहेब सोमण होते. त्यांचे कल्याणशिष्य श्री. बुवा गोसावी यांनी, सातारा जिल्हा कमिटीत उजव्या गटाचे बहुमत केल—थोड्याच मतांनी या क्रांतिवादी गटाच्या हातांतून जिल्हा काँग्रेसची सूत्रे उजव्या गटाच्या हाती गेली. या प्रसंगी डावा गट हलकल्लोळ करील व दंगल माजवील अशी अपेक्षा उजव्या गटाची होती. परंतु वादविवाद वा कसलीही गरमागरमी न होता हे परिवर्तन घडले. ते पाहून श्री. बुवा गोसावी यांनी माझ्यापाशी याबद्दल आश्चर्य प्रगट केले. संघटनेची शिस्त ही राजकारणातील एक पवित्र गोष्ट आहे: याची जाणीव त्या लहान वयातच दाखविण्याचा श्री. चव्हाणांचा हा पहिला प्रसंग होता. समंजसपणा पुष्कळ वेळा जन्मसिध्दच असतो.” (श्री. यशवंतराव चव्हाण, अभिनंदन ग्रंथ, पृष्ठे ७-८.)

संघटनेच्या शिस्तीसंबंधातील यशवंतरावांच्या वृत्तीबद्दल तर्कतीर्थानी लिहिले आहे, याचा प्रत्यय यशवंतरावांच्या राजकीय जीवनात नंतर आला. यामुळे त्यांच्या अनेक राजकीय कृतींचा तसेच अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासंबंधात घेतलेल्या भूमिकेचाही उलगडा होण्यास मदत होऊ शकेल, असे वाटते. मग यशवंतराव १९४१मध्ये सातारा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि पुढे भाऊसाहेब हिरे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा यशवंतरावांची चिटणीस म्हणून नेमणूक झाली. काँग्रेस संघटनेत या पदांपर्यत त्यांनी मजल मारली होती.

यशवंतराव १९३८ साली बी.ए. झाले आणि नोकरी न करता स्वत:च्या पायांवर उभे राहण्याच्या हेतूने, त्यांनी वकिलीचा अभ्यास पुण्यात राहून सुरू केला. मग दोन वर्षांनी ते वकिलीच्या परीक्षेत यशस्वी झाले. तथापि १९३९ मध्ये हिटलरने चेकोस्लोव्हाकियावर स्वारी केली आणि ब्रिटन व फ्रान्स यांनी जर्मनीविरूध्द युध्द पुकारले. ब्रिटनने हिंदी पुढ-यांशी विचारविनिमयन करता, भारतासही युध्दात सामील केल्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीने विरोधी ठराव करून, युध्दहेतू जाहीर करण्याची मागणी केली. त्या काळात कम्युनिस्ट पक्ष, हे साम्राज्यवादी युध्द असल्याचे मानत असल्यामुळे त्याने विरोधी भूमिका घेतली. सातारा जिल्ह्यातल्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्याशी संपर्क ठेवून कम्युनिस्ट पक्षाने आपलाच पक्ष ब्रिटिशांना खरा विरोध करील, काँग्रेस नाही असा प्रचार केला. यास लोक बळी पडू नये यासाठी यशवंतराव खटपटीला लागले. तथापि काँग्रेस प्रत्यक्ष विरोधाचा कोणताच कार्यक्रम लोकांपुढे ठेवला नव्हता यामुळे यशवंतरावांना वाटू लागले की, कम्युनिस्ट प्रचारात काही तथ्य आहे आणि म्हणून ब्रिटिश सरकारशी संघर्ष करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षातही सामील व्हावे की काय, असा विचार ते करू लागले होते. पण सातारा जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्या मित्रमंडळींनी हा विचार खोडून काढला आणि काँग्रेसमध्ये राहण्याचाच निर्णय घेण्यात आला.

यानंतर रॉय यांनी, हे फॅसिझमविरोधी युध्द असून सर्व लोकशाहीवादी शक्तींनी, दोस्त देशांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे; युध्द संपल्यावर ब्रिटनमध्ये राजकीय व सामाजिक परिवर्तन होऊन भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होईल, अशी भूमिका घेतली. यशवंतरावांना युध्दसहकार्याची ही भूमिका पसंत पडली नाही. मग रॉयवादी मित्रांनी त्यांची व रॉय यांची मुंबईत भेट घडवून आणली. या भेटीत रॉय यांनी स्वत:ची भूमिका अगदी मोकळेपणाने आणि युक्तीवादपूर्वक मांडली. यशवंतरावांनी वाद घातला नाही; पण हा आपला मार्ग नसल्याची त्यांची खात्री झाली आणि युध्दविरोधासाठी काँग्रेसनेते जो मार्ग सांगतील तो स्वीकारून काम करायचे, असा निश्चय त्यांनी केला. म्हणजे निरनिराळ्या घराण्यांची गाणी ऐकावी, पण अखेरीस आपल्या घराण्याचीच गायकी टिकवावी, अशातला हा भाग झाला.