यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - २९

१९३५ साली कराडमध्ये, राघूअण्णा लिमये यांनी महाराष्ट्र काँगेस समाजवादी पक्षाचे अधिवेशन भरवण्याचे ठरवले व आपल्याबरोबर यशवंतरावांची चिटणीस म्हणून नेमणूक केली. अधिवेशनाचे अध्यक्ष होते युसुफ मेहरअली यांच्या व्यक्तित्वाचा यशवंतरावांवर परिणाम झाला. या सुमारास कराडमध्ये रॉयवादी मंडळीही आलेली होती व त्यांनी समाजवादी अधिवेशनातील कामकाजाची टिप्पणी केली होती. आत्मरामबापू त्या वेळेपर्यत रॉयवादी बनले होते. तेव्हा आपली काँग्रेस समाजवादी पक्षासंबंधी जी परिस्थिती झाली तशी तुमची होऊन देऊ नका, असा सावधगिरीचा इशारा यशवंतराव यांनी त्यांना दिला होता. काँग्रेस संघटनेत राहून आपल्याला काम करायचे आहे. त्याच्याशी सुसंगत असे रॉयवाद्यांकडे जे असेल ते घ्यावे, पण जनतेपासून दूर जाता कामा नये असेही त्यांनी सांगितले. यासंबंधात रॉयवाद्यांशी यशवंतरावांची चर्चा झाली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ह. रा. महाजनी, वामनराव कुळकर्णी या रॉयवाद्यांशी बोलताना यशवंतरावांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या काळात यशवंतरावांना रॉय यांचे काही साहित्य वाचायला मिळाले होते. रॉय यांच्या विचारांचे सूत्र असे की, भारताच्या स्वातंत्र्याची लढाई ही समाजवादी क्रांतीच्या पूर्वीची लोकशाही क्रांती असेल. ही क्रांतीची लढाई करताना कामगार व शेतकरी यांनी एकत्र येऊन सामर्थ्य प्राप्त करून घेतले पाहिजे. या देशातील छोट्या शेतक-यांना लढ्यात सामील करून घेणे आवश्यक आहे. हे ऐतिहासिक कार्य काँग्रेस करू शकेल आणि तिला या प्रकारे क्रांतिप्रवण करणे हे पुरोगामी विचारांच्या लोकांचे कर्तव्य आहे, असे रॉय यांचे विचार होते. ते आणि रॉय यांची विचार करण्याची पध्दती यांचा आपल्यावर परिणाम झाला अशी कबुली यशवंतराव देताना दिसतात. यशवंतराव यांनी रॉय यांची पुण्यात झालेली तीन व्याख्यानेही ऐकली. मग १९३९ सालच्या मे-मध्ये सातारा जिल्ह्यात राजकीय परिषद घेतली व रॉय यांना पाहुणे म्हणून बोलावले. ही परिषद तासगावला झाली. रॉय यांना आमंत्रित केल्यामुळे काही गट नाराज झाले. आत्मारामबापू हे रॉय यांना आमंत्रण देणारांत होते, म्हणून त्यांचे विरोधक नाना पाटील संतप्त झाले व त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी उघडपणे विरोध केला. शेवटी ही परिषद उधळून लावण्यात आली. ती भरवण्यात यशवंतराव सहभागी असले तरी काँग्रेसच्या नेतृत्वाविरूध्द रॉयवादी जाणार असतील, तर आपण काँग्रेस नेत्यांबरोबर राहिले याबद्दल यशवंतरावांच्या मनात कसलाही संदेश नव्हता.

यशवंतराव ज्यूनियर बी. ए. च्या वर्गात असताना १९३५ च्या सुधारणा कायद्याखाली मुंबई विधिमंडळाची निवडणूक जाहीर झाली होती. त्या आधी केद्रीय विधिमंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसने काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे यांना उभे केले होते आणि दोघेही चांगल्या मतसंख्येने निवडून आले. प्रांतिक विधीमंडळाच्या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातून कोणाला उभे करायचे याची चर्चा काँग्रेसजनात होऊ लागली होती. यशवंतराव व त्यांचे मित्र यांची एक बैठक झाली. असहकार आंदोलनात ग्रामीण भागातला फार मोठा समाज सामील झाला होता व यांत तरूणांचा सहभाग होता. तेव्हा या समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नेहमीच्या उमेदवारांच्यात निदान एका नव्या उमेदवाराचा समावेश व्हावा आणि हा उमेदवार म्हणजे आत्मारामबापू पाटील हे असावेत असे ठरले. या संबंधात यशवंतराव व त्यांचे सहकारी यांनी, सातारा जिल्ह्यातल्या जुन्या पुढा-यांपुढे आपली बाजू मांडली. काहींनी घाई न करण्याचा सल्ला दिला तर काहींनी आत्मारामबापू हे मराठा समाजाचे खरेच प्रतिनिधित्व करतील काय, अशी शंका उपस्थित करून, जुन्या ब्राह्मणेतर पक्षातला एखादा मातबर मराठा उमेदवार यशस्वी होऊ शकेल असे सांगितले.

हे प्रकरण प्रांतिक काँग्रेसकडे गेल्यावर अनुकूल मत पडले नाही तेव्हा यशवंतराव व त्यांच्या मित्रांनी, मुंबईत सरदार पटेल येणात होते तेव्हा त्यांना भेटण्याचा बेत केला आणि यशवंतरावांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्याप्रमाणे ते मुंबईला गेले आणि सुदैवाने यशवंतरावांची सरदारांशी भेट झाली. त्यांनी दोन-तीन महत्वाचे प्रश्न विचारले. त्यांना उत्तरे देऊन यशवंतरावांनी सरदारांना सातारा जिल्ह्यातील परिस्थिती थोडक्यात सांगितली. मग सरदार पटेल यांनी विचारले, की हा शेतक-यांचा प्रतिनिधी निवडणुकीत पडला तर जबाबदारी कोण घेणार ? ‘आम्ही जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते घेऊ’ असे उत्तर यशवंतरावांनी दिले. नंतर काही दिवसांत आत्मारामबापू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. त्यांची निवडणूक या तरूण कार्यकर्त्यानी हिरिरीने लढवली आणि आत्माराम बापू यांना सर्वाधिक मते मिळवून विजयी करण्यात यश मिळवले. यशवंतरावांचे राजकारणातले हे मोठे प्रगतीपर पाऊल होते.