यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १०६

तरुण तुर्क दिवसेंदिवस अधिकच आक्रमक पवित्रा घेऊ लागले होते. त्यांचा रोख उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यावर होता आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलच चंद्रशेखर यांनी लोकसभेत बोलताना संशय व्यक्त केल्यामुळे वादळ निर्माण झाले आणि संसदीय काँग्रेस पक्षाने चंद्रशेखर यांना समज देण्याचा अधिकार इंदिरा गांधींना दिला. पण त्यांनी तो बजावला नाही. काँग्रेसमधील तणाव फरिदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अधिकच वाढला. निजलिंगप्पा यांनी या अधिवेशनात केलेल्या अध्यक्षीय भाषणात इंदिरा सरकारच्या आर्थिक धोरणावर टीकास्त्र सोडले. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तोट्यात असल्याबद्दल या भाषणात टीका होती. तेव्हा त्यांच्याविरुद्ध अविश्वास व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला. मात्र निजलिंगप्पा यांनी अध्यक्षीय भाषण हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही, असे सांगून हा प्रयत्न बाद केला. तथापि इंदिरागांधींनी आपल्या सरकारच्या आर्थिक धोरणाचे समर्थन करताना सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग नफ्यासाठी चालवले जात नाहीत तर आर्थिक स्वयंपूर्णता आणि देशाचे राजकीय व आर्थिक हितसंबंध यांच्या रक्षणासाठी चालवण्यात येतात, असे उत्तर दिले. त्याचे जोरदार स्वागत झाले. निजलिंगप्पा यांनी चुकीच्या मुद्यावर विरोध करून स्वतःची फजिती करून घेतली.

वरिष्ठ काँग्रेस नेत्यांत या प्रकारे तणाव वाढत जात असताना आणि एकमेकांबद्दल कमालीचे संशयाचे वातावरण निर्माण झाले असताना, विद्वान व शिक्षणतज्ञ राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन झाले. यामुळे नवा राष्ट्रपती निवडण्याची वेळ आली. तसे पाहिल्यास ही एक वादाची बाब होण्याचे कारण नव्हते. पण या वेळेला ती झाली. या वेळच्या घडामोडीसबंधात बरेच लिहिले गेले आहे. यशवंतराव यांनी इंदिरा गांधींच्या बरोबर व्हि. व्हि. गिरी यांना राष्ट्रपती करण्याच्या बाजूने मतदान केले नाही आणि कामराज व मोरारजी यांच्याप्रमाणे संजीव रेड्डी यांना पाठिंबा दिला. म्हणून एकीकडून विश्वासघाताचा तर नंतर यशवंतरावांनी इंदिरा गांधीबरोबर जाण्याचा मार्ग पत्करला म्हणून कोलांटीउडी मारल्याचा आरोप करण्यात आला आणि स्वतःचे मंत्रिपद टिकवण्यासाठी हे केले, अशी टीका होत आली आहे.

राष्ट्रपतिपदासाठी प्रथम जगजीवन राम यांचे नाव पुढे आले होते व नंतर ते मागे पडले. याबद्दल एका वार्ताहाराने जगजीवनबाबूंनाच विचारले असता, त्यांनी उत्तर दिले की, याबद्दल बोलायचे तर आपले मित्र यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेबद्दल बोलायला लागेल आणि त्यास आपली तयारी नाही. या संबंधी यशवंतरावांना खुलासा विचारला तेव्हा ते म्हणाले की, मी पूर्वी मित्र नव्हतो आता तो झालेला दिसतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की, या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासंबंधी इंदिरा गांधी त्या वेळी आपली भूमिका सतत बदलत होत्या. जगजीवन राम यांचे नाव आपल नव्हे, तर इंदिरा गांधींनीच प्रथम जाहीरपणे सुचवले होते. वृत्तपत्रांत हे प्रसिद्ध झालेले दिसेल अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

या प्रश्नाचे नंतर कोणते वळण घेतले ते यशवंतरावांनी नोंदून ठेवले होते. त्यांच्या निधनानंतर १२ जुलै १९९२ रोजी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये मी ते प्रसिद्ध केले. त्याची रूपरेषा अशी, गिरी यांची उमेदवारी पहिल्यापासूनच त्यांना पसंत नव्हती. उमेदवारीबद्दल अनेक जण अनेक पातळ्यांवर बोलत, चर्चा करत असत. एक दिवस इंदिरा गांधींनी आपल्याला बोलावले आणि त्यांनी काय करावे, असा प्रश्न विचारला. आपण अजून या प्रश्नाचा गंभीरपणे विचार केलेला नाही. तरीही एका गोष्टीबद्दल आपले मत स्वच्छ आहे आणि ते म्हणजे उपराष्ट्रपती गिरी यांना उमेदवार निवडू नये असे यशवंतरावांनी सांगितले. असे कां? असा हा दुसरा प्रश्न इंदिरा गांधींनी विचारला. तेव्हा आपण सांगितले की, उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने आपण त्यांची कार्यपद्धती पाहिली असून ती आपल्याला आवडली नाही. व्यक्ती म्हणून ते भले आहेत, वृद्ध आहेत आणि नावाजलेले आहेत, पण आपण त्यांच्या बाजूचे नाही. इंदिरा गांधी यांचाही असा कल असल्याची आपली समजूत झाली, असे यशवंतरावांनी म्हटले आहे.

यानंतर सेठ गोविंद दास यांचे एक पत्रक वृत्तपत्रांत आलेले वाचले. त्यांनी जगजीवन राम यांचे नाव सुचवले होते आणि महात्मा गांधींच्या शताब्दीचे हे वर्ष असल्यामुळे, एका हरिजन पुढा-याला राष्ट्रपती करणे उचित होईल असेही म्हटले. आपल्याला ही सूचना पसंत पडली. दुस-या दिवशी के. के. शहा आपल्याला भेटले. त्यांनी या सूचनेचा उल्लेख केला आणि ही सूचना चांगली असल्याचे ते म्हणाले. यावर पंतप्रधानांशी या संबंधी बोलण्याची सूचना आपण केली असे यशवंतराव म्हणाले. नंतर जेव्हा पंतप्रधानांनी इतर काही शासकीय कामासाठी बोलावले तेव्हा ते काम संपल्यावर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा विषय निघाला. त्यावर के. के. शहा यांच्याशी आपले बोलणे झाले होते व तुमच्याशी चर्चा करण्यास आपण सांगितल्याची माहिती दिली. तेव्हा बाबूजींचे नाव मान्य नाही, असे उत्तर इंदिरा गांधींनी दिले. असे कां? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, काँग्रेस कार्यकारिणीतील आपली बाजू हलकी होईल. त्या बाबूजी या व्यक्तीसंबंधी काही विरोधी बोलल्या नाहीत.