• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ७८

याच भाषणात यशवंतरावांनी स्पष्ट केले की, ‘आम्हांला सत्तेचे विकेंद्रीकरण करायचे आहे, सत्तेचे विसर्जन नाही. हीच गोष्ट अगदी साध्या शब्दांत सांगावयाची तर असे म्हणता येईल की, जिच्यामुळे खुर्दा निर्माण होईल अशा त-हेने आम्हांला सत्तेची वाटणी करायची नाही. कारण आम्हांला ज्या जबाबदा-या वाढवावयाच्या आहेत त्यांतील राज्य चालले पाहिजे ही मुख्य जबाबदारी आहे.’ सत्तेचे इतके विकेंद्रीकरण करायचे की केंद्राकडे वा राज्याकडे काही सत्ताच राहणार नाही, अशा प्रकारचे विचार काही गांधीवादी म्हणवणारे आजकाल करत असतात. राजकीय पक्ष विसर्जित करून पक्षविरहित लोकशाही स्थापन करण्याचीही कल्पना हीच मंडळी मांडत असतात. कोणत्या तरी काल्पनिक भूतकाळात असा समाज असल्याची त्यांची समजूत आहे आणि तसाच काल्पनिक भविष्यकाळ निर्माण करण्याचा भूलभुलैया ते निर्माण करू पाहतात. त्यांना यशवंतरावांच्या या भाषणात उत्तर मिळू शकेल. नव्या राज्याच्या स्थापनेनंतर हिवाळा आला व विधानसभेचे अधिवेशन नागपूरला भरले. याच अधिवेशनाच्या वेळी, म्हणजे २२ डिसेंबर १९६० रोजी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना यशवंतरावांच्या हस्ते झाली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना मंडळाचे अध्यक्ष निवडले गेले. उद्घाटन करताना यशवंतरावांनी प्रारंभीच स्पष्ट केले की, सरकारने हे मंडळ स्थापन केले असले तरी त्याच्यावर सरकारचे बंधन नाही. त्यानंतर ते म्हणाले, भौतिकदृष्ट्या जगात जे जे शास्त्र उंचावले आहे त्या त्या शास्त्रातील ज्ञान आपल्यात उतरविण्याचे सामर्थ्य मराठी भाषेला प्राप्त झाले पाहिजे-ज्ञानाच्या सरोवराचे पाट आपण लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचविले पाहिजेत. मग यशवंतरावांनी मराठी इतिहासाचे नव्याने लेखन होण्याची निकड प्रतिपादन केली. विदर्भ आणि मराठवाड्यात इतिहासाची जुनी साधने विखुरली आहेत, ती जमविण्याचे काम मंडळाने करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण केवळ भूतकालाचे उत्खनन करून तितकेच ज्ञान लोकांपुढे न आणता वर्तमान काळाकडे लक्ष द्यावे आणि भविष्यकाळाकडे नजर ठेवून आम्हांला मदत करावी, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. मंडळाने नंतर विश्वकोशाची योजना मांडली ती, ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी. साहित्य संस्कृती मंडळाने अनेक उत्तम ग्रंथ प्रसिद्ध केले वा प्रसिद्ध करण्याकरिता हातभार लावला. विश्वकोशामुळे अनेक प्रकारचे शास्त्रीय ज्ञान मराठीत येण्यास मदत झाली. मंडळाचा पसारा नंतर वाढत गेला. प्रारंभीच्या काळात त्याचे सभासद थोडे होते, पण कालांतराने प्रादेशिकतेची कसोटी लावली जाऊ लागली आणि सभासदांची संख्या वाढत गेली, यामुळे जे व्हायचे तेच झाले. मंडळाच्या कार्याचे परीक्षण करण्याचे इथे प्रयोजन नाही.

अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर विविध उपक्रम सुरू झाले आणि त्यात स्वतः यशवंतराव लक्ष घालत होते. राज्यभर उत्साह व अपेक्षा निर्माण झाल्या व वाढत गेल्या. काहीतरी नवे घडत आहे याची जाणीव निर्माण झाली;

नव्या जीवनाचा नाद
मला ऐकू येत आहे
लक्ष शून्यातून
काही श्रेय आकारत आहे

अशी दाद कुसुमाग्रजांनी दिली.

ग. दि. माडगूळकर यांनी कविता लिहिली :

कोटि मुखांनी आशिर्वच दे महाराष्ट्र माता
औक्षवंत व्हा, विजयवंत व्हा, प्रियतम यशवंता !

तुमच्या लेखीं नगरी नगरी देवराष्ट्र होई
घराघरांतुन उभ्या ठाकल्या वरद विठाबाई

‘स्वस्ति’ वांछितो जनपुरुषोत्तम, उंचावून शतां-
सह्याद्रीच्या शिखरी उठती स्वायंभव नाद
सातपुड्याच्या कड्यांत घुमती त्याचे पडसाद
‘अजातशत्रू’, आज लाभला आम्हां राष्ट्रनेता !
शिवस्मृतीची शाल अर्पिती, लोक लोकमान्यां,
टिळकपणाचा टिळक लाविती तुम्हां नागकन्या

प्रतिपदच्चंद्रापरी वाढु द्या अशिच यशोगाथा-
लोकशाहिचे तुम्ही पेशवे, सेवेचे स्वामी
तुमच्या मागें राहो जनता नित्य पुरोगामी
समर्थ होवो महाराष्ट्र हा, भारत-भूमि-त्राता