अखेरीस संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर होऊन, महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची स्थापना १ मे १९६० या दिवशी होणार असल्याचे जाहीर झाले. या समारंभाच्या आधी २७ एप्रिल या शिवजन्माच्या मुहूर्तावर, यशवंतरावांच्या हस्ते बालशिवाजी व मातोश्री जिजाई यांच्या पुतळ्याचे अनावरण शिवनेरीवर झाले. या प्रसंगी यशवंतरावांनी यथोचित शब्दांत महाराजांचा गौरव करताना त्यांच्या लोकाभिमुख कारभाराची व दूरदृष्टीची उदाहरणे दिली. नवा महाराष्ट्र घडत असताना शिवाजी महाराजांच्या स्मृतीला व मूर्तीला प्रणाम करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, यशवंतरावांनी नव्या कर्तृत्वाचे दालन उघडले असून महाराष्ट्रातल्या बुद्धिमंत व कर्तृत्ववान लोकांना आवाहन देणारा काळ आल्याची जाणीव करून दिली. तसेच महाराष्ट्राबद्दल बोलत असताना आपण देशाच्या भवितव्याबरोबर महाराष्ट्राचे भवितव्य जोडले गेल्याचे विसरून चालणार नाही, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. या भाषणात त्यांनी आर्थिक विकासाबरोबर सामाजिक विकासाचे महत्त्व प्रतिपादन केले आणि या नंतरच्या यशवंतरावांच्या अनेक भाषणांचे मुख्य सूत्र हेच राहिले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सोहळा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या समारंभपूर्वक पार पडला. सभेला अलोट गर्दी होती आणि लोकांच्या उत्साहाला व आनंदाला उधाण आले होते. शुभेच्छा देताना नेहरूंनी विदर्भाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिपादून, विकासाच्या कामास वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यशवंतरावांनी महाराष्ट्रातर्फे व स्वतःतर्फे पंतप्रधानांचे आभार मानताना विकासाचे कार्य सर्व ताकदीसह करण्याची हमी दिली. त्याच संदर्भात यशवंतराव म्हणाले, “आम्ही आज त्यांना परत आश्वासन देतो की, महाराष्ट्राचे हे जे राज्य निर्माण झाले आहे ते मराठी जनतेच्या कल्याणाचे काम तर करीलच, शिवाय मराठी भाषिकांच्या जवळ जे देण्यासारखे आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे चांगले आहे, जे उदात्त आहे, त्याचा त्याग जर करावयाचा असेल तर तो आम्ही भारतासाठी प्रथम करू, कारण आमचा हा पहिल्यापासून विश्वास आहे की, भारत राहिला तर महाराष्ट्र राहिल, भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल.” या समारंभानंतर नव्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्या प्रसंगी यशवंतरावांनी सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या धोरणाच्या निदर्शक अशी, सरकारच्या काही खात्यांची नावे बदलली असल्याचे जाहीर करून राज्याच्या सर्व विभागांच्या विकासाची दृष्टी ठेवली जाईल असे घोषित केले. यापुढे कारभारात मराठीचा वापर करण्यासाठी भाषासंचालनालय स्थापन करण्याचा निर्णयही त्यांनी घोषित केला. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांनी धर्मांतर करून बौद्ध झालेल्यांना, हरिजनांप्रमाणे सर्व सवलती चालू राहतील असेही जाहीर केले. हे एक लक्षणीय पाऊल होते.
याच दिशेने त्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वीच पाऊल टाकले होते. ते म्हणजे महार वतनाची समाप्ती. द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री असताना, म्हणजे १९५८ साली महार वतने नष्ट करण्याचे विधेयक आणून ते संमत करून घेतले. महार वतन ही एक गुलामी वा वेठबिगार होती. ब्रिटिश राज्यात ही पद्धती सुरू झाली. तीनुसार महार जमातीच्या लोकांना वतनी जमीन द्यायची आणि तिच्या बदल्यात वाटेल ते व तितके काम करून घ्यायचे. काम कोणीही सांगावे. ज्यास वतन दिले असेल तोच नव्हे, तर त्याच्या घरातल्या कोणालाही वेठीला धरले जात होते. थंडी, वारा, ऊन, पाऊस अशा कोणत्याही अवस्थेत व कोणत्याही वेळी काम सांगितले जात असे, त्याला वतन म्हणून दिलेली जमीन कसदार नसे व मोठीही नसे. महार गावकामगार हा सरकार व लोक यांचा नोकर होता. ही गुलामी नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२२ व ३७ साली मुंबईच्या विधिमंडळात विधेयके आणली. पण ती तेव्हा संमत झाली नाहीत. यशवंतरावांनी द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री म्हणून बाबासाहेबांची ही एक इच्छा पुरी केली होती. तेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतरही पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांच्या सवलती चालू ठेवण्यात त्यांनी पुढाकार घ्यावा हे साहजिक होते. या सवलती देण्याचा प्रश्न नंतरच्या काँग्रेस कार्यकारिणीत आला असता, यशवंतरावांनी त्याचे समर्थन केले आणि कामराज प्रभृतींचा विरोध दूर करण्यात यश मिळवले, हे फारसे कोठे नमूद झालेले दिसले नाही. अस्पृश्य तसेच या समाजातून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेले नवबौद्ध यांना, राज्यातील पडीक जमिनीपैकी काही जमीन मिळावी यासाठी दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न चालू होते. यशवंतरावांनी या संबंधात सहानुभूतीची भूमिका घेऊन हा प्रश्न हाताळला.