• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ६३

एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन, पंडित पंत द्वैभाषिक राज्य स्थापन केल्यास मुंबई व महाराष्ट्रातले वातावरण निवळेल या निष्कर्षास आले. त्यांनी या संबंधात नेहरू, आझाद, ढेबर इत्यादींशी चर्चा केली. मोरारजी हा पर्याय मान्य करत नव्हते, पण द्वैभाषिक आणण्याचा निर्णय काँग्रेसश्रेष्ठी घेणार असल्यास आपण आड येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुजरातचे मन पर्यायाच्या बाजूने वळवणे आपल्या आटोक्याच्या बाहेरचे असल्याची कल्पनाही त्यांनी दिली. लालबहादूर शास्त्री यांनी देवगिरीकर, गाडगीळ व यशवंतराव यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली तेव्हा या तिघांनीही महाराष्ट्राची बाजू मांडली. दरम्यान द्वैभाषिकासंबंधी काँग्रेसश्रेष्ठींचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी राज्यपुनर्रचनेच्या संबंधात, आयोगाने सुचवलेल्या योजनेप्रमाणे तयार झालेले विधेयक मुंबई विधिमंळात आले. त्यात त्रिराज्य निर्माण करण्याची तरतूद होती. यशवंतरावांनी २८ मार्च १९५६ रोजी या विधेयकावर एक मंत्री या नात्याने भाषण केले. त्यावरून असे दिसेल की, त्रिराज्य योजना त्यांना पसंत नव्हती आणि महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावे याची आच होती. पण महाराष्ट्र राज्य निर्माण करायचे ते काँग्रेस संघटनेच्या मार्फत अशी त्यांची धारणा होती. आपल्या मनातील हे द्वंद्व त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे. यशवंतराव यांनी सांगितले की, आर्थिक व सामाजिक समता या दोन प्रकारच्या आकांक्षा स्वातंत्र्यानंतर निर्माण झाल्या. राज्यपुनर्रचनाही या आकांक्षा पु-या करण्याच्या उद्देशानेच हाती घ्यायला हवी. म्हणूनच लोकांच्या भाषेतून राज्यकारभार व्हायला हवा. केंद्र सरकारले पाठवलेल्या विधेयकाची तपासणी केली तर किती ठिकाणी हे भाषिक राज्याचे तत्त्व लागू करण्यात आले हे समजून येईल. हे तत्त्व कोठे लागू केले व कोठे केले नाही, याच्या तपशिलात जाऊन विचार केल्यास मतभेद निर्माण होऊ शकतात.

केंद्र सरकारने केलेल्या विधेयकाने कर्नाटकास जे पाहिजे ते शंभर टक्क्यांहून अधिक मिळाले आहे, गुजरातलाही जे पाहिजे ते मिळाले. महाराष्ट्र राज्य निर्माण करताना जो अपुरेपणा राहिला आहे त्याबद्दल दु:ख आहे. विदर्भासह महाराष्ट्र निर्माण होत आहे हा आनंदाचा भाग झाला. मराठवाडाही महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहे. पण मुंबई महाराष्ट्रात न घातल्यामुळे आपल्यालाही दु:ख झाले आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि भूगोलानेच ते दाखवून दिले आहे. मुंबईबाबत एक विभागीय समिती महाराष्ट्राच्या मंडळात नेमून प्रश्न सोडवता आला असता. महाराष्ट्राचा प्रश्न सोडवण्याच्या उपायांबद्दल मात्र आपला विरोधी पक्षांशी मतभेद असल्याचे सांगताना, यशवंतरावांनी आपली निष्ठा काँग्रेस पक्षाशी असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. नंतर १६ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारवर अविश्वास व्यक्त करणारा ठराव, विरेधी पक्षांनी विधिमंडळात आणला असता यशवंतरावांचे भाषण झाले. त्यांनी प्रथमच स्पष्ट केले की या प्रकारचा ठराव आणण्याचा विरोधी पक्षास अधिकार आहे. इतके सांगितल्यावर यशवंतरावांनी एस. एस. जोशी यांना आवाहन केले, की ते कोणत्या मार्गाने जात आहेत याचा त्यांनी विचार करावा. राष्ट्रप्रेमाचे धडे ते गेली वीसपंचवीस वर्षे महाराष्ट्रात एका पिढीला देत आले त्या पिढीतील आपण एक आहोत. पण आज तुम्ही लोकांच्या मनातील असंतोषाच्या भावना तीव्र ठेवण्याच्या हेतूने चर्चा करीत असून राष्ट्रसेवा करत नाही.

एकभाषी राज्याचे आपणही पुरस्कर्ते आहोत, पण कोणत्या टोकापर्यत जायचे याला काही मर्यादा आहेत. एकदा लोकसभेने एखाद्या प्रश्नासंबंधी निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच प्रश्नासंबंधी शेंडी तुटो अगर पारंबी तुटो, आमचे म्हणणे मान्य झालेच पाहिजे असा आग्रह धरणे योग्य नाही. पक्षनिष्ठेला राजकीय जीवनात फार महत्त्व आहे. पक्ष म्हटला की त्याला एक प्रकारची शिस्त असली पाहिजे व राजकीय प्रश्न सोडवताना त्यांनी ती पाळली पाहिजे. ती जर पाळता आली नाही, तर पक्षाची जरूरी काय? असा यशवंतरावांचा प्रश्न होता. समाजवादी निष्ठा असलेल्या एस. एम. जोशी यांनी भाषावादात फार गुंतून राहू नये, अशी यशवंतरावांनी अखेरीस विनंती केली.

अमृतसरमध्ये जी बोलणी झाली ती द्वैभाषिक आणण्याच्या दृष्टिने अनुकूल असल्याची चाहूल मराठी नेत्यांना लागली; आणि अमृतसरहून परत आल्यावर यशवंतराव यांनी, सांगली इथे वसंतदादांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभेत भाषण करून अमृतसर काँग्रेसचा संदेश तर सांगितलाच, शिवाय महाराष्ट्र राज्यासंबंधीची आपली भूमिकाही स्पष्ट केली. यशवंतरावांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘आपण संयुक्त महाराष्ट्राच्या विरूध्द नाही. तर चळवळीचे विरोधक आहोत. काँग्रेसबाहेर या आणि संघर्ष करा हे आवाहन आपल्याला मान्य नाही. संघर्ष करून मुंबई मिळणार नाही. मुंबईचा प्रश्न सुटेल याची खात्री असू द्या, त्याचे वेळापत्रक मात्र आपल्यापाशी नाही. यशवंराव नंतर म्हणाले की, आपल्याविरूध्द बराच अपप्रचार झाला आहे. पण त्यामुळे आपण डगमगणार नाही. आपण पंचवीस वर्षे राजकारणात काढली असून पालापाचोळ्याप्रमाणे उडून जाणार नाही. गांधी-नेहरूंना आपण मोठे मानले म्हणून जे टीका करतात, त्यांना विचारले पाहिजे की, गांधी-नेहरूंना मोठे मानयचे नाही तर कोणाला? ज्यांनी स्वत: झिजून स्वातंत्र्य आणले त्यांना मोठे म्हटले मला सूर्याजी पिसाळ म्हणण्यात आले. मी सूर्याजी पिसाळ असेन तर शिवाजी कोण आणि औरंगजेब कोण? संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबद्दल माझा वाद नाही, तर ती मागणी मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा, त्याबद्दल आहे. सर्व देशाचे भले होण्याबरोबरच महाराष्ट्राचे भले होणार आहे याचा विसर पडता कामा नये’ यशवंतरावांनी याच धर्तीवर अनेक ठिकाणी मग भाषणे केली. सातारा-सांगली या भागांत काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली.