• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ६२

फलटणच्या भाषणानंतर सर्व बाजूंनी टीकेचा वर्षाव होत होता आणि महाराष्ट्रद्रोहापासून अनेक आरोप केले गेले यशवंतरावांनी हा मुद्दा अधिक विस्ताराने त्या भाषणातच मांडला असता तर बरे झाले असते. त्यांना भाषिक राज्य हवे होते आणि मुंबईवर महाराष्ट्राचा हक्क आहे असेच ते मानत होते. पण हे उद्दिष्ट साध्य कसे करायचे हा त्यांच्या दृष्टीने विवाद्य मुद्दा होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट काँग्रेससंघटनेत राहून व काँग्रेसश्रेष्ठींशी वाटाघाटी करूनच साध्य करायचे; ही संघटना दुर्बळ करून नव्हे याबद्दल ते ठाम होते. कारण देशव्यापी असा पक्ष केवळ काँग्रेस हाच होता आणि त्या पक्षाचे एकमेव नेते पंडित जवाहरलाल नेहरू होते, हेही निर्विवाद होते. या नेतृत्वामुळे काँग्रेस टिकेल आणि ती टिकेल तर नव्याने स्वतंत्र झालेला आपला देश टिकेल; म्हणून नेहरूंच्या नेतृत्वास यशवंतरावांनी इतके प्राधान्य दिले. महाराष्ट्राचा विचार हा सबंध देशाच्या संदर्भात करण्याची ही दृष्टी होती. आजही यशवंतरावांच्या त्या विधानाचा संदर्भ व अर्थ लक्षात घेण्याची काळजी न घेता, अनेक राजकीय भाष्यकार टीका करत असताना दिसतात. आपण जे बोललो त्या मागची कल्पना काय होती, याची फोड यशवंतरावांनी जयंतलेले यांना दिलेल्या मुलाखतीत केली. ते म्हणाले की, नेहरू व महाराष्ट्र यांत मी नेहरू पसंत करीन असे बोललो तेव्हा नेहरूंचे नेतृत्व हेच आपल्या मनात होते. हा व्यक्तीचा प्रश्न नव्हता तर नेतृत्वाचा होता. नेहरूंचे धोरण, कार्यक्रम, दृष्टिकोन हे सर्व अभिप्रेत होते. नेहरू हे भारताशी एकरूप झालेले नेते होते आणि त्याचाच मी पुरस्कार करत होतो.

आंध्रमधील भाषिक राज्याच्या चळवळीत कम्युनिस्ट पक्षाने पुढाकार घेतला होता. प्रत्येक भाषिक गट हे एक वेगळे राष्ट्र आहे, ही भूमिका त्या पक्षाने मांडली होती. यामुळे नेहरू अस्वस्थ होते. महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्ष चळवळीचे नेतृत्व करू लागला तर अनर्थ ओढवेल अशी त्यांना धास्ती होती. या प्रकारचा धोका यशवंतरावांनाही वाटू लागला होता. त्यातच काँग्रेसनिष्ठा म्हणजे पक्षनिष्ठा नसून काँग्रेसच्या तत्त्वांवर निष्ठा, असे समीकरण शंकरराव देव यांनी मांडले होते. यामुळे काँग्रेस पक्षच नष्ट होण्याचा धोका यशवंतरावांना दिसला. म्हणून मराठी काँग्रेसजनांनी काँग्रेसमध्ये राहून व नेहरूंचे नेतृत्व मानून आपले उद्दिष्ट साध्य केले पाहिजे, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

यशवंतरावांच्या फलटणच्या या भाषणामुळे त्या वेळी दिल्लीत दाखल झालेल्या शंकररावांच्या नेतृत्वाला खरा धक्का बसला आणि काँग्रेसश्रेष्ठींशी वाटाघाटी करताना त्यांच्या शब्दाला काही वजन राहणार नाही, हेही उघड झाले. या पाठोपाठ संसदेत राज्यपुनर्रचना अहवालावर चर्चा झाली तेव्हा लोकसभेत काकासाहेब गाडगीळ आणि राज्यसभेत देवगिरीकर यांनी अहवालाची चिरफाड केली आणि काकासाहेबांनी तर, महाराष्ट्राची न्याय्य मागणी डावलली तर लोक रस्त्यावर येतील असा इशारा दिला. लोक रस्त्यावर यापूर्वीच आले होते आणि यापुढे अधिक रणकंदन होणार अशी चिन्हे स्पष्ट दिसत होती. संसदेतील चर्चेचा सूर पाहून गृहमंत्री पंत यांनी मोरारजी, देव व गाडगीळ यांनी एकत्र बसून चर्चा करण्याची सूचना केली. अशी चर्चा होण्यापूर्वी मुंबई महापालिकेच्या बैठकीत प्रजासमाजवादी पक्षाचे सदस्य प्रा. राम जोशी यांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याचा ठराव आणला, त्यास मुंबईतील काँग्रेसचे सभासद डॉ. नरवणे, महाशब्दे इत्यादींनी पाठिंबा दिला आणि ठराव संमत झाला. यामुळे स. का. पाटील यांच्या नेतृत्वाला शह मिळाला. परिणामत: पाटील यांनी या काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून दूर केले. पण मुंबईची काँग्रेची संघटना आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही, या पाटील यांच्या विश्वासास तडा गेला.

गोविंदवल्लभ पंत यांच्या सूचनेप्रमाणे मोरारजी व देव यांची भेट झाली, पण पाच वर्षांनी गुजरातने वेगळे व्हावे ही अट मान्य करण्यास मोरारजी तयार नव्हते. नंतर नेहरू मुंबईत आले असताना त्यांची व मोरारजीभाईंची बोलणी झाली. तथापि देवांनी पुनरूज्जीवित केलेल्या द्वैभाषिकाची योजना येण्याची लक्षणे दिसत नव्हती. तेवढ्यात नेहरूंनी केंद्रिय मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणून मुंबई केंद्रशासित करण्याचे १६ जानेवारी १९५६ रोजी जाहीर केले. यामुळे मुंबई व महाराष्ट्रात असंतोष पसरला. हा निर्णय होण्यापूर्वी समितीचे चारशेएक प्रमुख नेते व कार्यकर्ते यांना अटकेत ठेवण्यात आले. मुंबईत गाड्या, ट्रॅम वगैरे जाळण्यात आल्या. पोलिसांनी गोळीबार, लाठीमार यांचा सर्रास वापर केला. गोळीबारात अनेक जण मरण पावले. हा आकडा पंचाऐंशीपासून एकशे पाचपर्यंत सांगितला जाऊ लागला आणि एकशे पाच हा आकडा मुंबई महापालिकेने अधिकृत धरला. मुंबईबाहेर महाराष्ट्राच्या अनेक भागांत दंगली झाल्या. या दंगलीचे अहवाल मोरारजीभाईंनी केंद्राकडे पाठवले असले, तरी राजकीय परिणामांची त्यांनी तमा बाळगली नाही. गृहमंत्री पंत मात्र यामुळे अस्वस्थ झाले. त्यांनी नेहरू, आझाद इत्यादींशी चर्चा केली असावी. म्हणून १० फेब्रुवारी ५६ पासून अमृतसर इथे काँग्रेसचे अधिवेशन भरले असता, त्यांच्या प्रेरणेने काहीजणांनी महाराष्ट्र व गुजरातच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा करून अंदाज घेतला. या अधिवेशनास काकासाहेब गाडगीळ, देवगिरीकर, यशवंतराव इत्यादी हजर होते.