• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३१

पुढील काळात यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सांगलीत झालेल्या सत्काराच्या उत्तराच्या भाषणात आपल्यावर कोणाचे संस्कार झाले या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले. ते म्हणाले, ‘एका माणसाकडून मी हे सर्व शिकलो असे म्हणणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेण्यासारखे आहे; आणि दुस-यांचीहि फसवणूक करणे आहे. माझ्यासारखा मनुष्य जो तीस वर्षे राजकारणाच्या धकाधकीमध्ये राहिला, त्याने मी सगळे गांधीजींच्याकडून शिकलो असे जर म्हटले, तर ती गांधीजींची स्तुति होईल. पण ते खरे असणार नाही. कारण कितीतरी लोकांकडून मी शिकलो आहे. लोकांशी कसे वागावे, कसे बोलावे, त्यांच्या पाठीवर कसा हात फिरवावा, हे कदाचित मी वसंतदादांकडून शिकलो असेन. समाजातल्या माणसांच्या दु:खाची तळमळ कशी जाणावी, हे कदाचित मी एखाद्या खेड्यातल्या शेतक-याकडून शिकलो. राजकारणात मुद्देसूद विचार करावा, हे मी रॉयपासून शिकलो. त्यांचे ऋण मी जाहीरपणे स्वीकारले आहे. अनेक माणसांकडून याप्रमाणे अनेक गोष्टी शिकलो.’

१९४० साली यशवंतरावांना वकिलीच्या परीक्षेत यश मिळाले आणि ते कराडमध्ये वकिलीही करू लागले पहिल्यांदाच त्यांना काही कमाई करण्याचा योग आला होता. वकिलीत हळूहळू पाऊल पुढे पडत होते आणि यामुळे कुटुंबाला आपण थोडा हातभार लावू शकतो याचे समाधान मिळत होते. पण देसातील वातावरण बदलत होते आणि काँग्रेस नेते कोणता आदेश देतात याकडे लक्ष होते. महात्मा गांधीनी प्रथम वैयक्तीक सत्याग्रहाची मोहीम सुरू करून, आचार्य विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही म्हणून निवडले. पुढे दीडएक वर्षात युध्दपरिस्थिती अधिकच उग्र बनली आणि ब्रिटिश सरकारने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. त्यांनी दिलेली योजना काँग्रेसने फेटाळली. यामुळे राजकीय पेच निर्माण झाला. महात्माजी व काँग्रेसनेते पुढे कोणते पाऊल टाकणार इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. काँग्रेसचे निश्चित काही ठरले नव्हते तेव्हा यशवंतराव यांचा फलटणच्या मोरे घराण्यातील वेणुताईशी विवाह झाला. वेणुताईचे घराणे हे राजकारणातील नव्हते. यामुळे यशवंतरावांच्या घरातील वातावरण त्यांना नवखे होते.

ऑगस्ट महिना उजाडला आणि मुंबईत अखिल भारतीय समितीचे अधिवेशन, ७ तारखेला दुपारी गोवालिया टँक मैदानावर भरण्याचे जाहीर झाले. त्यापूर्वी महात्मा गांधीनी ‘हरिजन’ मधून जळजळीत लिखाण सुरू केले होते. आता हा अखेरचा लढा असेल अशी भाषा ते करत होते, त्यांच्या लेखांची धग विलक्षण होती आणि देशातली तरूण पिढी यामुळे कधी संघर्ष सुरू होतो यासाठी उत्सुक होती. यांतील एक यशवंतराव होते. मुंबईतल्या अधिवेशनास यशवंतराव व त्यांचे सहकारी मित्र हजर होते. सकाळी काँग्रेस कार्यकारिणीने संमत केलेला ठराव वैराच्या भावनेतून केलेला नाही आणि तो धमकी देण्यासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आठ तारखेला सकाळी व दुपारी पुन्हा अधिवेशन भरले. महात्माजींचे भाषण सर्वात महत्त्वाचे होते. गांधीजी खालच्या आवाजात बोलत असत. हे भाषणही त्याच आवाजात होते आणि श्रोते ते कान देऊन ऐकत होते. महात्माजींनी हे स्पष्ट सांगितले की, आजपासून तुम्ही सर्व जण स्वतंत्र झाला आहांत, असे समजन कामाला लागा हा अखेरचा लढा आहे आणि ‘करू वा मरू’ हा त्याचा मंत्र आहे. त्यांच्या या शब्दांनी सभेत चैतन्य निर्माण झाले. आजवरच्या गांधीजींच्या लढ्यांपेक्षा हा लढा वेगळा होणार याची खात्री श्रोत्यांना पटली.

यशवंतराव व त्यांचे मित्र रात्री दीर्घ काळ दिवसभरच्या अनुभवांची उजळणी करत होते आणि सकाळी उठून पाहतात, तो रस्ते लोकांनी फुलले होते आणि पोलिस बंदोबस्त वाढत होता. गांधीजी व इतर पुढारी यांना रात्रीच अटक करून गुप्त ठिकाणी नेल्याचे वृत्तही पसरले होते. यामुळे दंगल सुरू झाली. लाठीमार, अश्रुधूर यांचा वापर पोलिस करत होते. या स्थितीत यशवंतराव व त्यांचे सहकारी यांनी जिल्ह्यांत वेगवेगळे परत जायचे आणि पोलिसांना अटक करण्याची संधी न देता, यापुढे भूमिगत राहून काम करायचे असे या सर्वांनी ठरवले. याप्रमाणे यशवंतराव प्रथम पुण्यास व तेथून इंदोलीला गेले आणि मग कराडला पोचले. त्यांनी दुस-या दिवशी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कोणी कसे व कोठे जायचे याचा तपशील ठरवला आणि आठ दिवसांत अनेक गावांतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यशवंतराव सांगतात की, अनेक पोलिस त्यांना व त्यांच्या सहका-यांना ओळखत होते. पण अनेकांनी डोळेझाक केली. काही ठिकाणी सभाही घेण्यात आली. यशवंतरावांनी कार्याचा बराच तपशील दिला आहे. किसन वीर वसंतदादा इत्यादी त्यांचे सहकारी होते आणि इतर अनेक. सरकारी यंत्रणा बंद पाडण्याच्या कामास महत्त्व होते आणि ते करून लोकांत आत्मविश्वास निर्माण करण्याचा हेतू होता.