आचार्य भागवत यांनी यशवंतराव व त्यांच्या वयाच्या राजबंद्यांना सांगितले की, तुमचे शिक्षण अर्धवट झाले आहे. इथून केव्हा सुटाल हे सांगता येत नाही, तेव्हा पुस्तके वाचा व नामवंत लोकांशी संपर्क ठेवा मग जे आले त्यांत ह. रा. महाजनी हे एक होते. ते सातारा जिल्ह्यातले. त्यामुळे यशवंतरावांशी चांगले परिचित. आचार्य भागवतांची सूचना यशवंतरावांनी महाजनींना सांगितली. त्यांना ती पसंत पडली. महाजनी संस्कृतचे पंडित होते आणि महाजनीशास्त्री म्हणून ओळखले जात. त्यांनी दुस-या दिवसापासून शाकुन्तल शिकवण्यास सुरूवात केली. काही दिवसांनी आचार्य भागवतांनी शेक्सपियरचे ज्युलियस सीझर हे नाटक शिकवण्यास घेतले. आचार्य भागवत हे निष्ठावान गांधींच्या तत्त्वज्ञानाचे विवेचन करणारी भाषणे दिली. गांधींचा विचार भारतीय संस्कृतीतून कसा निर्माण झाला याची उकल करून आचार्य सांगत असत. आचार्य भागवत यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्ववादावर कडक टीका करणारे भाषण कारावासातल्या अभ्यासवर्गात दिले होते. नंतर यशवंतरावांनी आचार्य भागवत यांना विचारले की, साहित्यिक म्हणून सावरकरांबद्दल तुमचे काय मत आहे ? ते म्हणाले की, सावरकर साहित्यिक म्हणून आपल्याला प्रिय असून ‘गोमंतक’, ‘कमला’ अशी काव्ये आपल्याला फार प्रिय आहेत. मग ‘कमला’ व ‘गोमंतक’ या काव्यावर आचार्य भागवत यांनी रसाळ व्याख्याने दिली, अशी आठवण यशवंतरावांनी नमुद केली आहे.
गांधीवादाप्रमाणेच समाजवाद व मार्क्सवाद यांचेही शिक्षण होऊ लागले होते. ह. रा. महाजनी व एस. एम. जोशी हे पूर्णपणे गांधीवादी नव्हते तर समाजवादाचे पुरस्कर्ते होते. वि. म. भुस्कुटे हे मार्क्सवादी होऊ लागले होते. मार्क्सवादाचा विचार शास्त्रीय पध्दतीने करून भारताच्या राजकीय लढ्यात त्याचा कसा उपयोग करायचा हे ठरवले पाहिजे, अशी भुस्कुटे यांची विचारसरणी होती. कम्युनिस्ट जाहीरनामा भुस्कुटे यांच्याकडूनच यशवंतरावांना वाचायला मिळाला होता. लेनिनचे चरित्र, रशियन क्रांतीचा इतिहास इत्यादींचे वाचन करण्याची संधी यशवंतरावांना याच काळात मिळाली. लेनिनसंबंधी महाजनी व डॉ. शेट्टी यांच्याशी बोलत असताना, य़शवंतरावांना एम. एन. रॉय यांच्यासंबंधी माहिती झाली. कारावासात असलेल्या रॉय यांनी आपले विचार स्पष्ट करणारी काही पत्रे गुप्तपणे धाडली होती. त्यांची माहितीही मिळाली.
कारावासातील मंडळींत देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनासंबंधीही चर्चा होत. सामाजिक जीवनासंबंधीच्या चर्चेत अनेकजण काही चुकीच्या कल्पना बाळगून असल्याचे यशवंतरावांना आढळले होते. यास अपवाद होता महाजनी, एस.एम. व भुस्कुटे यांचा. ते समजूतदारपणे या विषयासंबंधी बोलत असत. यशवंतरावांनी म्हटले आहे, की एस. एम. यांनी युवक चळवळीसंबंधी मोठ्या उत्कटतेने दिलेल्या भाषणाचाही आपल्याला विसर पडला नाही. याच कारावासात आपल्याला बर्ट्रांड रसेल यांचे ‘रोड्स टु फ्रीडम’ हे पुस्तक वाचायला मिळाले; असे सांगताना इंग्रजी पुस्तक वाचण्याचा सराव नसल्यामुळे हे पुस्तक वाचताना अवघड गेले, पण त्यातल्या विचारांचा पगडा बसला आणि स्वातंत्र्याचा विचार हा किती व्यापक आहे याची कल्पना येऊन, इंग्रजी पुस्तके वाचण्याची सवय लागली असे यशवंतरावांनी सांगितले आहे.
येरवडा कारागृहात यशवंतरावांना येऊन वर्ष होण्याच्या सुमारास सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार हरिजनांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आला होता. यास विरोध करून गांधीजींनी उपोषण सुरू केले. याची चर्चा कारावासातल्या बंदिवानांत होत होती. या संबंधात यशवंतरावांनी लिहिले आहे की, हरिजनांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे दुफळी वाढण्याचा धोका वर्तवला जात होता व त्यात तथ्य होते, पण ही वेळ कां आली, याचा विचार केला जात नव्हता. अखेरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडली व गांधीजींचे प्राण वाचवले. यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर वाढला, अशी प्रतिक्रिया यशवंतरावांनी व्यक्त केली आहे. ती करत असतानाच बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणीच करायला नको होती असे मानणारांची टीका रास्त नव्हती, इत्यादी अभिप्राय यशवंतरांवांनी दिला आहे. तो त्यांच्या प्रगत सामाजिक जाणिवेचा द्योतक म्हटला पाहिजे.