• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १०९

तेरा जुलै रोजी इंदिरा गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गिरी यांचे नाव सुचवण्यापूर्वी आपण जगजीवन राम यांचे नाव सुचवले होते, पण दोन्ही अमान्य झाली. ज्या रीतीने राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्यात आला त्यामुळे आपल्याला उद्वेग वाटला, असेही त्या म्हणाल्या. गिरी यांच्या नावाबद्दल देशात बरेच एकमत असून गांधीशताब्दी वर्षात जगजीवन राम याचे नाव उचित होते, असाही अभिप्राय त्यांनी दिला. प्रजासमाजवादी, भारतीय क्रांती दल इत्यादी काही पक्षांचा गिरींना पाठिंबा होता आणि कम्युनिस्ट पक्षांचा पाठिंबा मिळणारच होता. दिल्लीला परतल्याबरोबर इंदिरा गांधींनी मोरारजीभाईंचे अर्थखाते काढून स्वतःकडे घेतले. ते खाते न देता उपपंतप्रधानपद त्यांच्याकडे ठेवण्यास इंदिरा गांधी तयार होत्या. पण मोरारजीभीईंनी राजीनामा दिला. त्याचबरोबर बँकांचे राष्ट्रीयीकरण, दहा कलमी कार्यक्रम इत्यादींची घोषणा झाली. यशवंतराव गृहखात्यात काही अधिका-यांबरोबर चर्चेत गुंतले असताना झालेली ही घटना त्यांना कळली नाही. मग मोरारजींनी त्यांना आपल्या कचेरीत बोलावले व इंदिरा गांधींचे पत्र त्यांना दाखवले. अर्थखाते गेले तरी राजीनामा देऊ नये हा यशंतरावांचा सल्ला होता. मोरारजींना तो मानवला नाही.

मोरारजीभाईंची अपेक्षा अशी होती की, आपल्याला मिळालेल्या वागणुकीच्या निषेधार्थ यशवंतरावांनीही राजीनामा द्यावा. इंदिरा गांधी आपल्यालाही मंत्रिमंडळातून काढतील असा यशवंतरावांचा अंदाज होता. मोरारजीभाई त्यांना पंतप्रधानांचे पत्र आले काय, असे वारंवार विचारत असत. महाराष्ट्रातले आमदार इत्यादींनी यशवंतरावांशी चर्चा केली तेव्हा बंगलोरला जे घडले, त्या आधीच्या घटना त्यांनी निवेदन केल्या आणि संजीव रेड्डी स्वातंत्र्य लढ्यात होते, एका राज्याचे मुख्यमंत्री होते आणि नंतर लोकसभेचे सभापती; राष्ट्रपतिपदासाठी इतके कमी नाही, असे त्यांनी सांगितले.

यशवंतरावांनी लेले यांना मुलाखतीत सांगितले की, नंतर दोन दिवसांनी इंदिरा गांधींनी सचिवातर्फे बोलावले. पण इंदिरा गांधींनी यशवंतरावांना बोलावल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. मग यशवंतरावांनी इंदिरा गांधींना फोन केला आणि सांगितले की, तुम्हांला भेटण्याच्या मनःस्थितीत आपण नाही, पण काही सांगायचे असेल तर फोनवर सांगितले तरी चालेल. आपल्याला काहीही सांगायचे नाही. पण शांतपणे चर्चा करायची आहे असे त्यांनी सांगितले. यशवंतराव म्हणाले की, झालेल्या घटनांमुळे मी अस्वस्थ होतो, पण त्या अगदी शांत होत्या. तेव्हा आपण म्हणालो की, तुम्हांला काही सल्ला देण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी आपली भावना आहे. त्या म्हणाल्या की, तसे काही नाही. तुम्हांला पूर्ण अधिकार आहे. यावर मोरारजींचा राजीनामा घाईने स्वीकारू नये, असे यशवंतरावांनी सांगितले. मग दुस-या दिवशी भेटण्याचे ठरले. भेट झाल्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या की, संध्याकाळी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली असून बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घ्यायचा आहे. आपण याच विषयावर चर्चा करण्यासाठी काल बोलावले होते. बँकांच्या राष्ट्रीयीकरणास आपला पूर्वीपासूनच पाठिंबा असल्यामुळे या असल्या मुद्यावर आपण तुमच्याशी संघर्ष करणार नाही, असे यशवंतरावांनी उत्तर दिल्यावर, माझ्याशी संघर्ष करण्याची भाषा तुम्ही कशासाठी करता? असा इंदिरा गांधींचा प्रश्न होता. यशवंतराव सांगतात की, इंदिरा गांधींचा शांतपणा पाहून त्याही स्थितीत आपल्याला कौतुक वाटले. मोरारजीभाईंशी बोलल्याशिवाय राजीनाम्याबद्दल निर्णय न घेण्याचेही इंदिरा गांधींनी मान्य केले. तशी भेट झाली, पण काही मार्ग निघाला नाही.

यशवंतरावांचा राजीनामा इंदिरा गांधींनी मागितला नाही व दोघांच्या भेटीत काय बोलणी झाली, ती यशवंतरावांकडून मला समजली होती. पण आणखीही एक गोष्ट त्यांनी तेव्हा सांगितली. ती अशी की, यशवंतराव भेटीला गेल्यावर आदल्या दिवशी कां आला नाहीत? असा प्रश्न करून तुमचा राजीनामा आपण मागू, असे तुम्हांला वाटले काय? असा प्रश्न त्यांनी केला. नंतर इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘तुम्हीच मला अगदी प्रथम पंतप्रधानपदासाठी उभे राहण्यास सांगितले होते आणि मी उभी राहणार नसल्यास, आपण निवडणूक लढवू असे तुम्ही म्हणाला होतात; हे सर्व माझ्या लक्षात आहे.’ त्याचबरोबर हेही खरे दिसते की, हक्सर यांनी इंदिरा गांधींना असा सल्ला दिला होता की, जुन्या काँग्रेस पुढा-यांशी संघर्ष करायचा तर त्यास वैचारिक स्वरूप असलं पाहिजे. म्हणून मग बँकांचे राष्ट्रीयीकरण, दहा कलमी कार्यक्रम इत्यादींचा पुरस्कार करणारे टिपण इंदिरा गांधी यांनी बंगलोरच्या बैठकीसाठी पाठवले होते. त्याचबरोबर मोरारजींचे अर्थखाते काढून घेतल्यानंतर, मोरारजींनी राजीनामा दिल्यावर यशवंतरावांचा राजीनामा मागण्याचे कारण नाही; तसे केल्यास वैयक्तिक सूड घेतल्यासारखे होईल. असे हक्सर यांचे म्हणणे होते व ते इंदिरा गांधींनी मान्य केले.