चला, मी तुम्हाला छान चित्र दाखवतो. हा माझा फार आवडता चित्रकार आहे. तशी अनेकांची चित्रे मला आवडतात, आवडली. पण जगभरातून मिळतील तेवढे दुर्मिळ ग्रंथ मी जमवत गेलो. याबाबतीत बाबासाहेबांना मी फॉलो करीत आलो. साहेबांनी त्यांच्या खजिन्यातले अनेक ग्रंथ काढले, सारे चित्रकारांचे. सुंदरसुंदर चित्रे. हा पिकासोचा संग्रह. अगदी अलिकडे म्हणजे १९७३ साली गेला. ९० वर्षे जगला, एक अवलिया माणूस. भेटलो होतो मी मुद्दाम त्याला. साहेब मला चित्र समजावीत होते. मी नुसता आज्ञाधारक मुलासारखा हां हां करीत होतो. मला त्यातली काडीची अक्कल नव्हती. डोक्यावरूनच जात होते. पण त्यांचा मूड महत्त्वाचा. ते सांगत होते. त्यांचा चित्रकलेचा केवढा मोठा व्यासंग होतो हे मी अनुभवीत होतो. पौरात्य आणि पश्चिमात्य चित्रकार. त्यांची चरित्रे, त्यांची चित्रे एखादी ओळ गुणगुणावी तशी साहेबांच्या ओठावर होती. ते इतके रंगून गेले होते, तल्लीन झाले होते. मी त्यांच्याकडून समजावून घेत होतो. पिकासोसारखा इम्प्रेंशनिस्ट चित्रकार. मोनेमाने, दगा, सेझॉन, तुलूज लोत्रेक, व्हान गॉग, गोगँ साहेब सांगत होते. लक्ष्मण, अनेक चित्रकारांची चरित्रे माझ्या वाचनात आली. एखादी कलाकृती पाहणं हा अनुभव मोठा आनंददायी आहेच, पण या चित्रकारांचा अधिक परिचय व्हायचा, त्याच्या रेषा, रंग अधिक बोलके व्हायचे तर त्याचे जगणेही परिचित हवे म्हणून हे ग्रंथ मी मिळवले, वाचले. त्यातल्या पिकासोसारख्या अवलियाला तर भेटलेच पाहिजे. मी भेटलो, मोठा विलक्षण मनुष्य. सर्वसामान्य नितिमत्तेचे यांना कोणतेच नियम लावता नाही येत. त्यांचे जगणे तसे बंधमुक्त असते. त्यांची चित्रे पाहताना या असल्या नैतिकतेच्या कसोट्या काय कामाच्या ? त्या निरर्थकच वाटू लागतात. श्रेष्ठ कलाकृतीला देश-काल बंधन उरत नाही. ती ज्या कलखंडात घडते त्या काळाची कलाकृती असते. म्हणून ती निर्माण करताना कलाकार ज्या काळात जगला तो काळ, तो समाज, त्या काळची सामाजिक राजकीय परिस्थिती या सर्वांचे भान असावे लागते नि ते भान ठेवून जर कलाकृती पाहता आली ना तर ती अधिक बोलकी, जिवित, देखणी होऊन जाते. पिकासो म्हणत असे, माझी चित्रे मी माझ्या रोजनिशीची पाने आहेत. कलावंताचे जगणे आणि त्यांची निर्मिती याचे अतूट नाते असते. त्याला समजावून घेतल्याशिवाय त्याची कलाकृती समजत नाही. म्हणून मग त्यांची चरित्रे वाचणे फार उत्तम. पिकासोसारख्या अतिशय गुंतागुंतीचे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या कलावंताबाबत तर हे विशेषकरून लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या नामदेव ढसाळांसारखे बिनधास्त आयुष्य हा माणूस जगला. पिकासोच्या व्यक्तिमत्त्वात आपल्या काळात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, टोकावर ही माणसे कसे विलक्षण गुंतागुंत करीत जगलेली असतात. त्यांचे जगणे हेच एक अत्यंत मौलिक ठेवा बनून जाते. आपल्या नैतिकतेच्या कसोट्या, लक्ष्मण, काहीही असोत, पिकासोसारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्व, प्रतिभा लाभलेली जी माणसे असतात. मग ती कोणत्याही क्षेत्रातली असोत, संपूर्ण मानवी जीवनावर त्यांचा ठसा उमटतो. त्यांना समजून घेणे म्हणजे आपलेच जगणे समृद्ध करून घेणे नाही का ? आपल्या समाजात मुळातच या कलांमधले बारकावे समजावून कुणी मुलांना सांगत नाही. म्हणून मग ती उलटे डोंगर रंगवणारच नाही का ? म्हणून माझ्याकडे मिस्कीलपणे पाहून हसू लागले. मीही सामील झालो. काही समजतच नव्हते ना ? स्वतःवर ही कोटी करून ते छान हसत असत.
आपल्याकडे चित्रकार म्हणजे वाया गेलेला माणूस. ज्याला आयुष्यात काहीच करता आले नाही तो माणूस या असल्या भिकार नादाला लागतो. चित्र काढणे हे भिकेचे डोहाळे लागल्याचे लक्षण. चित्रकलेचा मास्तर म्हणजे वेडा माणूस. चित्रकार काय असतो ? कसा वागतो ? कसा विचार करतो ? त्याची कलाकृती आणि तो यांचा संबंध असतो की नाही ? आपण विचारच करीत नाही. लक्ष्मण, चित्र समजावून घ्यावे लागते. समजतेच असे नाही. न समजताही समजल्याचा अभिनय आपण अभिजनवर्ग करीत असतो. नुसते छान छान म्हणून आपण कसे रसिक आहोत, यातले दर्दी आहोत हे दाखवणारे अनेकजण भेटतात. प्रामाणिकपणे, मला हे समजतच नाही किंवा समजले नाही, ते समजावून सांगा, असे आपण कुणी कुणाला सांगत नाही. त्यामुळे कलास्वाद घेणे, खरा अर्थ समजणे, कलेतली जाण असणे हे कष्टसाध्य आहे, सहजसाध्य नाही.