• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३६-२६१०२०१२-१

एकदा तुझे बाबा मला गमतीने म्हणाले होते.  लक्ष्मणराव, तुम्हा लोकांना समोरचा माणूस जातीयवादी आहे हे कसे समजते ?  तेव्हा तुलाही ते सांगतो.  आम्हाला एक सहावे ज्ञानेंद्रियच आहे.  समोरचा पुरुष नालायक आहे, तो कितीही संभावितपणाचा, सभ्यतेचा आव आणत असला तरी त्या स्त्रीला तो काय लायकीचा आहे हे अगदी नजरानजर झाल्याबरोबर समजते.  कारण तिलाही सहवे इंद्रिय असते.  ती मनातल्या मनात शिवी हासडते.  आपला पदर नीट करते आणि पुन्हा त्याच्याकडे बघतही नाही.  तिला जसे नुसत्या नजरेने समोरच्याला जोखता येते.  तसेच ज्यांच्या वाट्याला अवहेलना, तुच्छता आलेली असते त्यांना समोरच्या माणसाचे डोळे क्षणांत तो काय आहे हे सांगतात.  त्यामुळे समोरचा माणूस जातीयवादी आहे की नाही आम्ही क्षणात सांगतो.  कारण त्याचे डोळेच सांगत असतात.  या माझ्या उत्तराने शरदराव कितीतरी वेळ कोट्या करून हसत आणि हसवत राहिले होते.  या त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे माझे मेतकूट वर्षानुवर्षे जमले आहे.

मी साहेबांशी बोललो.  कार्यक्रम संपल्यावर.  कराडला घरी भेटण्याचे ठरले.  साहेबांनी कारखान्याची मोळी टाकून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू केला.  शेतकरी मेळाव्यात भाषण केले.  मी थोडा वेळ त्यांची सभा ऐकली नि स्कूटरने कराडला पोहोचलो.  मी माझ्या समाजातल्या लाला साळुंखे नावाच्या घिसाडी समाजातल्या तरुण कार्यकर्त्याकडे बराच वेळ बसलो.  तो आपला उद्योग करीत माझ्याशी बोलत होता.  आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या.  गाड्यांचा ताफा विरंगुळ्याकडे वळला नि मी स्कूटर त्याच्याच दारात लावून साहेबांकडे गेलो.  साहेबांकडे फारशी गर्दी नव्हती.  होती थोडी माणसे तीही पांगली.  मी आत गेलो.  माझे स्वागत करून बसा म्हणाले.  ते आतल्या बाजूला गेले.  फ्रेश होऊन बाहेर आले.  लक्ष्मणराव, जेवणाचे काय केले ?  मी वाट पाहिली.  तुम्ही लगेच निघालात काय ? पी.डी. तुम्हाला शोधत होते जेवायला.  चला आता एकटेच जेवून घ्या.  मी जेवून आल्याचे सांगितले.  साहेबांना एन.बी.टी.साठी बाबासाहेबांचे चरित्र लिहायचे होते.  त्या ग्रंथाची तयारी ते करीत होते.  प्राथमिक तयारी झाली होती.  काही संदर्भग्रंथ, काही त्यावेळच्या पत्रकांच्या शोधात ते होते.  त्यासंबंधी आम्ही बोलत होतो.  खैरमोड्यांचे ग्रंथ होते.  तशी बाबासाहेबांची अनेक उत्तमोत्तम चरित्रे होती. पण त्यांना त्या सर्वाहून वेगळे लिहायचे होते.  डॉ. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला एका वेगळ्या पद्धतीने त्यांना मांडायचे होते.

माझ्या मनातली अस्वस्थता मी त्यांच्याशी बोलत होतो.  आम्ही कितीही कर्तबगारीने उभे राहिलो तरी आमची जातच पाहिली जाते.  त्यामुळे कुणीच आपले वाटत नाही.  या जातीचे, विषमतेचे करायचे काय ?  आम्ही सोन्यासारखे काम केले तरी त्याची माती होते.  आमच्या अंगी सोन्यासारखे गुण असले तरी त्याची माती होते आणि यांची टुकार पोरे, सुमार लेकरे हागली तरी त्याचे सोने होते.  साहेब म्हणाले, खरे आहे लक्ष्मण, पण हे एक गोष्ट लक्षात घेतली की उलगडते.  बाबासाहेब उतरंड म्हणतात ना तसेच हे आहे.  सारी गाडगी दुसर्‍याच्या तोंडावर बसली आहेत.  खालचा डेरा म्हणजे आपण सारे.  पण डेरा मोठा असला, त्याचा आकार मोठा असला तरी दुसरी गाडगे त्याच्या तोंडावर बसते नि त्याचे तोंडच बंद होते.  तोच न्याय इतर गाडग्यांचा असतो.  

साहेब, देशाला स्वातंत्र्य मिळून आज तीस वर्षे उलटली.  संयुक्त महाराष्ट्र झाला त्याला वीस पंचवीस वर्षे झाली.  पण आज ब्राह्मण परवडले पण मराठे नकोत असे आम्ही लोक म्हणत आहोत.  मराठ्यांचा जेवढा त्रास आहे या वंचित समाजाला तेवढा आज कोणाचाही नाही.  ब्राह्मण खेडी सोडून पळाले.  आज औषधाला नाहीत.  मग त्रास का चालू आहे ?  अन्याय, अत्याचार कोण करीत आहे ?  आम्ही आजही अंगावर घातलेले कपडे, पायातले बूट, बांधलेली घरेदारे घोड्यावर काढलेल्या वराती, कोणतेही निमित्त पुरते नि अत्याचार सुरू होतात.  सामूहिक बलात्कार, सामाजिक बहिष्कार होतात.  काय उपयोग त्या घटनेचा,  पुस्तकाचा ?  सारी चांगली सुत्रे एकत्र केली, चांगली सुंदर घटना बनवली ती आमच्या बायापोरींची अब्रू वेशीला टांगली तर काय करायची ती घटना ?  असून नसल्यासारखीच की.

लक्ष्मण, तुम्ही म्हणता ते सारे खरे आहे.  चटके तुम्हाला बसताहेत हेही खरे आहे.  पण हे मी पंचवीस-तीस वर्षापूर्वी मांडले आहे हे लक्षात घ्या.  आमच्या पिढीला मर्यादा आल्या हे खरेच आहे. आज ब्राह्मण ब्राह्मणापुरता विचार करतो.  मराठा, मराठ्यांपुरता विचार करतो.  महार महारांकरिता विचार कातो.  माळी माळ्यांकरिता विचार करतो.  हे मासले मी नमुन्यासाठी सांगितले.  जातीयवादाच्या या विषारी विचारापासून आपण महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे.  जातीयवादाचा हा विचारच समूळ नष्ट केला पाहिजे.  तेव्हाच महाराष्ट्राचे मन एकजिनसी होईल.  बाबासाहेबांचे चरित्र लिहिण्यामागे माझा हाही एक हेतू आहेच.  म्हणूनच मी ते कबूल केले आहे.  ते मीच लिहिले पाहिजे हेही माझ्या मनाने घेतले आहे.  महाराष्ट्रात केवळ मराठी भाषकांचे राज्य झाले.  लोक मला त्याकाळात शिव्या देत होते.  जोड्याच्या माळांनी माझे स्वागत करीत होते.  तेव्हाही मला मनातून आनंद होत होता.  यानिमित्ताने का असेना, सर्व जातीधर्मातले लोक एका झेंड्याखाली आले होते.  महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.