पत्र - ३६
दिनांक २६-१०-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम,
माझ्या मनात अनेक वर्षे अनेक प्रश्न सतत मला सलत असत. त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असे तो जातीचा. आपला जन्म येथे का झाला ? आपल्या हाती जन्म घेणे होते का ? मग जी गोष्ट आपल्या हाती नाही तिचे चटके इतके का बसावेत ? उठता-बसता माणसाचे मूल्यमापन त्याच्या जातीवरूनच का व्हावे ? माणसाचा दर्जा त्याच्या जातीवरून ठरतो तो का ? धर्मशास्त्राने दिलेले उत्तर मला माहीत आहे. पण ते उत्तर मीच काय कुणीच विज्ञानवादी माणूस स्वीकारत नाही. कर्मविपाकाचा सिद्धांत मी स्वीकारीत नाही ? किंवा त्यावर विश्वासही ठेवीत नाही. हे असले माणूसपणाला कमी लेखणारे सिद्धांत माणूसघाणे आहेत. मग त्याचा निर्माता कुणी का असेना. एक माणूस तुपाशी आणि दुसरा उपाशी ही गोष्टच तळपायाची आग मस्तकला नेणारी आहे. कुणीतरी श्रीमंत बापाच्या पोटी जन्मला म्हणून तो पिढ्यान् पिढ्या श्रीमंत आणि कुणीतरी गरीबाघरी जन्मला म्हणून तो पिढ्यान् पिढ्या गरीब. त्याला पोटभर अन्न मिळणार नाही. अंगभर वस्त्र मिळणार नाही. डोक्यावर छप्पर मिळणार नाही. पाय ठेवायला आसरा नाही. त्यामुळे जन्माधिष्ठित उच्चनीचता, जन्माधिष्ठित जातीव्यवस्था, जन्माने बहुसंख्य नि जन्माने अल्पसंख्य हे लोकशाही कसे निर्माण करणार ? लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरवी चालवली जाणारी राज्यपद्धती म्हणजे लोकशाही. या व्यवस्थेत या व्याख्येला काय अर्थ आहे ? मी बाई माणूस म्हणून जन्मले हा काय गुन्हा आहे ? बाईला माणूसच धर्मशास्त्रांनी मानलेले नाही. त्यामुळे समाजात स्त्रियांचा दर्जा नेहमी खालचा. ती पुरुषाच्या बरोबरीची असूच शकत नाही. पायातली वहाण पायात असली पाहिजे. म्हणजे काय ती गुलामच आहेना ? असले सामाजिक विषमतेचे अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत असल्याने वेळ मिळेल तेव्हा मी चव्हाणसाहेबांना भंडावून सोडत असे. त्यांचे माझ्यावर प्रेम असल्याने व माझ्या प्रामाणिकपणावर त्यांचा विश्वास असल्याने ते कधी विचलीत होत नसत. त्यांना रागावण्याचे इंद्रियच नाही की काय ? मी तर छोट्याछोट्या गोष्टीवर रागावतो. आपण सामान्य माणसं. साहेब सामान्य नव्हते. त्यांचे मन अत्यंत हळवे, संवेदनशिल आणि प्रगल्भ विचारवंताचे होते. त्यामुळे आईची माया, थोरल्या भावाची माया, कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाची माया त्यांच्या ठायी होती. म्हणूनच मीही त्यांच्या प्रेमता पडलो होतो.
दिवस उगवून बराच वर आला होता. पावसाळा नुकताच संपला होता. सह्याद्रीच्या उंच सुळक्यांनी, खोल दर्यांनी हिरव्याकंच शालूने आपला देह झाकला होता. कंबरेवर वाढलेले गवत वार्यावर झोके घेत होते. झोपाळ्यावर डुलावे तसे गवतांचे तुरे डुलत होते. पानांचा हिरवा काळा रंग, पानावरली तुकाकी, पानांची तरुण तेजदार विन होती. मध्येच फुलांनी सजलेले वृक्ष आपआपल्या माना वर करून आकाशाला खुणावत होते. आकाशाचे बदलते रंग आपल्या विविध छटांनी मनावरून मोरपिस फिरावे तसे फिरवत होते. ढगांचे बदलणारे आकार, वार्याच्या दिशेने पळणारे राखाडी रंगाचे ढग. त्यातली विविधता, संपन्नता मनाला फार मोहवीत होती.
मी अगदी सकाळी सकाळी स्कूटरवरून सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर निघालो होतो. चव्हाणसाहेब कारखान्यावर येणार होते. त्याचं परमस्नेही पी.डी. पाटील असेच अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्त्व. शांत, कमी बोलणारे. पायजमा, शर्ट, कोट, डोक्यावर खादी टोपी. टपोरे डोळे, उंच दांडीचे नाक. सडसडीत अंगाचे पी.डी. म्हणजे चव्हाणसाहेबांचे उजवे हात. कराड शहराचे वर्षानुवर्षे नगराध्यक्ष. पी.डी. नि नगराध्यक्ष असे समीकरणच होते त्या काळात. साहेबांचा निरोप होता, कारखान्यावर भेटूया. काही कारणाने मी आप्पासाहेब भोसल्यांपर्यंत माझा गाडीसाठीचा निरोप पोचवू शकलो नव्हतो. पण जायला तर हवेच होते. काय करावे याचा विचार न करता मी स्कूटरने मजा करीत कारखान्यावर पोचलो. साहेब यायला बराच वेळ होता. सह्याद्रीच्या कुशीतल्या या कारखान्यातल्या पी.डी. साहेबांच्या अधिकार्यांनी मला सारा कारखाना, त्याचा परिसर दाखवला. दिवस वर सरकू लागला. तसं ऊन वाढायला लागले. साहेबांची सभा असल्याने गर्दी बरीच जमू लागली. मी आल्याचा निरोप साहेबांपर्यंत पोहोचला. त्यांनी तात्काळ मला बोलावले. जवळ बसवून घेतले. जिल्ह्यातले अनेक नेते जमू लागले. मी हळूच सटकलो. का कोण जाणे, पण मला या लोकांत संकोचल्यासारखे होत होते, अगदी आजही होते. ही माणसे दोन चेहर्यांची असतात. त्याचा सार्वजनिक चेहरा वेगळा असतो नि खरा चेहरा वेगळा असतो. हसणे हे खोटे असते किंवा उसने असते. आणि डोळ्यांत कायम इतरांबद्दल तुच्छतेचा भाव असतो. या तुच्छतेचाच मी पराकोटीचा तिरस्कार करीत असतो. ती तुच्छता या पांढर्या कपड्यातल्या मोठमोठ्या असामींमध्ये मी ठासून भरल्याचे पाहतो. या सर्वांत नितळ माणूस म्हणून मी चव्हाणसाहेबांच्या प्रेमात पडलो होतो. पण माझ्यासारखी खालच्या जातीची माणसे घेऊन यशवंतराव हिंडतात या गोष्टीचे त्यांना वरकरणी कौतुक असते तरी डोळ्यांतली तुच्छता काही त्यांना सराईतपणे लपवता येत नाही.