सुप्रिया, साहेबांशी आमच्या गप्पा झाल्या. साहेबांनी फार मोठी जोखीम माझ्या खांद्यावर टाकली होती. मला माहीत होते की मी असल्या कामाला लायक नाही. साधी बालवाडी चालवण्याचा अनुभव नाही. कसे करणार होतो मी ? संस्था स्थापण करणे व ती चालवणे हा माझा पिंडच नव्हता. पण साहेबांचा आदेश होता. भटक्या-विमुक्तांच्या शिक्षणासाठी, संशोधनासाठी संस्था काढायची. ते कामालाही लागले होते. अनेक सहकारी मित्रांशी बोलत होते. लक्ष्मणला या कामात मदत केली पाहिजे. त्यांना पाठबळ दिले पाहिजे. माझी नकारघंटा चालूच होती. आत्मविश्वास नव्हता. साहेब, मी नवीन पुस्तक लिहू शकेन असे आता वाटते, पण शाळा चालवणे अशक्य वाटते. साहेबांनी माझे ऐकले नाही. विषय बदलला.
अरुणने नवा प्रस्ताव आणला होता. विषय बदललाच होता. अखिल भारतीय साहित्य संमेलनवाले जर परदेशात जाऊन संमेलन भरवतात तर आपले दलित साहित्य संमेलन परदेशात का भरू नये ? मी अरुणच्या सुरात सूर मिसळला, साहेब थोडे गंभीर झाले.
अरुण, कल्पना चांगलीच आहे. प्रश्न साधनांचा आहे. साधने कशी उभी करणार ?
अरुण म्हणाला, साहेब, आपले लोक आहेत असा देश लंडन. तेथे घमरे नावाचे आपले जयभीमवाले उद्योगपती आहेत. ते करतील मदत.
मग काय उत्तम आहे, साहेब म्हणाले. साहेबांचा होकार मिळाला. लंडनमध्ये दलित साहित्य संमेलन भरवायचे. साहेबांनी उद्घाटक म्हणून यायचे मान्य केले. मी सांगतो कोणाकोणाशी बोलतोय ते. आपण उत्साहात संमेलन करू. या निमित्त जगभर या साहित्याची चर्चा होईल. साहेबांची विमानाला निघायची वेळ झाली होती. चेन्नईला त्यांची मीटिंग होती. ते विमानतळाकडे जायला तयार झाले नि दोन्ही संस्था, दलित साहित्य संमेलन करण्याचे ठरवून आम्ही खोलीतून बाहेर पडलो. आम्हाला निरोप द्यायला ते खोलीच्या दरवाजापर्यंत आले. हसतहसत निरोप दिला. पुढे हे दलित साहित्य संमेलन झाले नाही. मात्र महाराष्ट्र टाइम्सचे त्यावेळचे संपादक गोविंदराव तळवळकर यांनी 'आता दलित लंडनला' असा अग्रलेख लिहिला. त्यावर माझी प्रतिक्रियाही त्यांना व्याख्यानमालेत मी ऐकवली.
सुप्रिया, ब्राह्मण जातीत जन्म झाला की आपल्याला सार्या जगाला अक्कल शिकविण्याचा परवाना मिळाला असे काही लोकांना वाटते. अर्थातच ही मक्तेदारी आंबेडकरवादी लेखकांनी मोडून टाकली, हा भाग वेगळा. ज्ञानाच्या क्षेत्रात ब्राह्मणेत्तर समाजही किती आघाडीला राहू शकतो हे यशवंतरावांचा दहा हजार ग्रंथांचा संग्रह पाहिला म्हणजे लक्षात यायला हरकत नाही. तुझ्या बाबांच्या पुस्तकांचा संग्रह ब्राह्मण कधीच पाहत नाही. नुसते निवडून येणारे अनेकजण आहेत. ते सारे नुसते निवडून येतात. जातींच्या बळावर आणि राज्य करतात. लेखन-वाचन नसते. ज्ञानसाधना नसते, ज्ञानाकांखा नसते. असे बरेच ग्रेट समज या समाजात आहेत. बारामतीच्या किंवा कराडच्या घरांमध्ये हे जाऊन पाहतील ना तेव्हा त्यांना कळेल. ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती ज्या ग्रंथाशी जोडलेली असते ते ग्रंथसंग्रह कोणाही उच्चवर्णीय म्हणवणार्याच्या घरी असणार नाहीत. यशवंतराव तर भाषाप्रभूच होते. शब्दांचे सामर्थ्य काय असते ते त्यांच्याएवढे कुणालाच माहीत नव्हते. एक नवी जबाबदारी घेऊन मी साहेबांचा निरोप घेतला होता.
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका