• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३३-०८१०२०१२-२

साहेब, हसावे की रडावे कळत नाही.  पाच एकर जमीन घेतलीत म्हणून सत्याग्रह करणारे बाबा आणि खजिल होणारे तुम्ही.  दोघेही ग्रेट आहात.  आता हजारो एकर जमिनी तुमच्या काँग्रेसवाल्यांनी केल्या आहेत.

मग मी बाबा करीत असलेल्या अनेक कामांची चर्चा केली, कष्टाची भाकर, हमालपंचायत, अंगमेहनती कामगार, भटके विमुक्त, देवदासी, परित्यक्ता, मुरळ्या, भाविणी, जोगतिणी, जटानिर्मूलन, एक गाव एक पाणवठा, आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठान अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली.  मी त्यांना बाबा या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगत होतो.  या दोघांनी तरुणपणी खूप संघर्ष केला होता आपआपसात.  पक्षही वेगवेगळे होते.  भूमिकाही वेगवेगळ्या होत्या.  पण मी या दोघांनी एकत्र एका कार्यक्रमाला यावे म्हणून प्रयत्‍न करीत होतो.  आम्ही तेव्हा समग्र जवळकर प्रकाशित करण्याच्या कामात होतो.  साहेबांनी प्रकाशनाला येण्याचे मान्यही केले होते.  पण एकदा ते म्हणाले, लक्ष्मण, बाबाला सांगा मी जवळकरांबद्दल एके ठिकाणी प्रतिकूल लिहिले आहे.  त्यामुळे मी प्रकाशनाला येऊन औचित्यभंग होईल.  साहेब काही आले नाहीत.  पण बाबांना सांगितल्यावर ते म्हणाले, यशवंतरावच हे भान ठेवू शकतात.  आपण समजून घेतले पाहिजे की साहेबांना जेधे, जवळकर, मोरे, भालेकर, मेघाजीराव लोखंडे अशी कितीतरी पुस्तके म. फुले समता प्रतिष्ठानने छापली.  

फुल्यांच्या कामाला बाबा उजाळा देत असल्याबद्दलही चव्हाणसाहेबांना संतोष होता.  या दोघांनीही मला भारतीय भटकेविमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या स्थापनेसाठी मोलाची मदत केली.  या दोघांमध्ये मी पुढच्या पिढीचा तरुण कार्यकर्ता होतो.  दोघेही माझ्यावर प्रेम करीत.  मी दोघांवर प्रेम करत होतो.  हळूहळू पण यशवंतराव आणि बाबा आढाव माझ्या कामासाठी का होईना एकत्र आले याचे मला फारफार समाधान होते.  यशवंतरावांना मुख्यमंत्री असताना किंवा सत्तेवर नसतानाही माणसे जोडण्याचे जे असामान्य कसब जमले होते ते आमच्या समाजवादी मित्रांनी जपले असते तर आज राजकारणात काही वेगळे चित्र असते हे नक्की.  बाबा आढाव या एका विषयावर आम्ही तास-दीड तास बोललो.  स्वभावातल्या गमतीही मी त्यांना सांगितल्या.  बाबाने लिहिले पाहिजे असे त्यांना फार वाटत होते.  शैली आहे, अनुभव फार मोठा आहे.  ललितही फार छान लिहितील.  त्यांना अंग आहे.  आपल्याविरोधी विचार करणार्‍या माणसांबद्दल आजचे नेते कसे वागले असते.

आम्ही डोंबिवलीला पोहोचलो.  दिनकर गांगलांनी आम्हांला पाहिले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.  सभागृह खच्चून भरले होते.  प्रास्ताविक गांगलांनी केले. त्यानंतर चंद्रकांत घोरपडे बोलले.  त्यांचा माझ्यावर लोभ होताच.  'उपरा' हे आत्मकथन या विषयांवर ते बोलले.  मी प्रास्ताविक स्वरूपात थोडा बोललो.  साहेबांनी उपराच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन केले.  टाळ्यांचा कडकडाट झाला.  साहेब माईकसमोर गेले नि तोंडभरून माझे कौतुक केले.  ते जाहीर सभेत पहिल्यांदाच मला 'जावई' म्हणाले.  लक्ष्मण आमचा जावाई आहे.  मी शशीला मुलगी मानले.  तिच्या वडिलांना भेटलो.  आणि आजच मला लक्ष्मण सांगत होते की बारा वर्षानंतर त्याचे सासूसासरे त्यांच्याकडे येऊन गेले.  मी लेकीचे माहेर पुन्हा तिला मिळवून दिले याचा मला आनंद आहे.  मला मनापासून आनंद झाला होता.  'उपरा'संबंधी ते बोलू लागले.  तरी सारे मराठी भाषिकांसाठी ते बोलत होते.

'केवळ शब्दलालित्य म्हणजे साहित्य ही साहित्याची व्याख्या घेऊन त्याप्रमाणे चालण्याचा काळ संपला आहे.  दलित साहित्याने आपल्याला डुलक्या घेणार्‍या मध्यमवर्गीय वाचकांना कान पकडून, हे जगणेही साहित्यिकच असते हे दाखवून दिले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने लिहीत असलेले हे तरुण आता जातीअंताच्या लढाईचे सैनिक म्हणून रणांगणात उतरले आहेत, हे पाहायला आज ते हवे होते.  लक्ष्मण माने या तरुणाच्या पाठीवर त्यांनी नक्कीच शाब्बासकीची थाप मारली असती.  साहित्य हे एक सामर्थ्य आहे.  कारण ते विचार देणारे आहे.  बंदुकीच्या गोळीने प्राप्‍त होत नाही हे सामर्थ्य.  ते विचारातून येते.  संस्कारातून येते.  आणि हे परिवर्तनाचे काम साहित्य करीत असते.  म्हणून शब्दाचे मोल शस्त्रापेक्षा मोठे आहे.  लोक मला म्हणतात 'उपरा'तल्या शब्दांचे अर्थ आम्हाला समजत नाहीत.  त्यांना मी असे म्हणेन की ज्यांना उपरातले शब्द कळत नाहीत त्यांचे मराठीचे पुनःशिक्षण केले पाहिजे.  उपरातली बोलीभाषा आम्हा सातारकरांची आहे.  तिखट खडर्यासारखी जरा झणझणीत आहे.  पण ती अस्सल आहे.  ती मला माझी भाषा वाटते.  मी लिहिले असते तर ते असेच लिहिले असते.  मराठी भाषेचा एक वेगळा बाज उपराने मराठी भाषेला दिलाय.  म्हणून मी मराठी शारदेच्या गळ्यातील कंठमणी असे उपराचे वर्णन करतो.  ते त्यातल्या शब्दकळांमुळे. दलित साहित्यातल्या शिव्यांबद्दलही तेच आहे.  लक्ष्मण माने मोठे विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे.  ते परवा दया पवारांसह आले होते.  त्यांनी शिव्या नि ओव्या यासंबंधी माझा वर्गच घेतला असे म्हटले तर वावगे होणार नाही.  मराठी भाषा समृद्ध व्हायची तर अठरापगड जातींनी लिहायला हवे.  बारा बलुतेदार, आलुतेदार, कारु-नारू, आणि शेतकरी हे खरे मराठीचे वैभव आहे.  ते समजत नसेल तर ते समजावून घेतले पाहिजे.  शब्दांचे अर्थ हवे असतील तर दारातली भाजीवाली, हमाल, दलित उपेक्षित समाजातली माणसे हीच आम्हा लोकांची डिक्शनरी आहे.  बोलीभाषा जेवढ्या समृद्ध आहेत तेवढे मराठी वाङ्‌मय समृद्ध होईल.  धगधगते विचार, अन्याय आणि दुःख, वेदना, आणि विद्रोह ही या साहित्याची शक्तिस्थळे आहेत.  बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात मोठे योगदान भारतीय संविधान आहेच, शिवाय त्यांनी ज्ञानाकांक्षी समाज घडवण्याचे जे मोलाचे काम केले ते खरे त्यांचे क्रांतिकार्य आहे.  हा वारसा दलित तरुण नेटाने, हिमतीने पुढे नेत आहेत.  त्याचा मला मनापासून आनंद आहे.  कोणता भोगवटा या माणसांच्या वाट्याला आलाय हे बलुतं, उपरा, आठवणीतले पक्षी ही आत्मकथने वाचली म्हणजे कळते.  आपल्या डोळ्यांत अंजन घातल्यासारखे वाटते.  उपराच्या निमित्ताने मला येथे बोलावलेत.  लक्ष्मण माने या तरुण मित्राची कैफियत मराठी माणसापुढे मला मांडता आली.  माझ्या गावातला तरुण मुलगा साहित्य अकादमी मिळवतो, याहून मला आणखी काय हवे.'

कार्यक्रमामध्ये अनेकजण बोलले.  परंतु सभागृह खिशात घातले ते चव्हाणसाहेबांनी.  चव्हाणसाहेब म्हणजे मराठी साहित्याचा चालताबोलता शब्दकोशच होता.  केव्हा-किती बोलावे, काय बोलावे आणि काय बोलू नये, याचे उत्तम भान म्हणजे यशवंतराव चव्हाण.  कार्यक्रम संपवून आम्ही एकेठिकाणी जेवलो.  आम्ही निरोप घेतला नि साहेबांची गाडी मुंबईकडे गेली.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका