• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १५-२५८२०१२-१

जातींचे उकिरडे म्हणजे खेडे.  जी जन्माने मिळते आणि मरणानेही जात नाही, ती जात.  कायद्याने, घटनेने घालवली तरी जी मनामनामध्ये नसानसामध्ये ठासून भरली आहे.  जी जात ज्या गावात बहुसंख्य, ती जात त्या गावची वतनदार मालक.  इतरांनी गुलाम म्हणूनच तेथे जगायचे.  दाती तृण धरून काही गावे धनगरांची, काही गावे मराठ्यांची, काही गावे माळ्यांची, काही गावे वंजार्‍यांची- ज्या गावात जी जात बहुसंख्य ती तिथे राजा.  इतर जातीच्या लोकांनी त्यांची खुशामत करतच जगावे असा रिवाज.  तेव्हा, काळी आणि पांढरे असे गावाचे दोन भाग.  कुणबी म्हणजे शेतकरी आणि अडाणी म्हणजे बिगर शेतकरी.  आम्ही गमतीने त्यांना कुणबी म्हणजे कोणीबी असे म्हणत असू.  ते काही मालक नव्हेत.  वतनदारी मिळवायची असते.  ती मिळते, त्याने तो मूळनिवासी ठरत नाही.  कोणती बी जात आत वसते तो कुणबी.  कुणी म्हणतात कुणमी.  पृथ्वीला, धरणीला नमन करणारा.  तर, तामिळमध्ये कूळ म्हणजे जमीन कसणारा.  कुळथ, कुणबी याचा मूळ अर्थ 'कुल' टॉटेम, कुळाचार.  ज्याचे कुटुंब शेती करते, तो कूळ-कुळवाडी.  थोडक्यात शेतकरी शब्दाचा पर्यायी शब्द कुणबी असावा.  शेतीचा धंदा करणारा, शेतीत बी पेरणारा कुणबी.  पण तो काही जातिवाचक शब्द नाही.  शेतकरी म्हटल्याबरोबर डोळ्यांपुढे उभे राहतात शेती, पिके, गवत, झाडे, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या, मेंढके, शेतकरी, गुराखे, विहिरी, नांगर, कुळव, मोट, मळा, गोफण, तिफण, तिवडे, नाडा, पास, शिवळ, जुपणी, अशा कितीतरी गोष्टी.  एक मात्र खरे, कुणबी पुढे झाल्यावाचून एकही वसाहत झाली नाही.  जगाच्या खाण्यापिण्याचा सारा भार कुणब्याने उचलला.  सार्‍यांच्या उदरभरणाची व्यवस्था केली ती कुणब्याने.  म्हणून खर्‍या अर्थाने तो 'बळीराजा' आहे.  बळीचा वारस आहे.  इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो असे दिवाळीला सारे शेतकरी म्हणतात ते काही उगीच नाही.  उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी अशी म्हण हजारो वर्षे प्रचलित आहे.  आताची स्थिती विपरीत आहे.  शेतकर्‍याला वरायला आता शेतकर्‍यांच्या पोरी तयार नाहीत.  पण तरीही सुप्रिया, खेडे हा जातींचाच समूह राहिला.  बळी तो कान पिळी.  सारी विषम व्यवस्था, जातीच उच्चनीय सार्‍या.  उतरंडीसारख्या, मुख्य गाभा शेती, पण शेती हा काही एकट्याचा धंदा नाही.  त्याला अनेक प्रकारे अनेकांची मदत लागते.  शेतीचा धंदा करणे असो; की खाजगी प्रपंचाची शेती असो, अनेक कामे चालण्यासाठी त्याला शेतीत नसलेल्या अडाण्याची वाढलो आवश्यकता होती.  ज्यांची शेतकर्‍याला सर्वांत जास्त गरज असेल त्या वर्गाला तो म्हणू लागला 'कारू' आणि ज्याची जुजबी मदत लागते, त्याला म्हणू लागला 'नारू'.  कारूचा अर्थ 'प्रत्यक्ष करणारा.'  ज्याची विद्या, कसब, मेहनत कुणब्याच्या धंद्याला आणि खाजगी व्यवहाराला आवश्यक असा धंदा करणारा तो कारू.  आणि ज्याच्या धंद्यावाचून कुणब्याचे नडत नाही, असा धंदा करणारा नारू.  कारूला दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर बलुतेदार असे म्हणतात.  तर नारूला आलुतेदार म्हणतात.  कारू व नारू वेगवेगळ्या जातीचे असतात.  कुणब्याला दोघेही मायमाता म्हणतात.  शेतीच्या व्यवसायात, गावकीच्या सामान्य किंवा विशेष गरजा भागविण्यासाठी कारू-नारू आपल्या जातिगत कसबाचा वापर करून जी कामे करतात, त्याबद्दल त्याच्या कामाचे मोल म्हणून त्यांना प्रत्येक शेतकर्‍याने जो पिकाचा वाटा वंशपरंपरेने द्यायचा असतो त्याला 'बलुते' आणि 'आलुते' म्हणतात.  ज्यांना बलुते मिळते ते बलुतेदार आणि ज्यांना आलुते मिळते त्यांना आलुतेदार.  शेतकर्‍याला ज्या बलुत्याचा जितका उपयोग, त्यामानाने त्याची प्रतवारी होऊन तीन वर्ग पडतात.  अशा वर्गाला कास म्हणतात.  पहिल्या वर्गाला थोरली, दुसर्‍या वर्गाला मधली, तिसर्‍या वर्गाला धाकली कास म्हणतात.  कास म्हणजे गाईचे सड.  कुणबी म्हणजे काय, तर गाय.  बलुतेदार वासरे.  ही वासरे आपापल्या पाळीप्रमाणे कासेला लागणार.  पहिली गरज कुणब्याला बलुत्यांची.  तो थोरला.  तो पहिल्यांदा कासेला लागणार.  पोटभर जोगावणार.  म्हणजे सर्वांत जास्त बलुते त्याला मिळणार.  पहिली पात झाल्यावर दुसरी ओळ सुटणार.  तिला पहिलीपेक्षा कमी दूध मिळणार.  म्हणजे, कमी बलुते मिळणार.  तिसर्‍या ओळीची पाळी शेवटी येते.  त्यामुळे तिचा वाटा सर्वांत कमी.  बलुतेदाराला हक्काने बलुते मागता येते.  उदा. सुतार.  सुताराची सर्वांत जास्त गरज.  त्याला जास्त द्यावे लागणार.  चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी परीट, गुरव, कोळी ह्यांना बलुतेदार म्हणतात.  तर तेली, तांबोळी, साळी, सणगर, शिंपी, माळी, गोंधळी, डवरी, भाट, ठाकर, गोसावी, जंगम, मुलाणी, वाजंत्री, घडशी, कलावंत, तराळ, भोई या अठराजणांना आलुती म्हणतात.  यात बदलही होतात.  स्थानपरत्वे नावे बदलतात.  गरजेनुसार काही बलुत्यांना आलुते मिळते तर काही आलुत्यांना बलुते मिळते.  म्हणजे, गावकुसातले गाव असे अठरापगड जातींत वाटलेले असते.  त्याशिवाय आणखी एक वर्ग आहे.  तो फिरस्त्या वतनदारांचा.  फिरस्ते व्यापारी, तीर्थोपाध्याय, मंदीरवाले, दरगेवाले, मनोरंजन करणारे, भिक्षा मागणारे, चोर्‍या करणारे, तेही शेतकर्‍यांचे खळे मागून खातात.  उपलाने गोसावी, बैरागी, फकीर, जंगम, मानभाव, आंधळे पांगळे भिक्षुक, गोपाळ, कोल्हाटी, गारुडी, तमासगीर, किती सांगावेत ?  हा देशच मुळी कष्ट करणार्‍यांपेक्षा भीक मागणार्‍यांचा आहे.  जो तो उठतो, तो ऐतखाऊ बनतो.  ऐतखाऊ असणे, हाताने काम न करणे, याला ऐशआराम म्हटले आहे.  पोटाचा घेर वाढवून, शेंडीला तूप लावून जगणार्‍यांचा रोल मॉडेल म्हणून वापर करण्याने प्रत्येकाला तूप हवे आहे.  आयता भात हवा आहे.  भात पिकवण्यासाठी हात मात्र कुणी द्यायला तयार नाही.  त्याने सारा कुणबावा देशोधडीला लागला आहे.  सार्‍यांचे भरीत झाले आहे.  शेती परवडेनाशी झाली आहे.  सत्तर टक्के लोक शेतीवर उदरनिर्वाह करत आहेत.  सावकारी बोकाळली आहे.  व्यापारउदीम करणारे पैसेवाले लोक शेतकर्‍याला कसे नाडतात, ते यापूर्वी महात्मा फुल्यांचा संदर्भ देऊन मी तुला सांगितले आहेच.