• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १४-२३८२०१२-१

'अरे, त्याचे काय झाले, मी माझ्या काही कविता छापून त्याचे छोटे पुस्तक केले होते.  त्यावेळी यशवंतरावजी चव्हाणसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  मी कारखान्यात नोकरीला होतो.  साहेब राजकारणातल्या कामासाठी, दौर्‍यासाठी फलटणला येत असत.  त्यांच्या वाचनात माझी कविता आली.  त्यांना ती खूप आवडली, भावली.  त्यांचे खेड्यापाड्यातल्या तरुण पोरांवर फार लक्ष असायचे.  त्यांनी माझी चौकशी सुरू केली.  बबनराव अडसूळ, बबनराव क्षीरसागर यांच्याकडे त्यांनी पहिल्यांना चौकशी केली.  मला बोलवायला सांगितले.  मी गरीब घरचा शेतकर्‍याचा मुलगा आहे, हे त्यांना समजले.  कारखान्यात मला न्यायला लोकही आले.  पण मी काही भेटू शकलो नाही.  त्यावेळी माझे वडील आम्हा सार्‍यांना सोडून गेले होते.  त्यांचे निधन झाल्याने मी फलटणमध्ये नव्हतो.  आरडगावला होतो.  त्यामुळे त्यावेळी भेट झाली नाही.  पण आण्णांनी मला निरोप दिला.  यशवंतराव चव्हाणसाहेबांनी सवडीने मला मुंबईला भेटायला बोलावले आहे.  मला खूप म्हणजे खूपच आनंद झाला.  मी सवडीने मुंबईला गेलो.  साहेब त्यावेळी वर्षा बंगल्यावर राहत होते.  मी थोडा भीतभीत बंगल्यावर गेलो.  समुद्रकिनारी असलेला मोठाच्या मोठा बंगला.  पायर्‍या चढून मी वर गेलो.  एका माणसाने 'काय पाहिजे ?'  असे विचारले.  त्याला मी का आलोय ते सांगितले.  त्याने आत जाऊन सांगितले.  ताई बाहेर आल्या.  त्यांनी छान हसून स्वागत केले.  माहेरचा माणूस !  बसा, म्हणाल्या.  'साहेब बाहेर कार्यक्रमात आहेत.  येतीलच एवढ्यात.  सांगत होते तुमच्या कवितांबद्दल.  खूप आवडल्यात त्यांना.  बसा तुम्ही', असे म्हणून त्या पुन्हा आत गेल्या.  मी कोचावर अवघडून बसून राहिलो.  चहा आला.  मी खिडकीतून विशालकाय समुद्र पाहू लागलो.  बराच वेळ गेला.  दारात खाडखाड आवाज आला.  साहेब गाडीतून उतरले.  पायर्‍या चढून वर आले.  मला पाहिले.  मी माझे नाव सांगितले.  आमची पहिलीच भेट होती.  मी खूपच संकोचलो होतो.  साहेबांनी माझे हात हातात घेतले.  कवितांबद्दल बोललो.  माझे वडील गेल्याचे त्यांना समजलेच होते.  बसा म्हणून आत गेले.  सारी माणसे बाहेरच हॉलमध्ये बसली.  थोड्या वेळाने मला आत बोलावण्यात आले.  जेवणाच्या टेबलाजवळ आता आम्ही दोघेच होतो.  ताई आत काहीतरी करत होत्या.  साहेबांनी अत्यंत आस्थेने बोलायला सुरुवात केली.  'पंचायत समितीच्या निवडणुका आहेत.  तुम्हाला तुमच्या गटातून उभं राहायचं आहे.  बाकी सारं मी पाहतो.  तुमच्या खांद्यावर जरा मोठा बोजा टाकायचा आहे.  लोकसंपर्क सुरू करा.  कामाला लागा.'  जेवण झाले.  मी निघणार, म्हटल्यावर ताई बाहेर आल्या.  म्हणाल्या, 'साहेब म्हणतील त्याला नाही म्हणू नका.  काम नीट करा.'  मी दोघांचे आशीर्वाद घेतले.  घरी आलो.  कामाला लागलो.  ताईंनी खूप मदत केली.  मी निवडून आलो.  साहेबांनी तालुक्याची जबाबदारी दिली.  मी सभापती झालो.  'पंचायत राज' चा कायदा आला.  सामान्य घरातला एक म्हणून सभापती झाला.  गेली चार वर्षे सभापती म्हणून काम करतो आहे', भोईटेसाहेब आम्हा पोरांना सांगत होते.  चव्हाणसाहेब आणि त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.  तेवढ्यात कुणीतरी मोठा माणूस त्यांना भेटायला आला.  आम्ही निरोप घेऊन बाहेर पडलो.  आम्ही भोईटेसाहेबांचे सख्खे शेजारी होतो.  पण कुतूहलाने पाहण्यापलीकडे आमचा फारसा संबंध आला नाही.  त्यांच्या कामाबद्दल मात्र खूपच कुतूहल होते.  एके दिवशी पहाटे आम्ही सारे एकमेकांच्या अंगावर पडू लागलो.  आम्हाला वाटले भुताचाच फेरा आला.  सारे बाहेर पळालो.  पेट्या वाजत होत्या.  बाहेर सारे लोक सैरावैरा पळत होते.  काय होतंय कळत नव्हतं.  प्रत्येकजण म्हणत होता, मोठा हादरा बसला.  भूकंप झाला.  कोयनेचा भूकंप.  घरांना तडे गेलेले.  जुन्या घरांची पडझड झाली.  भोईट्यांच्या दारात माणसांची गर्दीच गर्दी.  ते लोकांना समजावत होते.  आम्ही जामच घाबरलो होतो.  चारआठ दिवस तरी कुणी खोलीत झोपत नव्हतं.  सगळे बाहेर झोपत होतो.  सारं गावच बाहेर झोपत होते म्हटलं तर वावग होणार नाही.  

पुढे निवडणुका लागल्या.  कृष्णचंद्र भोईटे विरुद्ध मालोजीराजे नाईकनिंबाळकर अशी लढाई आली.  आमच्या शाळेच्या ग्राऊंडवर सभा होती.  दिलीप आणि त्याचे शहरातले सहकारी सभेच्या स्टेजची कामे करीत होते.  आम्ही कुतूहलाने पाहत असायचो.  सभेला यशवंतराव, किसनवीर, बाळासाहेब देसाई, दादासाहेब जगताप, आमच्या संस्थेचे अध्यक्ष नाना बेडके आणि जिल्ह्यातले मोठे पुढारी स्टेजवर जमले होते.  समोर प्रचंड जनसमुदाय होता.  आमच्या शाळेचे मैदान भरून गेले होते.  'मनमोहन राजवाड्याच्या विटा काढून वाडा जमीनदोस्त करू, राजेशाही संपली आहे.  हे राजांनी ध्यानात घ्यावे,' असे किसनवीर म्हणाले.  याचा राग येऊन गावात दगडफेक झाल्यानं शहराला पोलिसी छावणीचं रूप आलं.  गर्दीत कोण काय बोललं ते समजलं नाही.  पण ही लढाई भोईट्यांनी जिंकली.  राजा हरला, प्रजा जिंकली.  त्यानंतर फलटणच्या राजकारणाच्या चाव्या सामान्य कुटुंबातल्या शेतकर्‍याकडे गेल्या.  यशवंतरावांनी ही लढाई जिंकली.