• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १३-२०८२०१२-२

तेव्हाचं 'श्रीराम हायस्कूल' म्हणजे आताचं 'यशवंतराव चव्हाण हायस्कूल.'  उघड्या बोडक्या माळावर नव्यानं सुरू झालेलं.  एका बाजूला नीरेचा उजवा कालवा, श्रीराम कारखाना तर दुसरीकडे नुसती तरवडाची झाडं.  संस्थेत नेहमी वेगवेगळे कार्यक्रम होत असत.  मी पोटामागे धावत व्हतो.  शाळा न बुडवता जे काम जमेल तेवढं करायचं.  हॉटेलमध्ये कपबश्या उचलल्या, पावबटर विकलं, वर्तमानपत्रं टाकली.  त्यातच माझा सारा वेळ जात व्हता. त्यानं राजकारण, यशवंतराव आसलं सारं माझ्या डोक्यातूनच गेलं व्हतं.  आईवडील, गावोगाव तर मी कधी सोमंथळीत, तर कधी फलटणमध्ये.  खरं तर सुप्रिया, मला सांगणारं, शिकवणारं, वळण लावणारं असं कुणीच नव्हतं. आसं वाग आन् तसं वागू नको, असं जवळचे मित्र सोडले तर कुणीच सांगितलं नव्हतं.  त्यानं मी कसाही भरकटलो असतो.  पण माझ्या मित्रांमुळे, आईमुळे मी तसा भरकटलो नाही.  पहाटे लवकर उठून पावबटर विकायचं, त्यानंतर ९ वाजता पुणे गाडी यायची, तिच्यातून वर्तमानपत्रांची पार्सल यायची.  तेव्हा मी पेपर टाकत व्हतो.  हे सारं आकरा वाजेपर्यंत संपवायचं.  आकराला शाळा भरायची.  प्रार्थना संपता संपता कसंतरी मी शाळंच्या मैदानात पोहोचायचो.  पोरं वर्गात गेलेली असायची.  लेट जाणार्‍यांना एका रांगेत उभं केलं जायचं.  प्रभुणे आमचे पी.टी.चे शिक्षक होते.  अत्यंत कडक, बुटका माणूस.  देहानं थोडासा स्थूल.  भव्य कपाळ, मोठाले डोळे, हातात पी.टी.च्या वेळी वाजवायची शिट्टी.  त्या शिट्टीला लांब गळ्यात अडकवण्यासाठीची जाड दोरी.  त्या दोरीची माझी रोज भेट व्हायची.  हातावर छड्या आणि उघड्या पायांच्या पिंढर्‍यांवर सपासप दोरीचे फटके.  मी रोज उशिरा शाळेत जायचो.  रोज मार खायचो.  तोवर वर्ग सुरू झालेले असायचे. मी दारात उभा राहिलो की शिक्षक 'या....' असं काही म्हणायचे, की सारा वर्ग हसायचा.  मी मान खाली घालून गपचीप मागच्या बाकावर जाऊन बसायचो.  माझ्या मनानं कोवळ्या वयातच मला असे मानपान पचवायला शिकवले आहेत. मला त्याचं फार काही वाटायचं नाही.

एके दिवशी काय झालं, कुणास ठाऊक ?  प्रभुणेसरांनी नेहमीसारखं मला शिक्षा केली, ती मी नेहमीसारखी सोसली.  हाताला मुंग्या आलेल्या.  हात काखेत घालून कळवळलो.  प्रभुणेसर मारायचे थांबले आणि मला म्हणाले, 'मान्या, रोज असा उशिरा का येतोस ?  काय अडचण आहे तुझी ?  मला सांग बघू.'  मी गप.  'अरे खरंच, शिक्षा होणार नाही. खरं काय ते सांग.'   मग मी सांगत गेलो.  माझी मान खाली होती.  सर ऐकत व्हते. मी सांगता सांगता डोळे पुसत व्हतो.  मैदानावर आता आम्ही दोघंच व्हतो.  सरांनी मला अचानक पोटाशी धरलं.  मी वर पाहिलं, सरांच्या डोळ्याला धारा व्हत्या.  रोज मला मारणारे ते मारकुटे सर रडत होते !  'बाळ, तू लहान आहेस, पण माझ्या हातून फार मोठी चूक होत होती.  तू रोज मार खातोस पण मला का सांगितलं नाहीस ?'  सरांनी माझ्या हाताला धरलं. थेट वर्गात नेलं.  वर्गशिक्षकांची परवानगी घेतली आन् वर्गात गेलो.  मला वाटलं, आता वर्गात धुलाई होते की काय !  पण झालं भलतंच.  सरांनी मला टेबलवर उभं केलं.  क्षीरसागर सर माझे वर्गशिक्षक होते.  ते बाजूला उभे होते.  प्रभुणेसरांचा चेहरा रडवेला.  पोरं गंभीर.  प्रभुणेसरांनी मी करीत असलेले कष्ट सार्‍या वर्गातल्या मुलांना सांगितले.  आपण याला शिक्षा केली, या अपराधी भावनेचा उल्लेख केला.  देवानं मला सद्बुद्धी दिली आणि यानं मला सांगितलं, बरं झालं, यापुढे मी त्याला मारणार नाही.  मी टेबलावरून खाली उतरलो.  सारी मुलं गंभीर होती.  आपण याला चिडवतो, हसतो, चेष्टा करतो याचं सर्वांना वाईट वाटत होतं. क्षीरसागरसरही खजील झाले.  प्रभुणेसरांनी माझी वरात आता संस्थेच्या ऑफिसमध्ये नाना बेडकेंकडे नेली.  झालेला सारा प्रकार सांगितला.  त्यांनी पाठीवरून हात फिरवला.  शाबासकी दिली आणि शाळा सोडू नको, लागेल ती मदत देण्याचं सांगून मला बाहेर पाठवलं.  प्रभुणेसरांशी बराच वेळ ते काही बोलत होते. सर बाहेर आले.  त्यावेळी मी केसरी दैनिकाचं वर्गणीदारांन वितरण करीत असे.  प्रभुणेसरांनी रूद्रभटांना सांगून माझी कामाची वेळ ठरवून दिली आणि मी मॅट्रिक होईपर्यंत सरांनी मला कधीही शिक्षा केली नाही. मुलांनी वेडंवाकडं वागवलं नाही. उलट, नारायण बोडके, रामदास रासकर यांच्याबरोबरच धनंजय भोसले, दिलीप भोसले, इकबाल मेटकरी या शहरातील मुलांनीही मला खूप प्रेमानं वागवलं.  यशवंतरावांच्या टोपीचं टोक आणखीनच तिरकं झालं असं मला वाटलं !

ती.  सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका