• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १०-१५०७२०१२

पत्र - १०
दिनांक १५-०७-२०१२

चि. सुप्रिया,
सुप्रेम जयभीम.

यशवंतराव हे साताराकर्‍यांसाठी पडलेलं सुंदर स्वप्न व्हतं.  ज्या वयातल्या या आठवणी मी तुला सांगतो आहे ना, तो काळ मोठ्या उपलथापालथींचा व्हता.  सामाजिकदृष्ट्या तर तो फारच क्रांतिकारक होता. त्यातलीच एक आठवण तुला सांगतो.

मी तेव्हा पाचवी-सहावीत असेन.  गावांतली तरुण पोरं कुठंतरी निघाली व्हती.  चावडीवर मालट्रक घेऊन उभा राहिला होता.  मोठी माणसं, तरुण पोरं भराभरा ट्रकमधी चढाया लागली.  आपण लहान त्यामुळे, कुणीच ट्रकजवळही येऊ देत नव्हता.  आपल्या पिल्लांत येणार्‍या दुसर्‍या कोंबडीच्या पिल्लाला कोंबड्या चोची मारून हाकलवतात, तसं हाकलीत व्हते.  ट्रकच्या म्होरच्या बाजूला काँग्रेसचा तिरंगी झेंडा लावलाता.  टपावर नेहरूंचा, गांधींचा आणि यशवंतरावांचा भला मोठा फोटो लावलाता.  बगता बगता ट्रक गच्च भरला.  आम्ही बारकी पोरं ट्रकच्या भोवताली 'ही काय भानगड आहे ?'  अशा कुतूहलानं पाहत व्हतो.  गावात आलेला पहिला मालट्रक. तांबड्या रंगाचा. पुढं आलेलं त्याचं निमुळतं तोंड.  तोंडाला रंग वेगळा.  दोन्ही पुढच्या चाकांवर पत्र्याचं झाकान.  त्याला लागून मडगार्ड, तर गाडीच्या वरच्या बाजूला चौकोनी गाळ्यागाळ्याची जाळी.  त्यात खोलवर गेलेलं भोक.  दोन्ही बाजूला दिवे.  त्याला लावलेल्या गोल काचा.  बारीक डोळं बसवावंत तसं त्या काचांवर दोन डोळं.  म्होरं मडगार्डला बांधल्यालं पक्षाचं झेंडं.  सारं गाव मालट्रक बगायला जमल्याला.  ज्यो त्यो त्या धुडाचं कौतिक करीत व्हता.  कुणी बावकाडाचं म्होरंल त्वांड धरीत वर चढत होता, तर कुणी मागल्या फाळकुटाला लोंबकाळत वर चढीत व्हता.  खरं तर मला वर चढता येत नव्हतं.  आपण लहान आहोत, याचं मनाला फारच वाईट वाटत व्हतं.  बगता बगता मला खूप रडाया यायला लागलं.  त्यात बी जवा माझ्या वयाच्या पोरांना त्यांचे बाप पटापट उचलून वर ट्रकमध्ये घ्यायला लागले, तेव्हा आपला बा लांबूनच ट्रक बगतोय, त्याला बी कुणी जवळ येऊ देत नव्हतं हे दिसलं आन् मी गप झालो.  मोठी माणसं हायेत.  पाटलांच्या माणसांच्या आपण बरूबरीचं न्हाय.  त्यांची बरूबरी करायची न्हाय.  आपलं किती बी बरूबर आसलं तर तसं म्हणायचं न्हाय.  नाही पाटील, तुम्ही म्हणतावं तसं, तुमचीच लाल.  आमची काळी, आसं म्हणून जगायचं.  आईनं सांगितलेलं हे रोजच्या रोज पाठ करायला लागायचं.  त्यांची शेंबडी पोरं सोन्याची, त्यान्ला आवंजावं करायचं.  आमचा बा, त्याला त्याचं भारी कौतिक.  त्या पोरांना 'रावसाहेब, धाकलं धनी' म्हणायचा.  ह्या धनी माझ्या वर्गात शिकत असायचा.  मैंदाळ राग यायचा.  पण करायचं काय ?  'पायरीनं राहावं लागतं.  त्यांच्याच आसर्‍यानं र्‍हायायचं.  त्यांच्याच बांधावरनं चालायचं तर त्यांना नमूनच राहायचं.'  अशीच सारी स्थिती होती.  तशात ट्रकचा ड्रायव्हर खाली उतरला.  हातात लांबच्या लांब लोखंडी सळी होती.  टोकाला जराशी वाकडी.  त्यानं ती अलगद जाळीच्या भोकातून आत घातली आन् गरागरा फिरवली.  आन् भाकभाक धूर फेकीत मोटार सुरू झाली.  इंजिन सुरू झालं.  ड्रायवर केबीनमधी बसला आन् ट्रक हालला.  म. गांधी की जय, पंडित जवाहरलाल नेहरू की जय, यशवंतराव चव्हाण की जय, अशा घोषणा देत मालट्रक गावाबाहेर गेला.  गर्दी पांगू लागली तशी मोठी माणसं आपसात बोलू लागली.  मालट्रकनं उडवलेला धुरूळा डोळ्यांत, डोक्यात गेलेला.  कुणी कुणाच्या डोळ्यांत फुकून काडीत होता.  तर कुणी हाळहाळत होता.  'च्या बायला, म्या बी गेलू आसतो पाटणला.  पर कसं जाणार ?  उसाला पाणी पाजायचा, बैलं येत्याल उस फोडायला...'

बा म्हणाला, 'कसं दिसत्यात वं नेहरू, तात्या.'

'आरं आता म्या तरी कवा बगीतल्या.  म्हनीत होतो जावं बगायला. पर कसंच काय आन् फाटक्यात पाय !  पावणं येणार हाईत नव्हं लेकीला बगायला.  धराण काय पुन्यांदा बगीन,'  आसं मनातचं बोलावं तसं बोलत तात्या निघून गेलं.  पण माझ्या डोक्यात किडं लागलं वळवळायला.  ही धरणं काय आसतं ?  मी लागलो बाच्या मागं.  'धरण म्हंजी काय आसतं ?'  बानं दिली एक ठिवू न कानाखाली.  'जा भाड्या खेळ जा.  मला का कळतंया ?  येवढं ग्यान आसतं तर कशाला माझी घाशीत बसलो असतो.'

मी मुकाट्यानं खेळायला पळालो.  पण, धरण काय डोळ्यांतनं जाईत नव्हतं.  खेळत व्हतो,  तर पोरंबी एकमेकास्नी तेच विचारत व्हती.  कुणालाच काय ठाव नव्हतं.  मग सुताराचा बाळ्या म्हणाला, 'आरं पर हांडीलानं इंजिन कसं सुरू झालं ?  म्हणीत खोटाखोटा पाईप हातात धरून कंबरतनं लागला की गोलं फिरायला.  तसं आख्ख्या दिस आम्ही ट्रक, इंजिन, ड्रायव्हर, स्टेअरींग, धरण हे नवे शब्द जसे पाठ करावेत, तसे फेर धरून आम्हा पोरांच्या खेळात पिंगा घालत व्हते.