यावर मी म्हणालो, साहेब, हे सारे आपणच तर उभे केलेत. या प्रत्येकाच्या बोटाला धरून पाय टाकायला शिकवलेत. यावर ते म्हणाले, होय लक्ष्मण. हे सारे खरे आहे, म्हणून तर काळजी वाटते ना ? माझी पहिली निवडणूक मी लढवली. पण एक पैसाही खर्च केला नाही. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीचा खर्च वाढत गेला. आणि आता हे सारे निवडणुकांचे तंत्र पाहिले की निराश व्हायला होते. निघालो होतो देवाच्या आळंदीला आणि पोहचलो चोरांच्या आळंदीला, काय करावे ? लोकशाही नावाचे केवळ कलेवर खांद्यावर वागवत नाही. लक्ष्मण, या निवडणुका आपल्या हातातून गेल्यात. त्या आता सेवेपेक्षा पैसेवाल्यांनी पळवल्या आहेत. हे सत्तेचे सूत्रही आता आपल्या हातातून निसटले आहे. सत्ता पुन्हा तिच्या मूळ स्वभावावर गेली. ती पुन्हा उर्ध्वगामी झाली. मी मोठ्या कष्टाने तिला अधोगामी केले होते. विकेंद्रीकरण, विकेंद्रीकरण म्हणजे काय ? सत्ता सर्वात शेवटच्या माणसाजवळ जाणे, सामान्यातला सामान्य माणूस सत्ताधारी होणे, म्हणजे लोकशाही ना ? आजचे सारे भेसूर चित्र पाहिल्यावर मी काय, एस.एम. काय व्यथितच आहोत. त्यांचा मार्ग माझा मार्ग एक नाही हे मलाही कळते, पण आमचे ध्येय एकच आहे. तुम्ही म्हणता हे सारे सोडून द्या. लक्ष्मण, आता मला कराडाच्या कोर्टात वकीलीही करता येणार नाही. जमीनजुमला, इस्टेटीच्या भानगडीत मी पडलो नाही. त्याने शेतीवाडीही नाही नि त्यातले आता मला काही करताही येणार नाही. आणि खरे सांगू, राजकीय पुरुषाला निवृत्ती नसते. अखेरच्या श्वासापर्यंत राजकारणी माणसाला इच्छा असो वा नसो; राजकारणच करावे लागते. आज राजकारण हे सत्ताकारणच झाले आहे. काहीही करा, निवडून या. बास्स ! झाली लोकशाही. मोठ्या तळमळीच्या लोकांनी उभा केलेला पक्ष. सोसलेले तुरुंगवास, इंग्रजांच्या जाचाला, जुलुमाला न जुमानता गोळ्या छातीवर झेलून हसतहसत मृत्यूला कवटाळणारी कोवळी मुले, गांधी-नेहरूंनी उभा केलेला पक्ष. मी आयुष्यात काँग्रेसनिष्ठा कधी सोडली नाही. प्रसंग कसेही आले तरी काँग्रेसबाबत तडजोडही केली नाही. त्यामुळे माझ्या मानपानापेक्षा पक्षा मोठा आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनीच काहीशा जाणतेपणे, अजाणतेपणे मी म्हणेन ते पूर्व या व्यक्तीवादी भूमिकेने पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. पक्ष संघटना मोडीत निघाली आहे. हे सारे सावरले पाहिजे. त्यासाठी आपण तेथे असलो पाहिजे. जमेल ती पक्षाची, जनतेची सेवा केली पाहिजे. आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. हे राष्ट्र फार मोठे आहे. आमच्या तरुण सहकार्यांना हे पटत नाही. माझ्या मानापमानाचा विचार ते जास्त करतात. मी तसे करीत नाही. मी मानापानाच्या पलिकडे गेलो आहे. मला दुःख याचेच आहे की आम्रवृक्षाची कमाई आगंतुक वाढलेली वनस्पती खाते आहे.
मी मध्येच म्हणालो, आपल्याला बांडगुळ म्हणायचे आहे का ?
नाही. तुमच्यासारखे कठोर शब्द मी नाही वापरत. पण माझ्या म्हणण्यातला अर्थ काहीसा तसाच आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो, ही व्याधी जुनीच आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मी पहिल्या ध्वजवंदनेस हजर राहण्यासाठी १४ तारखेलाच मुंबईला पोचलो. सकाळी लवकर उठून ध्वजवंदनेसाठी निघालो. सारी मुंबई आझाद मैदानाकडे निघाली होती. सातारा जिल्ह्यातल्या ज्या लोकांनी ब्रिटिशांच्या खबर्याचे काम केले होते, आम्ही कार्यकर्त्यांना पकडून दिले होते असे बरेचजण पांढर्याशुभ्र परिट घडीतले कपडे घालून, जाकिट घालून, टोकदार गांधी टोप्या घालून आमच्यापुढे पळत होते. आता हे का राजकारण करणार, माझ्या मनात पाल चुकचुकली. मी आईच्या बोटाला धरून अनेकदा पंढरपूरला गेलो आहे. तिथे जसे हौसे, गौसे, नवसे जमलेले असतात तसाच प्रकार या ठिकाणीही दिसत होता. स्वातंत्र्याचे विरोधक झेंडावंदनेला आघाडीवर ! तेव्हापासून निष्ठावान कार्यकर्त्यांची पांगापांग सुरू झाली. राजकारण म्हणून आम्ही लोकांनी ही हाराळी वाढू दिली हे नाकारण्यात अर्थ नाही.
मी म्हणालो, साहेब, पण आता तर ही हाराळी नि माजलेला कुंदा या वयात कसा निपटणार ?
खरे आहे, पण प्रयत्न तर केलाच पाहिजे. आपल्या हातून होते तेवढे करायचे. लक्ष्मण, मी काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी केले नाही. लाचारीने कुणाच्या दारात उभा राहिलो नाही. हां, आपण काही साधूसंन्याशी नाही. जी जी मिळेल ती संधी नाकारली नाही. संधी मिळाली तिचे सोने केले. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानला आणि त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते केले. तसेही मी तीसपस्तीस वर्षे सत्तेच्या जागेवर बसून काम केले. त्यामुळे विरोधक मला लोभी ठरवतील. ते त्यांचे मत आहे. मी एकदाही पराभूत झालो नाही. ४६ ची निवडणूक सर्वात साधी. सर्वाथाने चांगली. त्यानंतरच्या प्रत्येकच निवडणुकीच्या वेळी वेगवेगळे चित्र असे. सारे विरोधक मला पाडण्यासाठी सर्व डावपेच लढवीत असत. माझा प्रचारक मीच असे. माझी संयमित भाषणशैली, साधे साधे बोलणे, प्रांजळपणा ही माझी शक्ती होती. या बळावर, माझ्या मित्रांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बळावर मी अजिंक्य ठरलो. कधी मोठ्या फरकाने तर कधी थोड्या फरकाने मी विजयीच होत आलो. नाशिकला तर बिनविरोध निवडून आलो. मी कायम अपराजित राहिलो. अगदी परवाची निवडणूक तर तुम्ही पाहिलीच आहे. संयुक्त महाराष्ट्रासारखी वादळेही पाहिली. पण माझ्या लोकांनी माझ्यावर अलोट प्रेम केले. विश्वास दखवला. मी कधी दारू वाटली नाही, पैसे वाटले नाहीत, जेवू घातले नाही. माझे कार्यकर्ते हीच मोठी माझी शक्ती होती.