सुप्रिया, डांबरी रस्त्याचे वैभव न्यारे असते हे खरेच. पण ती वाट तिला पाहिजे तिकडे नेते. आपल्याला हवे तिकडे ती जात नाही. आपल्याला तिच्यामागून जावे लागते. पायवाटेचे तसे नाही आपली पायवाट आपल्याला हवे तिकडे नेते. म्हणून मी पायवाटेने जातो. कोण काय म्हणतो याचा विचार करीत बसत नाही. स्वतःच्या बुद्धीला पटेल ते करतो. 'सत्यासत्याशी मन गेले ग्वाही, मानियले नाही बहुमता.' हा तुकोबारायांनी दाखवलेला मार्ग. या मागौने मी जात आलो. निंदा नालस्ती करणारे करतच राहतात. त्याने हैराण होण्याचे कारण नाही. आपल्या मार्गावरून आपण चालत राहावे. कोणाशी भांडण करू नये. हा संस्कार सेवादलात मिळाला. मी यल्लाप्पा, साहेबांशी त्यांच्या दिवानखान्यात बोलत होतो. डॉ. बी.डी. पिंपरकर हे मुंबईतले प्रख्यात डॉक्टर, तीन तीन महिने अपाँईन्टमेंट मिळत नसे. साहेबांचे स्नेही. साहेबांनी त्यांची वेळ घेतली होती माझ्यासाठी वेळ होता तोवर चहा झाला. साहेब तेव्हा इंदिरा काँग्रेसमध्ये परत निघाले होते. आम्हा तरुण मंडहींना साहेबांची ही भूमिका पटत नव्हती. साहेबांना इंदिराजींनी दारात ताटकळत ठेवले होते. ज्या माणसाने इंदिरा गांधींसाठी, मिळत असलेले पंतप्रधानपद सोडण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला होता. इंदिराजींना पाठिंबा देऊन पंतप्रधान केले होते. त्या बाईंनी साहेबांना असे काँग्रेसच्या उंबर्यात उभे केले होते. ज्यांच्या जगण्याचा सारा ध्यास काँग्रेस होती. ज्यांनी उभे आयुष्य काँग्रेसला वाहिले होते, ज्यांनी पक्षासाठी हाडाची काडे केली होती, त्या यशवंतराव चव्हाण नावाच्या काँग्रेसनिष्ठ राष्ट्रीय नेत्याला दारात उभे केले होते. त्याचा राज्यातल्या जनतेला फार राग आला होता. त्यामुळे सारे सांगत होते, साहेब, नका जाऊ बाईंच्या काँग्रेसमध्ये. त्या तुम्हाला सन्मानाने वागवणार नाहीत. त्या फार दुष्ट आहेत. हट्टी आहेत. अहंकारी आहेत. मी साहेबांना विनवीत होतो. साहेबही फार व्यथित होते. ते राजकारणावर आमच्याशी फारसे बोलत नसत. राजकारण आले की ते फार अबोल होत. तोंड कोठे बंद ठेवावे, कोठे काय बोलावे, काय बोलू नये आम्हाला काहीच गमवायचे नसते. त्याने आम्ही बोलतो. तसे त्यांनीही बोलावे असे वाटे, पण ते घट्ट ओठांचे होते. राजकारण त्यांच्या जगण्याचा मोठा अध्याय होता. ते राजकारणाशिवाय राहू शकत नव्हते. लोक त्यांना त्यासाठी नावे ठेवीत. सत्तेशिवाय त्यांना जगताच येत नाही असे म्हणत. वर्तमानपत्रे टीका करत होती. मी बोलत होतो. ते शांत होते. मला म्हणाले, लक्ष्मण, मला आता लोक काय म्हणतात व वर्तमानपत्रे काय म्हणतात हे सारे समजते, पण आपण मुख्य प्रवाहात राहिले पाहिजे असे माझे मत आहे. देशाने इंदिराजींच्या काँग्रेसला मान्यता दिली आहे. आपण देशाबरोबर असले पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे. दुसरे असे, की व्यक्तिगत भावनेच्या आहारी जाऊन राजकारणातले निर्णय करू नयेत. आपल्या निर्णयाने लाखो कार्यकर्त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा नि मग निर्णय घ्यावा. मोठ्या कष्टाने, परिश्रमाने आम्ही लोकांनी हजारो संस्था उभ्या केल्यात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या संस्था करतात. लाखो लोकांच्या या संस्था मी मोठ्या परिश्रमाने सत्तेचा टेकू देऊन उभ्या केल्यात. बहुजनांच्या या संस्था सत्तेच्या ताकदीवर उभ्या आहेत. बाई फार हट्टी आहेत. राजकारणात सत्तेसाठी त्या काहीही करू शकतात. सत्तेचे पाठबळ गेले तर त्या या संस्था मोडून टाकतील. एका व्यक्तीच्या मानपानापेक्षा या संस्था खेड्यापाड्यातली आपली माणसे, त्यांच्या संस्था जगणे मला मोलाचे वाटते.
यावर उसळून मी म्हणालो, साहेब, आपण म्हणता ते खरे, पण एस. एम. नानासाहेब नाहीत का सत्तेच्या बाहेर ? तेही चालवतातच की संस्था. यावर साहेब म्हणाले तेही सुप्रिया आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणाले, लक्ष्मण, त्यांची गोष्ट वेगळी आहे. हजारो वर्षांची परंपरा त्यांच्या समाजाला आहे. स्वयंशिस्त काय असते त्यांना माहीत आहे. तत्त्वनिष्ठ राहूनही ते काम करू शकतात. त्याचे कारण त्यांना फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हजारो वर्षे त्या समाजाकडे ज्ञानाची परंपरा आहे. सत्ता, प्रशासन, शासन त्यांच्या तर हातात आहे. त्यामुळे एकट्या एस.एम. नी काहीही भूमिका घेतली ना तरी त्या समाजाचे फारसे बिघडत नाही. याउलट सारे आपले आहे. आपली माणसे, आपला समाज, आपल्या संस्था, अजूनही बाल्यावस्थेत आहेत. त्यांना सत्तेच्या आधाराची गरज आहे. सत्तेशिवाय यांना उभेच राहता येणार नाही. सत्तेचा भक्कम आधार होता म्हणूनच सहकारात, शिक्षणात, कृषी-औद्योगिकीकरणात हजारो संस्था आज आपल्या माणसांनी उभ्या केल्यात. त्या चालविण्याची कोणतीही परंपरा नाही. प्रशासनातला अनुभव नाही. सत्तेचे बदलते स्वरूप तर हैराण करणारे आहे. आपल्या नव्या नेतृत्वाकडे पाहून काय आशा करावी ?