अभिनंदन ग्रंथ - मराठी भाषिकांचे आशास्थान- 1

मराठी भाषिकांचे आशास्थान

- ग. त्र्यं. माडखोलकर, संपादक, 'तरुण भारत', नागपूर

महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. यशवन्तराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निर्मित्ताने त्यांच्यासंबंधी गुणगौरवाचे चार शब्द लिहिण्याचा सुयोग मला लाभला, याबद्दल आनंद वाटतो. कारण, या संधीचा फायदा घेऊन मला कांही प्रश्नांचा उलगडा करता येईल; व कांही गोष्टी मोकळेपणाने सांगता येतील.

श्री. यशवन्तराव चव्हाण यांना, १९५३ सालच्या सप्टेंबरमध्ये ज्यावेळीं नागपूर करार झाला, त्यावेळीं मीं प्रथम पाहिले. त्या कराराच्या पूर्वतयारीसाठीं अखिल महाराष्ट्रांतील ज्या कार्यकर्त्यांना निमंत्रणे देण्याची सूचना संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष श्री. शंकरराव देव यांनी मला केली होती, त्यांत श्री. यशवन्तराव हे प्रमुख होते. ता. २७ सप्टेंबर रोजी सकाळी मेलनें श्री. भाऊसाहेब हिरे यांच्याबरोबर ते नागपूरास आले. स्टेशनवर श्री. हिरे यांनी त्यांच्याशी माझा परिचय करून दिला. त्यांचा मुक्काम जुन्या मध्यप्रदेश सरकारचे त्या वेळचे शिक्षणमंत्री, संयुक्त महाराष्ट्राचे कट्टे पुरस्कर्ते श्री. पु. का. देशमुख यांच्याकडे होत. करारासंबंधींच्या वाटाघाटी जुन्या मध्यप्रदेश सरकारचे त्या वेळचे विकासमंत्री, संयुक्त महाराष्ट्राचे कट्टे पुरस्कर्ते श्री. रा. कृ. पाटील यांच्या बंगल्यावर ता. २७ आणि २८ सप्टेंबर अशा दोन दिवस झाल्या. स्टेशनवर उतरल्यापासून तों वाटाघाटींची बैठक संपेपर्यंत मी सतत दोन दिवस या मंडळीबरोबर होतों. तथापि नमस्कारापलिकडे यशवंतरवांशी झालेल्या परिचयाची मजल कांही त्या प्रसंगी जाऊ शकली नाहीं. पण दोन दिवस झालेल्या या वाटाघाटींत त्यांचे स्वभावविशेष मात्र माझ्या निदर्शनाला येऊन गेले. श्री. शंकरराव देव यांची भूमिका साहजिकच अशी होती कीं, विदर्भ आणि मराठवाडा यांचा संतोष साधण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राने या कराराच्या बाबतींत जास्तींत जास्त देण्याची दिलदार वृत्ति दाखविली पाहिजे. त्यांची भाषाच मुळी, संपन्न स्थितींत असलेल्या वडील भावाने आपल्या धाकट्या भावाला जवळ करण्यासाठी जरूर तें सर्व कांही केलें पाहिजे आणि दिलें पाहिजे, अशा प्रकारची होती. बॅ. रामराव देशमुख, स्वामी रामानन्दतीर्थ आणि डॉ. आबासाहेब खेडकर हे विदर्भ आणि मराठवाडा यांची बाजू, तर श्री. हिरे, श्री. चव्हाण, श्री, कुंटे प्रभृति पश्चिम महाराष्ट्रांतील कार्यकर्ते हे त्या भागाची बाजू मांडीत होते. अशा प्रकारच्या वाटाघाटींत प्रत्येक मुद्दयाची सर्व बाजूंनी छाननी करण्यासाठी बुद्धीची कुशाग्रता जितकी अवश्य असते, तितकाच त्या वाटाघाटी यशस्वी होण्याकरितां प्रसंगी जुळतें घेण्यासाठी तिचा उदार लवचिकपणाहि अवश्य असतो. यशवंतरावांच्या ठिकाणीं हे दोन्ही गुण असल्याचा प्रत्यय त्या दिवशी झालेल्या वाटाघाटींत मला आला.

त्यानंतर त्यांच्याशी माझी दुसरी भेट होण्याचा योग १९५६ च्या ऑक्टोबरमध्यें, म्हणजे द्विभाषी मुंबई राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी सुमारें दोन महिने, अचानक आला. या वेळीं त्यांचा मुक्काम जुन्या मध्यप्रदेश सरकारचे त्या वेळचे स्वास्थ्यमंत्री श्री. कन्नमवार यांच्याकडे होता. दुपारीं अडीचच्या सुमारास आमची भेट होऊन एकान्तांत सुमारें तासभार अगदीं मनमोकळेपणाने आमचें बोलणें झालें. या बोलण्यांत त्यांची राजकीय दूरदृष्टि, मनाचा पक्केपणा, स्व-पर-बलाबल पारखण्याची सावधगिरी आणि परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन टिपण साधण्याचें कौशल्य या सर्व गुणांची पुरेपूर जाणीव होऊन ते अव्वल दर्जाचे मुत्सद्दी आहेत, असा माझा ग्रह झाला. मी त्या वेळच्या राजकारणांत श्री. शंकरराव देव यांच्याबरोबर होतो, - म्हणजेच श्री. भाऊसाहेब हिरे यांच्या बाजूला होतों. यामुळें त्या वेळी झालेल्या संभाषणांत त्यांनी माझ्यापुढें मांडलेले मुद्दे आणि केलेलें तत्कालीन गुंतागुंतीचे विश्लेषण जरी मला बव्हंशी पटलें, तरी त्यांच्या मतानुसार वागायला मी मोकळा नव्हतो. मात्र त्यांच्याशी झालेलें हे संभाषण मी लगेच श्री. पु. का. देशमुख यांना सांगितले; व त्यांनाहि ते बहुतेक पटलें. पण ते तर मंत्री आणि विदर्भांतील प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते असल्यामुळे, माझ्याहि पेक्षा जास्त बांधलेले होते; व एकदा दिलेला शब्द मोडावयाचा नाहीं, असा त्यांचा बाणा असल्यामुळें, ते त्या वेळच्या राजकारणांत शेवटपर्यंत श्री. भाऊसाहेब हिरे यांना निष्ठेने चिकटून राहिले.