अभिनंदन ग्रंथ - राजकीय सहयात्री - 6

प्रादेशिक राज्यरचनेला काँग्रेसच जबाबदार

प्रांतवाद व जातिवाद हीं भारतीय राजकारणाची मुख्य अंतस्थ भयस्थाने होत. ही भयस्थानें धोका देणार नाहीत याविषयी ज्याचे मन कायम सावध राहील तोच भारतीय राजकारणाची धुरा निर्विघ्नपणे वाहूं शकतो. जातिवादाला व प्रांतवादाला जी व्यक्ति, गट व पक्ष वश होतो, त्याला भारतीय राजकारणांत विधायक रुपाचें सत्तेचें यशस्वीपणे चालविण्यांत कधीहि यश लाभणें शक्य नाही. कारण राजकारणाची सामाजिक पार्श्वभूमि मजबूत व स्थिर राखणे ही राजकीय नेतृत्वाची एक मुख्य जबाबदारी राज्यशास्त्रद्वारा निश्चित झालेली आहे. ही जबाबदारी ओळखणारा राजकारणी माणूस महाराष्ट्रात यशवंतरावांच्या रुपाने कित्येक वर्षांनी पुढें आला आहे.

प्रादेशिक राज्यरचनेचा अहवाल बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रात जी खळबळ उडाली त्याला प्रथम जबाबदार काँग्रसचें नेतृत्वच होय, ही गोष्ट स्पष्ट आहे. भाषावार प्रदेशरचनेच्या प्रश्नाला महत्त्व त्यांनीच प्रथम आणलें व तेंच त्यांच्यावर उलटलें. भाषावार प्रदेशरचना ही अनेक-भाषिक भारतीय राष्ट्रीयत्वाच्या विकासास पूरक नाही, हें राजकीय तत्त्व केव्हाहि त्यांच्या फारसें लक्षात आलें नाही. त्याचप्रमाणे प्रादेशिक भाषांची वाढ करण्यास भाषावार राज्यरचनेची आवश्यकता नाही, हीहि गोष्ट त्यांच्या लक्षात कधी आली नाही; त्यांचे वैचारिक दौर्बल्यच प्रादेशिक राज्यरचनेच्या अहवालानें उघडकीस आलें. मध्यवर्ती सिद्धांत म्हणजे अनेकभाषिक राष्ट्रीयत्व होय, ही गोष्ट स्वीकारल्यावर भाषिक राज्यांची रचना गौण ठरविणेंच प्राप्त होते. हे व्यावहारिक राजकारणाचें दर्शन काँग्रेसनेत्यांना लवकर झाले नाही. या प्रमादापासून अर्थातच महाराष्ट्रीय नेतेहि दूर राहूं शकले नाहीत. काँग्रेसची निष्ठा विरुद्ध प्रांतरचना, असा पेचाचा प्रश्न उत्पन्न झाल्यास मी काँग्रेसच्या व राष्ट्रीय ऐक्याच्या बाजूचाच राहीन, ही गोष्ट यशवंतरावांनी फार अगोदर जाहीर करून टाकली. महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेस की इष्ट प्रकारची प्रांतरचना असा पेच उभा राहिल्यास काय ठरवावयाचें हें स्वत:च्या मनास कधीहि विचारलें नाही. किंवा भाषिक प्रश्नाला किती महत्त्व द्यावयाचे हेंहि ठरविलें नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणांत अग्रभागीं असलेल्या अनेक व्यक्तींची फार कुतरओढ झाली. यशवंतराव या प्रसंगी अगदी धिमेपणाने बेताबाताने पावलें टाकीत चालले. त्या बाबतींत त्यांच्या पाठीशी सल्लाव धरी देणारे मित्रहि उभे राहिले. पक्षसंघटनेच्या मर्यादांचा भंग होणार नाही असे ते वागले. या एका महत्त्वाच्या गोष्टीमुळेच ते अखेरीस मुख्यमंत्रिपदाप्रत पोचूं शकले. मध्यंतरी प्रादेशिक राज्यरचनेच्या भानगडी उभ्या राहिल्या नसल्या तर यशवंतराव कोठे असते? यांचे उत्तर सोपें आहे. हे मुंबई मंत्रिमंडळांत महत्त्वाचे राजकीय धोरण संभाळून राहिले होते. दमादमाने, पांचदहा वर्षाच्या काळांत केव्हा तरी, त्यांच्या वाट्यात हें मुख्यमंत्रिपद येणें प्राप्तच होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसमध्ये त्यांचे वजन वाढत होतें. दुस-या क्रमांकावर ते उभे होते. पहिल्या क्रमांकावर येण्यास थोडा वेळ लागला असता, इतकेंच म्हणतां येतें.

संथ आणि सावध उदारमतवादी

त्यांच्या राजकीय जीवनाचे धागेदोरे समजण्यास त्यांच्या मनाची व खाजगी जीवनक्रमाची माहिती घेणें जरूर आहे. ज्याचें मन पूर्वग्रहदूषित नाही त्याला यशवंतरावांचे मन व खाजगी चरित्र सहज उलगडेल असेंच आहे ते खोल मनाचे गृहस्थ आहेत, असें म्हटलें जातें. खोल म्हणण्यापेक्षा संथपणे विचार करणारे व सावधपणे जपून पावलें टाकणारे गृहस्थ आहेत, हें म्हणणें अधिक जुळेल. त्यांचा स्वभाव पाताळयंत्री आहे, असाहि एक आरोप केला जातो; त्यांतहि कांही तथ्य नाही. अत्यंत मोठ्या व सत्तारूढ पक्षाचे एक प्रमुख कार्यकर्ते आपण आहोंत, याची जाणीवच त्यांना गंभीर बनविते. त्यामुळेच सर्व गोष्टी जपून व ताळतंत्र ओळखून बोलाव्या वा कराव्या, असें त्यांना वाटत असतें. मंत्रिमंडळाचे एक सदस्य या नात्याने कमी बोलणें हेंच पथ्याचे आहे, असें त्यांना वाटत असतें. पाताळयंत्रीपणाला लागणा-या स्वभावाची घडण फार ती घडण जात्याच प्राप्त व्हावी लागते. मित्रमंडळींच्या त्यांच्या वर्तनासंबंधी अनेक अपेक्षा लवकर सफल होत नाहीत किंवा यशवंतरावांच्या अडचणीहि मित्रांच्या लक्षांत भरत नाहीत, म्हणून ते खोल मनाचे आहेत असा भास होतो.

यशवंतराव संवेदनशील व भावुक वृत्तीचे गृहस्थ आहेत. केवळ वस्तुवादी व व्यवहारी बुद्धीच्या बळावरच ते भावनांवर नियंत्रण ठेवूं शकतात. व्यावहारिक व वस्तुनिष्ठ दृष्टिकोणाला ते फार महत्त्व देतात. त्यामुळेच ते भावनांचा तोलहि संभाळूं शकतात. उदाहरणार्थ, निवडणूक प्रचारांत शेतकरी मतदारांपुढे मताची याचना करतांना ते मोठ्या खुबीने मतदारांच्या मनांत प्रवेश करतांना असें म्हणतात: