• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ - राजकीय सहयात्री

राजकीय सहयात्री

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

श्री. चव्हाण यांच्यासंबंधी १९३० सालापासून न पुसलेल्या अशा अनेक आठवणी सांगतां येतील. येथे त्याच्या राजकीय चरित्राचा व राजकीय चारित्र्याचा अर्थ ज्यांच्यामुळें उलगडेल अशा कांही मोजक्याच सांगतों. गेल्या तीन वर्षांतील घटना तर सर्वांच्या समोर ताज्या आहेत; त्याबद्दल विस्तार करण्याची येथे गरज नाही.

१९३० सालीं सविनय कायदेभंगाच्या आंदोलनांत मी हिरिरीने प्रचार करीत हिंडत होतों. माझ्या प्रचाराला रंग व आदेश कराड येथील कृष्णाकाठच्या वाळवंटांतील सभांच्यामध्ये विशेष आला. त्यावेळी मायक्रोफोन नसे, तरी केवळ कराड शहरांतीलच नव्हे तर सभोवतालचे खेड्यांतीलहि लोकांचे लोट संध्याकाळीं मोठ्या उत्साहाने माझ्या सभेला जमत व अंधारांत परतत. त्यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण हे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी होते. त्या सुमारासच राजकारणाकडे आकृष्ट होऊन सामील झालेल्या विद्यार्थ्यांपैकी म्हणून मी त्यांना ओळखूं लागलों.

लहान वयांतील प्रौढ समंजसपणा

ही ओळख १९३४-३५ च्या सुमारास दृढ झाली. त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वावर परंपरागत राष्ट्रवादी विचाराची छाप फार खोल होती. तळापासून तों शिखरापर्यंत जीं महत्त्वाचीं माणसें काँग्रेसमध्ये प्रामुख्यानें वावरत होतीं त्यांच्या विचारांत राजकीय स्वातंत्र्याला निषेधात्मकच अर्थ होता. ब्रिटिशांचे राज्य नष्ट करणें हीच भावना प्रभावी होती. सामान्य जनतेच्या जीवनांतील क्रांति किवा सामान्य माणसाची सामाजिक व आर्थिक बंधमुक्ति हा राजकीय स्वातंत्र्याचा खोल आशय बनला पाहिजे, अशी वैचारिक बैठक परंपरागत राष्ट्रवादाला तोपर्यंत लाभली नव्हती. हा नवा आशय हृदयाशीं बाळगून काम करूं पाहणा-या नव्या विचाराच्या काँग्रेसजनांची संख्या त्या वेळी फार लहान होती. सातारा जिल्ह्यांतील काँग्रेसजनांत राष्ट्रीय क्रांतीचा असा नवा अर्थ पाहणारा जो नवा लहानसा गट तयार झाला त्यांत माझ्याबरोबर जी विशीच्या आंत-बाहेर असलेली तडफदार तरुण मंडळी सामील झाली त्यांत श्री. यशवंतराव अधिक चमकून दिसूं लागले. मनाने प्रौढ व वयाने लहान असे उमेदीने भरलेले हे तरुण गृहस्थ या आमच्या नव्या गटाचें नेतृत्व आंत दाखल होतांच थोड्याच वर्षात करूं लागले. हें सातारा जिल्ह्याबाहेरच्या त्या वेळपासून काँग्रेसमध्ये असलेल्या मंडळींनाहि कदाचित् एकदम पटणार नाही. मी स्वत: प्रयाग, बनारस, कलकत्ता येथे तत्वज्ञान, धर्मशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांवर संस्कृत पंडितांच्या अनेक विद्वान् परिषदांमध्ये चर्चा व वादविवाद बरोबरीच्या नात्याने करीत असें, परंतु प्रत्यक्ष सातारा जिल्ह्याच्या काँग्रेसचें नेतृत्व श्री. चव्हाणांचेच निर्वावादपणें मान्य करून त्या वेळी काम करीत होतों. जहाल विचारांच्या या नव्या गटाच्या हातीं अनेक वर्ष जिल्हा काँग्रेस कमिटी होती, हें पाहून १९३६ मध्यें काँग्रेसच्या प्रांतीत ( व मध्यवर्तीसुद्धा?) नेत्यांकडून चक्रे फिरवली गेली. उजव्या गटाचे या जिल्ह्यांतील प्रमुख कै. भाऊसाहेब सोमण होते. त्यांचे कल्याण पद्धशिष्य श्री. बुवा गोसावी यांनी सातारा जिल्हा कमिटींत उजव्या गटाचें बहुमत केलें. नव्हे, त्यांना करावें लागलें. त्याकरिता खूप शिकस्त करावी लागली व थोड्याच मतांनी या क्रांतिवादी गटाच्या हातांतून जिल्हा काँग्रेसची सूत्रे उजव्या गटाच्या हातीं गेलीं. या प्रसंगी डावा गट हलकल्लोळ करील व दंगल माजवील अशी अपेक्षा उजव्या गटाची होती. परंत वादविवाद किंवा कसलीहि गरमागरमी न होतां हे परिवर्तन घडलें तें पाहून श्री. बुवा गोसावी यांनी माझ्यापाशीं याबद्दल आश्चर्य प्रकट केले. संघटनेची शिस्त ही राजकारणांतील एक पवित्र गोष्ट आहे; याची जाणीव त्या लहान वयांतच दाखविण्याचा श्री. चव्हाणांचा पहिला प्रसंग हा होता. समंजसपणा पुष्कळ वेळां जन्मसिद्धच असतो. समंजसपणा, पुष्कळ अनुभव घेऊन, ज्यांना शिकावा लागतो त्यांना राजकारणी यशाकरितां पुढील जन्माची वाट पाहावी लागते.