• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ - गेल्या शतकाचा वारसा 3

भारतीय राष्ट्रवादाचे दोन प्रकारचे आविष्कार उत्पन्न झालेले दिसतात. एक निधर्मी किंवा ऐहिक (Secular)  व दुसरा आध्यात्मिक राष्ट्रवाद होय. पाश्चात्य संस्कृतीच्या झगझगाटाने दिपलेल्या व ब्रिटिश राज्याचें येथील आगमन ही शुभ दैवी घटनाच जणू काय होय, असें मानणा-या नवशिक्षितांनी ब्रिटिशांच्या उदारमतवादाचें, लोकशाही जीवनपद्धतीचें, वैज्ञानिक किंवा यांत्रिक सुधारणांचे मन:पूर्वक स्वागक केलें.  ब्रिटिश राज्यपद्धति हळूहळू सुधारेल, लोकानुकूल व लोकाभिमुख हळूहळू होईल व तिची परिणति भारतीय प्रजातंत्रांत होऊं शकेल. असें तिचें मनोगत आहे, असें समजून ब्रिटिशांच्या मनधरणीचा कार्यक्रम या नवसुशिक्षिततांनी अंगिकारला. या नवशिक्षितांचा हा ऐहिक (Secular) राष्ट्रवाद समाजसुधारणेच्या कार्यक्रमाला अधिक महत्त्व देत होता. हिंदी लोकांची समाजपद्धति मध्ययुगीन. मागासलेली आणि लोकशाही राज्यकारभार पेलण्यास असमर्थ असल्यामुळे तिच्यांत बदल होणें आवश्यक आहे, ब्रिटिशांच्या राज्याच्या प्रतिकारापेक्षा आपण आपलेच सुधारलेले बरें, असा अंतर्मुखी दृष्टिकोन बाळगणारा नेमस्त राष्ट्रवाद प्रथम उद्भवला. या नेमस्त राष्ट्रवादाला चालना येथे आलेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांतील अनेक उदारधी ह्यूम, बेडरबर्न इत्यादि मंडळींनी दिली. प्रामुख्याने महाराष्ट्रांतील नवशिक्षितांचे अग्रणी, प्रौढ व व्यापक विचारांचे धुरंधर व दूरदर्शी असे न्या. मू. महादेव गोविंद रानडे व त्यांचे मित्र, शिष्य व प्रशिष्य यांनी या नेमस्त राष्ट्रवादाचा अंगिकार व प्रचार केला. ब्रिटिश राज्यच हळूहळू राजकीय सुधारणेच्या संस्था निर्माण करील, त्याकरिता त्याचें मन वळविलें पाहिजे, असा या संप्रदायाचा विचार होता.

राष्ट्रवादाचा प्रखर व प्रतिकारवादी आविष्कार भारतीय अध्यात्मवादी अधिष्ठानावर झाला. पाश्चात्यांची संस्कृति, राज्यपद्धति व विद्या यांचा संपूर्ण महिमा अंगिकारणारा सुशिक्षित मनुष्य एकप्रकारें भारतीय मनाची पराभूत मनोवृत्ति अधिक दृढ करीत होता, असें दिसूं लागलें होतें. आम्ही पूर्ण मागासलेलों, उच्च दर्जाच्या राज्यसंस्थेस अपाक्ष असे लोक आहोंत, अशा विचाराने स्वातंत्र्याची भावना पूर्ण दडपली गेली होती. कोणत्याहि राष्ट्राला दुस-या राष्ट्रावर राज्य करण्याचा नैतिक अधिकार नाही अशा त-हेचा संदेश ग्रहण करण्यास पराभूत मन तयार नसतें. आम्ही भारतीय नालायक आहोंत, अशा प्रकारची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सूचना नेमस्त राष्ट्रवाद करीत होता. या सूचनेने येथील एका सुशिक्षितांच्या गाटांत अस्वस्थता निर्माण केली; त्याचा स्वाभिमान जागृत झाला. त्याने मोठ्या धीराने या सनातन राष्ट्राच्या दीर्घ अशा संपूर्ण भूतकाळावर चौफेर नजर टाकली आणि एकदम त्या भूतकाळाचें दिव्यदर्शन घडलें व त्यांतून आश्वासन देणारा दिव्य आदेश बाहेर आला. "नव्हे, नव्हे ! आमच्यापाशी सर्व मानवजातीला धन्य करणारा आणि भौतिक बंधनांतून मुक्त करणारा असा कांही खोल विचार आहे. भारताकडे मानवजातीला मुक्त करण्याचें असें कांही एक कर्तव्य ईश्वराने सोपविलें आहे." असें त्या आदेशाचें सार होतें. लोकमान्य टिळक हे या अध्यात्मवादी राष्ट्रवादाची स्थापना करणारे पहिले महापुरुष होत. योगी अरविंद घोष यांनी लोकमान्यांच्या पासूनच प्रेरणा घेऊन निश्चयाने ज्ञानसमाधि लावली आणि आधुनिक ज्ञानविज्ञानांच्या पलीकडे असलेलें असें दिव्य आध्यात्मिक जीवनाचें दर्शन देण्याचा अधिकार भारतालाच आहे, आमचें हेंच एक अलौकिक वैशिष्टय आहे; मानवजातीला तारणारा संदेश आमच्या अध्यात्मवादांत आहे. आम्ही परकीय राज्याचीं बंधनें तोडलींच पाहिजेत. कारण, आमचें मानवजातीमधील स्थान अत्यंत उच्च आहे, त्याकरिता परकीय राज्याचें बंधन तोडणें हे आमचें दैव संकेताने ठरलेलं पहिलें कर्तव्य आहे. आध्यात्मिक संस्कृतीची अपार संपदा याच देशांत अनेक युगांच्या पूर्वी निर्माण झाली. त्या संपदेची आठवण बुजली म्हणून आम्ही परतंत्र झालों, विवस्वान मनू, भगवान कृष्ण इत्यादि कर्मयोगी लोकपालाचा भगवत् गीतेमध्ये साररुपाने संग्रहित झालेला असा हा आध्यात्मिक संदेश लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, रामतीर्थ, योगी अरविंद व महात्मा गांधी यांनी भारताला दिला. टिळक, अरविंद व गांधी हे आध्यात्मिक राष्ट्रवादाचे प्रेषित झाले. या राष्ट्रवादाच्याच अनुसंधानाने लो. टिळकांनी "आधी सामाजिक की आधी राजकीय' या प्रश्नाचा निकाल लावला. आम्ही सामाजिक सुधारणा स्वराज्यानंतर बघून  घेऊं; आधी राजकीय बंधमुक्तीच झाली पाहिजे. त्याकरिता राजकारणावरच सर्व शक्ती केंद्रित करावयास पाहिजे, हा विचार प्रभावी झाला.