• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ - गेल्या शतकाचा वारसा 2

गांधीचें राष्ट्रव्यापी आंदोलन

ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज इत्यादि संघटना मूलगामी व सामाजिक परिवर्तन करणारा विचार देऊन आता मागे पडल्या आहेत. ते केवळ लहानसे संकुचित मुमूर्षु गट याच रुपाने आज दिवस आहेत. आजच नव्हे तर गेलीं चाळीस वर्षें त्यांना ही अशी अवदशा प्राप्त झाली आहे. परंतु या संघटनांनी ज्या धार्मिक व सामाजिक आंदोलनांची मुहूर्तमेढ रोवली तीं आंदोलनें व्यापक स्वरुपांत फलित झाल्यासारखी किंवा निदान प्रगत व परिणत झाल्यासारखी दिसत आहेत. गेल्या शतकांत निर्माण झालेल्या संघटनांपैकी एकच व्यापक संघटना टिकाव धरून अधिक परिणामकारक स्वरुपांत या देशांत प्रचंड रुपाने विस्तार पावलेली दिसत आहे. ती म्हणजे अखिल भारतीय राजकीय संघटना (काँग्रेस) होय. धार्मिक व सामाजिक चळवळींना संकुचित संस्थारुप गटांच्या चौकटीबाहेर आणण्याचें कार्य गांधीयुगापासून सुरु झालें. धैर्यशाली धर्मसुधारकांचा व समाजसुधारकांचा शूर नेता या दृष्टीने महात्मा गांधीकडे पाहिल्यास त्यांचे नेतृत्व अधिक उठावदारपणे डोळ्यांत भरतें. गांधींच्या नेतृत्वाखाली गेल्या शतकांतील सुधारकांचे महत्त्वाचे कार्य उत्कर्षाची परिसीमा गाठीत असलेलें दिसतें. स्त्रियांच्या समानतेचा ध्यास फुले यांच्यापासून कर्वें यांच्यापर्यंतच्या सुधारकांनी घेतला होता. स्त्रियांच्याविषयी गांधींची कर्तबगारी गेल्या शतकांतील सुधारकांच्या स्वर्गवासी आत्म्यांस मोक्षाचा आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. म. गांधींनी शेकडो स्त्रियांना समाजकारण व राजकारण यांत महत्त्वाचे काम दिलें.  त्यामुळे स्त्रियांचे व पुरुषांचे समानत्वाचें नातें स्थापित झालें.

राजकीय व सामाजिक आंदोलनांचा सांधा

गेल्या शतकांतील राजकीय स्वातंत्र्याची चळवळ टिळकयुगांत सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या चळवळीपासून विलग पडली होती. लो. टिळकांनी त्यांच्यांतला संबंध छेदून टाकला होता. महादेव गोविंद रानडे व तत्कालीन अन्य राजकीय नेते यांनी राजकीय आंदोलन व सामाजिक आंदोलन यांचा सांध निर्माण केला होता; तो लोकमान्य टिळक यांनी तोडून टाकला. न्या. रानडे यांच्या सामाजिक परिषदेचा मंडप ज्या दिवशी टिळकांच्या अनुयायांनी जाळला त्याच दिवशीं या संबंधविच्छेदावर शिक्कामोर्तब झाले. राजकीय प्रश्नाच्या पोटांत सामाजिक प्रश्न गर्मित असतो व सामाजिक प्रश्नांत राजकीय प्रश्न अंतर्भूत असतो याचें भान टिळकयुगांतील राजकीय आंदोलनास राहिलें नाही. म. गांधीनी हा तुटलेला संबंध पुन्हा सांधला. एवढेंच नव्हे तर हिंदुसमाजाच्या रचनेंतील सर्वांत आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने पीडित व दलित असा वर्ग कोणता ते दाखवून देऊन त्याच्या उद्धाराची चळवळ हाताशीं घेतली. अस्पृश्यतानिवारणाच्या प्रश्नावर १९१८ सालीं लो. टिळकांनी आपलें निश्चित मत लेख नोंदण्याचें टाळलें; परंतु त्याच वेळी म. गांधीनी आपल्या साबरमतीच्या आश्रमांत अस्पृश्य-कन्या स्वत:च्या मुलीप्रमाणे सांभाळली; व अस्पृश्यतेच्या उच्छेदाच्या चलवळीला देशव्यापी स्वरुप आणलें. जातिभेदाचें उच्चाटन करण्याकरिता स्वत:च्या आश्रमांत रोटीबेटी व्यवहाराचे सर्व निर्बंध मोडले. एवढेच नव्हे तर आपल्या पुत्राचा ब्राह्मणकन्येशी विवाह घडवून आणला. हिंदु-मुस्लिम एकतेकरिता त्यांनी आत्मसमर्पण केलें. अशा रीतीने राजा राममोहन रॉयपासून तों महात्मा गांधीपर्यंत सामाजिक समतेचा इतिहास उत्कर्षाचा मार्ग आक्रमीत स्वराज्याच्या कालखंडात प्रविष्ट झाला.

राष्ट्रयत्वाचे दोन आविष्कार

ब्रिटिश राज्याचा प्रतिकार करण्याची वृत्ति ब्रिटिश राज्य स्थापन झाल्यानंतर क्रिया-प्रतिक्रिया न्यायाने फार थोड्या अवधींत वर डोकें काढूं लागली. त्याचें कारण पाश्चात्य शिक्षण हें मुख्य होय. पाश्चात्य सुधारणेचें सामर्थ्य अपरंपार व जबरदस्त आणि ब्रिटिश राज्याची पकड अत्यंत पक्की असतांना त्याची बंधने तोडून बाहेर पडण्यास धीर देणारा प्रभावशाली ध्येयवाद या पाश्चात्य शिक्षणाच्या माध्यमातून येथील मनांत प्रादुर्भूत झाला. राष्ट्रीयत्व किवा राष्ट्राभिमान हें या ध्येयवादाचें नामाभिधान होय. राष्ट्रीयत्व हा आधुनिक युगाच्या उद्याबरोबर पाश्तात्य देशांत प्रगट झालेली राजकीय निष्ठा होय. ब्रिटिश राज्य हिंदुस्थानांत पक्कें बनत असतांना या ध्येयवादाला पुरीं शंभर वर्षे सुद्धा झाली नव्हती.  राष्ट्रवाद हा गेल्या दोनशे वर्षांच्या अवधींतच उद्भवलेला विचार होय. पाश्चात्य संस्कृतींतून आलेला हा विचार एका पाश्चात्य राष्ट्राच्या साम्राज्याचें सामर्थ्य हरण करणारा विचार ठरला. ब्रिटिश साम्राज्याने आपल्याबरोबर आणलेल्या या प्रभावी विचारस्त्रामुळेच भारतांत ब्रिटिश साम्राज्यशाही पराभूत झाली, आणि हेंच विचाररास्त्र मागासलेल्या आशियाई व आफ्रिकन भूप्रदेशांत पसरून पाश्चात्य साम्राज्यशाहीचा अंत करण्यास कारणीभूत झालें आहे. पाश्चात्य साम्रज्याशाही आता या पृथ्वीवरचे अखेरचे क्षण मोजीत पडली आहे.