• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ - महाराष्ट्रांतील बुद्धिवाद-1

महाराष्ट्रांतील पहिली पिढी या दृष्टीने बुद्धिवादी होती असें माझें स्पष्ट मत आहे. इंग्रजांचे अनुकरण करणारे म्हणून त्या काळांत त्यांची टवाळी झाली असली तरी कालाने त्या टवाळीवर पडदा पाडला आहे. शिल्लक राहिलें आहे तें त्यांचे कार्य. लोकहितवादींचा काळ बुद्धिवादास अनुकूल नव्हता. त्या काळामध्ये ब्राह्मणधर्माची कठोर तपासणी करण्याचें धैर्य त्यांनी दाखविले. या देशांतील जातिभेदाची उतरंड मोडल्यावाचून समाजांत लोकशाही येणार नाही असेंहि बजावण्यास त्यांनी कमी केलें नाही. इतकेंच नाहीं तर या देशांत शिक्षणाचा प्रसार झाला आणि पार्लमेंटसारखा राज्यकारभार सुरु झाला की इंग्रज राज्यकर्त्यांना आपलें चंबुगबाळें आवरून निघून जावें लागेल हें भविष्य शंभर वर्षांपूर्वी वर्तविण्याइतपत त्यांनी द्रष्टेपणहि दाखविले. तीच गोष्ट न्यायमूर्ती रानडे यांची. अनेक चळवळी आणि संस्थांना त्यांनी जन्म दिला. असें करतांना त्यांनी आपल्या जीवनाला विवेकांचे वळण लावण्याचा जाणिवेने प्रयत्न केला हें त्यांच्या व्याख्यानांवरून आणि कार्यावरून सिद्ध होण्यासारखें आहे. पश्चिमेकडून आलेल्या नवविचारांचे स्वागत करूनहि न्यायमूर्ति त्या विचारांच्या आधीन गेले नाहीत. उदाहरणार्थ, ते सामाजिक सुधारणावादी असले तरी निरीश्वरवादी किंवा अज्ञेयवादी नव्हते. मराठेशाहीसंबंधी त्यांनी केलेलं विवेचन ही तर त्यांच्या दृष्टेपणाची साक्षच होय. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ना. गोखले आणि कै. आगरकर यांनी महाराष्ट्राला बुद्धिवादाची शिकवण दिली. याच कालखंडांत म.ज्योतिबा फुले यांचाहि गौरवपूर्वक उल्लेख करावयास हवा. कारण त्याचें कार्य या लोकांपेक्षाहि खडतर होतें. सुशिक्षितांपेक्षा अशिक्षितांमध्ये प्रतिक्रिया तीव्र स्वरुपाच्या होतात आणि विरोध प्रखर होतो. त्याला न जुमानता त्या समाजात बुद्धिवादाची मुहुर्तमेढ रोवणें लहानसहान काम नव्हे.

- त्या बुद्धिवादाचें स्वागत झालें नाहीं.

या बुद्धिवादाचें महाराष्ट्राने कशा प्रकारें स्वागत केलें ? इतिहासाच याचें चोख उत्तर देईल. बुद्धिवादी महाराष्ट्राने या साक्षेपी बुद्धिवादाला सूक्तासूक्त मार्गाने विरोध केला ही गोष्ट महशूर आहे. राजकारणांत त्यांना मवाळ म्हणून हेटाळण्यांत आलें,समाजकारणांत त्यांची स्वेच्छाचारी म्हणून निंदा झाली आणि धर्मकारणांत त्यांना धर्मलंड म्हणून संबोधण्यांत आलें. परंपरा, रुढि, ग्रंथगत विधिनिषेध आणि शिष्टसम्मत आचारविचार यांना विरोधी विचार सांगणारास समाजाचा असा प्रखर विरोध सहन करावा लागतो हें खरें आहे. पण मग अशआ समाजास बुद्धिवादी समाज म्हणतां येत नाही. गतानुगतिक चाकोरींतून जाणा-या इतर प्रांतांपेक्षा महाराष्ट्रांचें वेगळेंपण दाखविण्यासाठी आपण बुद्धिवादाचा आश्रय करीत असतों. तो या इतिहासावरून महाराष्ट्राला किती लागू पडेल याबद्दल शंका वाटते. शिमग्याच्या सणांत कै. आगरकरांची त्यांच्या जिवंतपणी तिरडी बांधली गेली हें काही साक्षेपी बुद्धिवादाचें लक्षण नाही. कारण साक्षेपी बुद्धिवादाची अशी एक अपेक्षा आहे की, कितीहि प्रखर मतविरोध असला तरी शत्रुत्वात त्याचे रुपांतर होतां कामा नये. ती त्याची लक्ष्मणरेषा होय. आजच्या रुढ परिभाषेंत अनुवाद करून भावनांच्या हुल्लडबाजींत त्याचें रुपांतर होतां कामा नये असें सांगता येईल. लोकहितवादीपासून सर्व बुद्धिवाद्यांची महाराष्ट्रांत अशी हुररेवडी झालेली आहे आणि परवापरवापर्यंत ती होत आलेली आहे.

चहाच्या पेल्यांतील वादळें, ग्रामण्ये आणि सामाजिक सुधारकांची निंदानालस्ती या प्रतिक्रिया अव्वल इंग्रजी अमदानीच्या पहिल्या पंचवीस वर्षात आढळतात. वास्तविक आपल्या परंपरागत कल्पनांची व विचारांची फेरतपासणी करण्याचें काम सुशिक्षितांकडून अपेक्षित होतें, परंतु महाराष्ट्रांतील सुशिक्षितांनी ही इतिहासदत्त कामगिरी बजावली नाहीच; पण ज्यांनी या कार्यास आरंभ केला त्यांची हेटाळणी मात्र केली.

कै. आगरकरांनी महाराष्ट्रांतील सुशिक्षितांना उद्देशून केलेलें कळकळीचें आवाहन ही याची विदारक साक्षच होय. याच काळांत आमच्या प्राचीन विचारसंपदेचे पुनरुज्जीवन होऊं लागलें होतें. त्या प्राचीन विचारांची विवेंचक तपासणी सुरु झाली होती. पुराणें, आख्यायिका, दंतकथा यांच्या आवरणाखाली दडलेल्या ऐतिहासिक सत्याचें संशोधन सुरु झालें होतें. त्यांतून आपल्या प्राचीन संस्कृतीचें शास्त्रीय मूल्यमापन करण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. पण डॉ. भांडारकर, तेलंग आदि विद्वानांनी सुरु केलेल्या या प्रयत्नाचें तरी महाराष्ट्रांत यशोचित स्वागत झालें होतें काय? दुर्दैवाने याचेंहि नकारात्मक उत्तर द्यावें लागेल.