• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ -स्वातंत्र्य साधनांत भारत महाराष्ट्र संबंध

स्वातंत्र्य साधनांत भारत महाराष्ट्र संबंध

प्रा. न. र. फाटक

प्राचीन काळापासून महाराष्ट्राला देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या यशस्वी प्रयत्नाचें व रक्षणाचें भाग्य लाभलें आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकांत उत्तरेकडून आलेल्या एका स्वारीचा प्रतिकार महाराष्ट्राने केल्याचा वृत्तान्त इतिहासांत सांगितला जातो. हा वृत्तान्त अतिशय जुना व कांहीसा अस्पष्ट तपशीलाचा आहे. त्यानंतर नऊशे वर्षांनी महाराष्ट्राने सा-या भारताला चमत्कारांत लोटणा-या एका महापुरुषाला जन्म देऊन भारताच्या सा-या इतिहासाला जें वळण लावलें, तें सातव्या शतकांतील वृत्तान्ताप्रमाणे पुसट स्वरुपाचें नाही. हा महापुरुष म्हणजे पुण्यश्लोक  शिवाजी महाराज हें सहज लक्षांत येण्यासारखें आहे. जेव्हा मोगल-बादशाहीची सद्दी औरंगजेबाच्या कारभाराने कळसास पोचली होती, तेव्हा महाराष्ट्राच्या डोंगरांत शिवाजी महाराजांनी त्या जगद्विजयी ( आलमगीर ) मोगली प्रतापाला तुच्छ लेखणारें स्वातंत्र्याचें निशाण उभारलें आणि अनेक संकटांच्या झंझावातांतहि तें निशाण पडूं तर दिले नाहीच, पण अधिक उंचीवर नेऊन फडकवीत ठेविलें. महाराजांच्या निधनानंतर महाराष्ट्रांतील सामान्य जनतेच्या मर्दुमकीने त्या निशाणाची प्रतिष्ठा वाढविली. महाराष्ट्राच्या पराक्रमाने खिळखिळ्या झालेल्या मोगल-बादशाहीचा कारभारच कालांतराने मराठ्यांच्या हातीं आला. हा कारभार हाती घेतेवेली भारतामधील पुष्कळशा महत्त्वाकांक्षी हिंदुमुसलमान राजे-नबाबांचे दात खट्टे झाले. त्यांनी व त्यांच्या पक्षपाती इंग्रजांनी - कारण इंग्रजी सत्तेच्या विस्ताराला व प्रभावाला खरा व मोठा अडथळा बहुत वर्षे घडला - मराठ्यांच्या राज्यविस्ताराचें जें विकृत वर्णन लिहून ठेवलें व शिकविलें त्याचा पगडा अद्यापि पूर्णपणे नाहीसा झालेला नसला तरी इंग्रजी राज्य नाहीसें व्हावें, या आकांक्षेला जर कुणाच्या उदाहरणाने स्फूर्ति पुरविली असेल तर ती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वेतिहासाने, ही गोष्ट प्रतिपाद्य विषयाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. भारताच्या स्वातंत्र्य-साधनांतला पहिला गुरू कोण या प्रश्नाचें शिवाजी महाराज असें एकच उत्तर सर्वांना द्यावे लागेल.

महाराष्ट्राच्या इतिहासाला व महाराष्ट्राच्या प्रकृतीला कोणी कितीहि नांवे ठेवलीं तरी नांवे ठेवण्याची गरज ही महाराष्ट्राचें एकंदर देशविभागांतील अनन्यसाधारण वैशिष्टय दर्शविणारी खूण ठरते. इंग्रजी राज्याचें मूळ मद्रास, मुंबई व शेवटी बंगाल येथे पक्के रुजून त्या राज्याचा देशांत सर्वत्र विस्तार झाल्यानंतर, या परक्यांचे राज्य नको अशी भावना कुठे व केव्हा उदय पावली, याविषयी प्रांतपरत्वें भिन्न भिन्न मतें दृष्टीस पडतात. राममोहन राज यांजकडे बोट दाखवून आपण सदर भावनेच्या वाच्यतेचे व प्रसाराचे पुढारी आहों, असे सदैव बंगाली माणसें बोलतां-लिहितांना आढळतात. राममोहनांच्या शिकवणींत अस्सल राष्ट्रीय बाणा टिकविण्याचा उपाय दिसत नाही, बंगालचा एक पक्ष तो बाणा शिकवणारा रामकृष्ण परमहंसांचा पंथ असा दावा मांडताना पहायला सापडतो. बंगालबाहेर आर्यसमाज आणि थिऑसफी हे दोन धर्मपंत राष्ट्रीयत्वाचें बीजारोपण आपल्या विद्यमाने घडलें. असें सांगतात; वस्तुत: हे दोन्ही पंथ एकाच वर्षी म्हणजे १८८५ मध्ये मुंबई शहरांत जन्मास येऊन थिऑसफीने आपलें ठाणें अड्यार ( मद्रास) येथे हालविले आणि आर्यसमाजाने अजमेर (सर्वस्थान ) येथे आपल्या कार्याचें मुख्य केंद्र स्थापून पंजाब, उत्तरप्रदेश वगैरे भागांतून आपल्या मतांचा प्रचार चालविला. आर्यसमाजाचे लाला लजपतारायांसारखे बरेच पुढारी देशाच्या स्वातंत्र्यसाधनाच्या आघाडीवर चमकले, परंतु त्यांचा ख-या कर्तबगारीचा काळ या शतकांतील आहे, गेल्या शतकांतील नाही.

थिऑसफीचे अभिमानी १८८४ मध्ये अड्यार येथें भरलेल्या थिऑसफिस्टांच्या संमेलनाचा प्रसंग दाखवून त्या संकेलनांत जमलेल्या पुढा-यांनी राष्ट्रांतील जनता जागृत करण्यासाठी काँग्रेस भरविण्याची कल्पना स्वीकारली, असें बजावतात. १८८४ नंतर वीस वर्षांनी ( १९१४  च्या सुमारास ) थिऑसफी पंथाच्या अध्यक्ष बेझंटबाई या भारतीय राजकारणाच्या आखाड्यांत उतरून त्यांनी तुफानी चळवळ केली, हें मान्य करुनहि बेझंटबाईंच्या उठावापर्यंत स्वत: बाई व त्यांचे अनुयायी राजकीय दृष्ट्या कोणतीं महत्त्वाची कामे करीत होते, असा प्रश्न उपस्थित करणें शक्य आहे. बंगाल्यांच्या अंगी लेखन आणि वक्तृव हे गुण असल्याने ते आपल्याकडे स्वातंत्र्यसाधनाच्या उद्योगाचे श्रेय वारंवार घेतात. बेझंटबाईंनी थिऑसफीच्या पदरांत हें श्रेय टाकण्याचा यत्न आपल्या छोट्या मोठ्या पुस्तकांतून केलेला आहे. आर्यसमाजी पुढा-यांचा आवाज बंगाली व बेझंटबाई यांच्याइतका मोठा नाहीं, पण त्यांना अशा श्रेयाचे धनी होण्याची आकांक्षा असल्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनांतून येतो. महाराष्ट्राच्या स्वभावांत आत्मश्लोघेचा दोष नाही, हे एक कारण; शिवाय इंग्रजी भाषेंत लिहिण्याचा कंटाळा, हे दुसरें कारण, यामुळे त्यांच्या भरीव राष्ट्रीय कर्तृत्वाचें योग्य दर्शन बहुधा समग्र देशांतील सर्वसामान्य जनतेला लाभत नाही.