१ जानेवारी १९७७ मुंबईला श्रीमती लता मंगेशकर यांच्या घरी यावं असी लताबाईंची जरूरी तार मला आलेली होती. ‘जैत रे जैत’ या त्यांच्या चित्रपटासाठी सोळा गाणी मी लिहावी म्हणून मंगेशकरांनी बोलविलेलं होतं. श्रीपाद डोंगरे यांचा औरंगाबादेला माझ्यासाठी फोन होता. निरोप होता ‘यशवंतरावांनी १ जाने. १९७७ ला नाशिकच्या दौ-यात भेटीसाठी बोलविलेलं आहे. न चुकता यावं.’ मी मुंबईला गेलो नाही. नाशिकला गेलो. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण व मोठी सभा होती. सकाळपासून निफाड तालुक्यात व जवळपास कार्यक्रम होते. निफाडला श्री. विनायकराव पाटलांच्या घराजवळ जेवण, भेटीगाठी व काही मंडळींशी चर्चा होती. खूप गर्दी होती. प्रतापराव भोसले, गोविंदराव आदिक, के. एम. बापू पाटील, काही मंत्री, साखर कारखान्यांचे अध्यक्ष, नगरचे नेते असे खूप लोक होते. मी तिथे सगळ्यांनाच अनोळखी. दबकूनच कुठेतरी जवळपास घुटमळत फिरत होतो. विनायकरावांसकट कोणाशीही माझा थोडाही परिचय त्या वेळी नव्हता. फक्त श्री. कवरीलाल बागयार या माझ्या मित्राची आई पळसखेडची. त्यांच्या-आमचा जिव्हाळा. त्यांच्या घरच्यांच्या ओळखीनं मी थोडा गर्दीत यशवंतरावांकडे जाऊ शकलो. ज्वारीचं दोन फूट लांबीचं सुंदर टपो-या दाण्यांचं कणीस यशवंतरावांच्या हाती देऊ त्यांना मी नमस्कार केला. सगळेच ते कणीस पाहून चकित झाले. मी सगळ्यांना पुन्हा खुलासा केला की सप्टेंबरमध्ये पहिली ज्वार कापून झाल्यावर तिच्याच खोडव्याचं पाणी देऊ पीक घेतलं. त्याच्या खोडव्याचं हे रटूनचं कणीस आहे. म्हणून दाणे अधिक टपोरे व शुभ्र आहेत. हे एकरी २० + १५ क्विंटल येऊ शकेल. शेत उभं आहे फार तर कोणीही पाहून घ्यावं.
कोणती पुण्ये अशी येती फळाला,
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
यशवंतराव सहज ओठांवर ओळ गुणगुणत बोलत राहिले. विनायकरावांच्या बाजूच्याच रेस्ट हाऊसवजा घरात सगळे बसलो. ज्वार रटून, कापूस रटून, तूर अशी थोड्या पाण्यामध्ये आठ महिन्यांत दोन पिकं घेऊन आपण स्थिर होऊ शकतो. ह्याचे प्रयोग प्रत्यक्ष केल्याचं मी सांगत होतो. समोरची मंडळी ऊस, द्राक्ष, कांदा अशा श्रीमंत पिकांचा विचार करणारी होती. मी तिथे उगाच आठमाही पाणी व गरिबांच्या अर्थशास्त्राचं बोलत होतो.
यशवंतराव फार खूष झाले व म्हणाले, “हे लिहून काढा व छापा, शेतक-यांमध्ये बोलत राहा. कृषी विद्यापीठातल्या लोकांशी मी बोलतो. त्यांनी हे पाहिलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे.” माझा दिवस सार्थकी लागल्याचा मला आनंद झाला. शेतीतली निर्मिती ही कवितेइतकीच सुंदर असते. तिचं सौंदर्य यशवंतराव मंत्र्यांना व अधिका-यांना सांगत होते. पुढे ह्या सांगण्याचा खूप उपयोग झाला.
विनायकरावांच्या त्या घरात काळ्या चोकडीचा मातकट कोट (जो मला चंद्रकांतनं भेट दिला होता) व टोपी घालून मी यशवंतरावांच्या जवळ बसून होतो. दोघंच शेवटी होतो. बाकी मंडळी बाहेर थांबलेली होती. मी त्यांना पाठविलेल्या खाजगी पत्रातला उदासीन सूर, कुटुंबातली खाजगी विचारपूस, त्यातली अडचणीची गुंतागुंत. नवीन विकत घेतलेल्या शेतात-पाच एकरांत पाच विहिरी खोदूनही पाणी मिळालं नाही. मूळ विहिरीचं पाणी नष्ट होऊन नवे बाग वाळून चाललेले आहेत. मोसंबीचा सहा एकरांचा एकमेव असा मला आर्थिक आधार देणारा बगीचा सुकून चाललेला होता. डायबॅक् रोगानं काही झाडं गेली. उरलेली उन्हाळ्याच्या तीव्र झटक्यानं, नष्ट झालेल्या पाण्यानं. भावंडांची शिक्षणं, बहिणींची लग्नं, हुंडा देता येत नाही म्हणून नकार मिळणं. वडिलांच्या नंतर मी कुटुंबप्रमुख. वय फार नसलं तरी जबाबदारी अंगावर आलेली. पुन्हा कर्जबाजारी होणं परवडणारं नाही. पण करणार काय? या सगळ्या प्रश्नांच्या व्यापात मी मोडून पडतो आहे. कविता वगैरे कशासाठी घेऊन बसू? सगळा विच्छिन्न संसार समोर उभा आहे. रिकाम्या पोटानं. यातून बाहेर निघण्याची मी खूप धडपड करतो आहे. आपले आशीर्वाद व आधार मला पाहिजेत.