• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - ९४

सामाजिक समतेचें कार्य

महाराष्ट्र सामाजिक परिषदेचें उद्धाटन करण्याचें भाग्य आज मला लाभत आहे, याबद्दल मला विशेष आनंद होत आहे. या परिषदेस येतांना माझ्यासारख्या राजकारणी माणसाला या सामाजिक परिषदेचें उद्घाटन करण्याचा कितपत अधिकार पोहोंचतो याचा मी माझ्या मनाशीं विचार करीत होतों. आपल्या आशीवार्दानें मी राज्याचा मुख्यमंत्री आहें म्हणूनच केवळ आपण मला बोलावलें असेल असें मला वाटत नाहीं. लोकशाही राज्यामध्यें लोकांची सर्वांगीण सुधारणा करणें हा राज्यकारभाराचा मुख्य उद्देश असल्यामुळें राज्याकडून समाजसुधारणेचें काम प्रभावी रीतीनें व्हावें ही अपेक्षा साहजिकच आहे आणि त्या उद्देशानेंच आपण मला या परिषदेच्या उद्घाटनासाठीं पाचारण केलें असावें. त्यामुळेंच कदाचित् या परिषदेस येतांना मला संकोच वाटला नसावा. परंतु मला असा संकोच न वाटण्याचें आणखीहि एक कारण आहे. आपण सर्वजण जाणतांच कीं या देशाच्या व जगाच्याहि सुदैवानें या देशांतील थोर थोर नेत्यांनी राजकारणाला नवें मूल्य प्राप्त करून दिलें आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्तेच्या क्षेत्रांत कांहीं कारभार करणें वा निवडणुका लढविणें नसून समाजपरिवर्तनाचें तें साधन आहे हा सिद्धांत या देशांतील महान् नेत्यांनी देशापुढें मांडला. महाराष्ट्राचे थोर समाजसेवक गोपाळरावजी गोखले यांनीं राजकारणाला आत्मिक अधिष्ठान देण्याचा संदेश प्रथमच भारताला दिला. तो संदेश आपल्या दिव्य व्यक्तिमत्त्वानें गांधीजींनीं प्रत्यक्ष अंमलांत आणून दाखविला. टिळक, गांधी यांच्यासारखे राष्ट्रीय नेते स्वतःच कर्मयोगी असल्यामुळें त्यांच्या नेतृत्वाखालीं राजकारणाला उच्च नैतिक अधिष्ठान मिळालें. गांधीयुगांत तर राजकारण व समाजकारण यांमधील लक्ष्मणरेषाच पुसली गेली. सामाजिक सुधारणावादाला सामाजिक समतेच्या दृष्टीनें ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्यांचा समावेश राजकारणांत झाला. इतकेंच नव्हे तर राजकीय कार्यक्रमामध्येंहि त्या बाबींना महत्त्वपूर्ण असें स्थान मिळालें. सर्वधर्मसमभाव, सामाजिक समता, हरिजनसेवा इत्यादी महत्त्वपूर्ण समाजिक सुधारणा आमच्या राजकीय परंपरेंचा अविभाज्य भाग बनल्या. या महान् परंपरेचे कांहीं संस्कार माझ्याहि मनावर झाले व त्या परंपरेचा एक नम्र पाईक म्हणून यथाशक्ति समाजसुधारणेचें काम करण्याची मला संधि मिळाली. आणि म्हणूनच या सामाजिक परिषदेचें उद्घाटन करतांना मला कुठलाहि परकेपणा वाटत नाही.

आधीं राजकीय सुधारणा कीं आधीं सामाजिक सुधारणा, हा प्रसिद्ध व उद्बोधक वाद टिळक आणि आगरकर यांसारख्या महापुरुषांमध्यें झाला. या वादसंवादांतूनच महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या अधिक पुरोगामी बनला यांत शंका नाहीं. न्या. रानडे यांच्या नेमस्त पण पुरोगामी सुधारणावादानें महाराष्ट्राचें लक्ष समाजसुधारणेकडे प्रामुख्यानें वळलें. आगरकरांनीं सामाजिक सुधारणावादांतून महाराष्ट्राला सामाजिक क्रांतिवादाची दीक्षा देण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांच्या प्रयत्नांनीं सामाजिक क्रांतिवादाची ही ज्योत बहुजनसमाजाच्या झोपड्यांना उजाळा देऊं लागली. महर्षि कर्वे यांनीं समाजाच्या उपेक्षित अशा भगिनीवर्गांत या क्रांतिवादाच्या आधारें नवी आशा निर्माण केली. हरिजन बांधवांना विठाई माउलीनें बोलवावें म्हणून साने गुरुजींनीं आपले प्राण पणास लावले. विनोबाजींच्या भूदान, ग्रामदान आंदोलनामुळें तर सर्वांगीण क्रांतिवादाचें मंगल दर्शन आपल्याला होत आहे. समाजसुधारणेच्या मूलभूत कल्पनेचे, महाराष्ट्राच्या सामाजिक मनाला आवाहन करणारे व त्याच्या समाजजीवनांत नवचैतन्य निर्माण करणारे हे सर्व अविष्कार आहेत. यांतून झालेली प्रगति आपण आपल्या मनश्चक्षूंसमोर आणली तर पुरोगामी विचारांनीं केवढी मोठी झेप मारली आहे याबद्दल सानंद विस्मय वाटतो. आणि दारिद्र्य, अज्ञान, जातिभेद, रूढी व मागासपण इत्यादि अनेक दोषांनी पोखरलेल्या समाजांत समाजसुधारणेसंबंधीं पराकोटीची अनास्था असतांनासुद्धां, ज्या महाभागांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितींत छळ व कष्ट सोसून थोर विचारांचे वायुमंडळ सर्वत्र निर्माण केलें त्या महाभागांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद द्यावेसे वाटतात.