परंतु खरें तसें नाहीं. आपण महाराष्ट्राच्या चतुःसीमा लक्षांत घ्या. आपला हा महाराष्ट्र अपरंपार मोठा आहे. तो अस्तित्वांत आला म्हणजे तो केवढा मोठा आहे याची आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल. आपल्या मागणीप्रमाणें – बेळगांव - कारवारपासून आपली मागणी आहे - तो दक्षिणेकडून जो वर जातो तो सातपुड्याच्या पहिल्या तीन पुड्या आपल्या काखेंत मारतो; आणि पश्चिमेला तो पश्चिम समुद्राला बरोबर घेऊन उंबरगांवच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचतों. आणि इकडे पूर्वेला तो औरंगाबाद - नांदेडच्या पुढें गोदावरीच्या कांठानें चांदाभंडा-याच्या बाजूला जातो. इतका मोठा आहे हा तुमचा आमचा महाराष्ट्र. तर कृपा करून महाराष्ट्र म्हणजे दोन सातारा आणि कोल्हापूर जिल्हे असा या भागांतील लोकांनी आपला समज करून घेऊं नये. त्याचप्रमाणें रत्नागिरी ठाण्याच्या लोकांनीं सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा भाग म्हणजे महाराष्ट्र असें मानतां कामा नये. महाराष्ट्राचा शेतकरी म्हणजे तुमच्या आमच्या टापूंतील लोक किंवा तुमचे आमचे नातेवाईक नव्हेत. पंचगंगेच्या आणि कृष्णेच्या कांठाला काम करणारा जसा मराठा शेतकरी आहे, जैन शेतकरी आहे, तसाच ठाण्याच्या, कुलाब्याच्या बाजूला सुरेख शेती करणारा आगरी शेतकरी आहें आणि वसईच्या आवतींभोंवती सुंदर बागायत व भातशेती करणारा ख्रिश्चन शेतकरीहि आहे. रत्नागिरीच्या भागांत आपण गेलांत तर तेथें आपणांला कुणबी शेतक-याची बाग सांपडेल आणि वर खानदेशच्या बाजूला जाल तर आरशासारखी स्वच्छ शेती करणारा लेवा पाटीदार शेतकरी आपल्याला भेटेल. तसेंच आपण अकोल्यास जा, अमरावतीस जा, नागपूरच्या बाजारांत जा आणि तेथून पुढें चांद्याच्या जंगलांत जा आणि पंचगंगा, वारणा, कृष्णा, गोदावरी, तापी, वैनगंगा ह्या सगळ्या नद्यांच्या कांठांनी फिरा. आणि मग वेगवेगळ्या त-हेचे प्रश्न असणारे, वेगवेगळ्या परंपरा असणारे, वेगवेगळ्या भावना असणारे, वेगवेगळ्या जमातींतून आलेले हे सर्व शेतकरी आहेत असें आपणांस आढळून येईल. आणि म्हणून यापुढें जेव्हां तुम्ही शेतक-यांच्या प्रश्नांचा विचार कराल तेव्हां सबंध महाराष्ट्रामध्यें पसरलेल्या शेतक-यांचें, काळ्या जमिनींतून नवीन संपत्ति काढणा-या, शेतींतून सोनें निर्माण करणा-या कष्टकरी शेतक-यांचें चित्र तुमच्या डोळ्यापुढें आले पाहिजे. हें बहुजनसमाजाचें चित्र आहे. बहुजनसमाज याचा अर्थ आपली एक जमात आणि आपले कांहीं पाव्हणेरावळे असा जर कोणी करीत असतील तर ती चुकीची कल्पना आहे हेंहि आपण लक्षांत घेतलें पाहिजे. ही जाणीव जर आमच्या विचारांच्या पाठीमागें नसेल तर आमचे निर्णय चुकीचे येतील. कारण कोठलाहि विचार हा क्रियाशील होण्यापूर्वी तो भावनेनें समजून घ्यावा लागतो आणि जर भावना अपुरी असेल किंवा चुकीची असेल तर तींतून येणारा निर्णय, तींतून येणारा विचार हा अपुरा आणि चुकीचा असण्याची शक्यता असते. आणि म्हणून या 'अवेअरनेस'ची अतिशय आवश्यकता आहे. ही गोष्ट मी आपणांपुढे फार आग्रहपूर्वक मांडीत आहें. तिचाहि आपण आपल्या मनाशीं विचार करावा. माझ्या मतानें महत्त्वाचे असणारे हे तीन सामाजिक प्रश्न आहेत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर, अमका अमकेतर असा विचार करण्यापेक्षां सगळ्या लोकांची, एकजिनसी कार्यकर्त्यांची सेना आम्हांला उभी करावयाची आहे, ही भावना आमच्यांत असली पाहिजे आणि त्या दृष्टीनें प्रयत्न करण्याची आपण खटपट केली पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट मला आपणांला आग्रहपूर्वक सांगावयाची आहे.
तिसरा प्रश्न आर्थिक क्षेत्रांतला आहे. पण आर्थिक प्रश्नांची चर्चा इतकी झालेली आहे कीं, मी या बाबतींत कांहीं नवीन सांगणार आहें अशांतला भाग नाहीं. मी जुन्याच गोष्टींची कदाचित् पुनरावृत्ति करीन. पण त्याची आवश्यकता आहे म्हणून मी हें बोलत आहें. महाराष्ट्रांतील आर्थिक प्रश्न सर्वसाधारणपणें तीन प्रकारचे आहेत. पहिला प्रश्न शेतीचा आहे, दुसरा प्रश्न उद्योगधंद्यांचा आहे आणि तिसरा प्रश्न मध्यवर्गीयांच्या प्रश्नांतून निर्माण झालेला आहे. पण हे प्रश्न हिंदुस्तानांत आपणांला कोठेंहि पाहावयास मिळतील. मी आतांच आपल्यापुढें महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले जे विशिष्ट स्वरूपाचे सामाजिक आणि राजकीय प्रश्न मांडले ते सगळेच प्रश्न कांही इतरांच्या पुढें नाहींत. पण आर्थिक प्रश्नांची जी वर्गवारी मीं आतां आपल्यासमोर ठेवली आहे ती वर्गवारी कदाचित् हिंदुस्तानच्या कोणत्याहि प्रांतांत आपणांला पहावयास सांपडेल. परंतु महाराष्ट्रांत त्या वर्गवारीला जो कांही विशिष्ट अर्थ आहे तो आपण समजावून घेतला पाहिजे.