• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १०

महाराष्ट्रांतील शेतीचे, मघाशीं मीं सांगितलें की, वेगवेगळे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, कोंकणांतील शेतीचाच प्रश्न घ्या. मी या राज्याची जबाबदारी घेईपर्यंत, मुख्यमंत्रिपदाची नव्हे तर त्याहिपूर्वी, मला नेहमीं असें वाटे कीं, सगळीकडचे शेतीचे प्रश्न सोडविले जातात मग या रत्नागिरीच्या शेतीचाच प्रश्न कां सोडविला जात नाहीं ? रत्नागिरीच्या शेतीचा प्रश्न सुटला पाहिजे. पण मी रत्नागिरीच्या शेतीच्या प्रश्नाचा जेव्हां जवळून अभ्यास केला, तेव्हां माझें असें मत झाले कीं, रत्नागिरीमध्यें शेतीचा प्रश्नच नाहीं. रत्नागिरीमध्यें प्रश्नच असला तर तो फळबागायतीचा आहे. आणि फळबागायत जेथें संभव आहे तेथें जाऊन कुठें तरी आपला गहूं, कापूस, ऊस अथवा भुईमूग काढण्याचा आपण प्रयत्न करूं लागलो तर त्या कोंकणच्या काळ्या कातळावर आपलें कपाळ फोडून घेण्यापेक्षां कांहीं कार्य आपणांकडून घडणार नाहीं. रत्नागिरीनें महाराष्ट्राला दोन अमोल गोष्टी दिल्या आहेत, एक म्हणजे उत्तम रसदार फळें आणि दुसरी श्रेष्ठ कर्तृत्वाची माणसें. रत्नागिरीचें हें आम्हांला देणें आहे असें आम्हीं मानलें पाहिजे. तेथून जरा वर आपण आलों म्हणजे सह्याद्रीच्या या टोंकाला लागून असणारा जो प्रदेश आहे त्यांतील शेतीचा खरा महत्त्वाचा जर कोणता प्रश्न असेल तर तो बागायती शेतीसंबंधींचा आहे असें आपणांस दिसून येईल. कारण जेथें बागायती शेती करण्यांत आली आहे, तेथें उंसाची कारखानदारी म्हणजेच साखरेची कारखानदारी निर्माण झालेली आपणांस आढळून येईल. परंतु याहिपेक्षां माझ्या मतानें महाराष्ट्राच्या शेतीचा जर कोणता महत्त्वाचा प्रश्न असेल तर तो महाराष्ट्रांतील मोठाच मोठा, लांबलचक असा जो दुष्काळी भाग आहे त्यासंबंधींचा आहे. पारनेरच्याहि आपण थोडें वर गेलों म्हणजे हा भाग सुरू होतो. येवलें-नांदगांवपासून त्याची सुरुवात होते आणि नंतर तो खालीं जतपर्यंत जातो. असा हा महाराष्ट्रांतील मोठाच मोठा दुष्काळी पट्टा आहे. तेथे पाऊस १०-१५ इंचांपेक्षा अधिक पडत नाहीं. म्हणून तेथें बागायती शेती होण्याची कधीं फारशी शक्यता नाहीं. तेथील लोक शेंकडों वर्षांपासून दुष्काळानें अगदी थकून गेलेले आहेत. या टापूंतल्या शेतक-यांची शेती आणि जीवन कसें समृद्ध करतां येईल हा माझ्या दृष्टीनें नंबर एकचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

उद्योगधंद्यांचाहि प्रश्न महत्त्वाचा आहे. आमच्यामध्यें मुंबई शहर आहे आणि त्याची वाढ उद्योगधंद्यांमुळें झाली आहे यात शंका नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये तर या शहराची अफाट वाढ झालेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी अमेरिकेंतील एका बँकेचा प्रतिनिधि मला भेटावयास आला होता. तो म्हणाला, 'चार वर्षांपूर्वी मी या मुंबई शहरामध्ये आलों होतों आणि आज पुन्हा तुमचें हे मुंबई शहर पाहतांना मला तें माझ्या ओळखीचें वाटत नाहीं.' इतक्या झपाट्यानें या शहराची वाढ झालेली आहे. मुंबई शहरांत उद्योगधंद्यांची वाढ होणें स्वाभाविक आहे, कारण तें एक उत्तम बंदर आहे. परंतु लोकांच्या मनांत अशी शंका आहे कीं, राज्यांत बदल झाला तरी मुंबईचें नुकसान होईल. पण मी त्यांना सांगूं इच्छितों कीं, राज्यात बदल झाला तरी मुंबईचें कांहींहि नुकसान होणार नाहीं. आम्ही प्रेमानें, जिव्हाळ्यानें मुंबई शहरांतील मंडळींना, वागविणार आहोंत. गुजराथी, मारवाडी, पारशी, सिंधी, पंजाबी जे जे कोणी असतील ते ते सर्व आमचे भाऊ आहेत. आम्हीं राष्ट्रीय भावनेनें हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्यामुळें मुंबईमध्यें कांही बदल होणार नाहीं. इतकेंच कीं कांहीं लोक आमच्यावर रागावून निघून जातील. जातील बिचारे, त्याला आपण तरी काय करणार ? त्यांना आपण प्रेमानें निरोप देऊं. जर असे कोणी गेलेच तर त्यांची जागा घेणारे आणखी कोणी येतील. कारण जे लोक मुंबईत व्यापाराकरितां किंवा उद्योगाकरितां आले ते केवळ मुंबई शहराच्या प्रेमामुळें आलेले नसून बंदराला व्यापार केला तर तो फायदेशीर होतो, कारखानदारी केली तर ती फायदेशीर होते म्हणून आले. त्यामुळें ते मुंबई सोडून जातील अशी शंका मला वाटत नाहीं. परंतु आम्ही कर्तव्यांत चुकतां कामा नये. प्रेमानें, बंधुभावानें हा प्रश्न सुटावा म्हणून आम्हीं टीका सहन केल्या, आरोप सहन केले. परंतु आम्ही या तत्त्वाला बळकट धरून राहिलों. आम्हीं आमचा संयुक्त महाराष्ट्र या निष्ठेंतून आणला आहे. तेव्हां मुंबई शहरांतील जे प्रश्न आहेत ते आम्हांला याच भावनेंने सोडवावे लागतील. मुंबई शहरामध्यें कारखानदारी करणारे मारवाडी, गुजराथी, पार्शी, पंजाबी, सिंधी हे सगळे आमचे भाऊ आहेत. या सगळ्या भावांनी आमच्या येथें राहावें, आपण सुखी व्हावें आणि मुंबईला समृद्ध करावें म्हणजे महाराष्ट्र आपोआप समृद्ध होईल. अशीच आमची त्यांना विनंती राहील आणि अशीच आमची वर्तणूकहि राहील.