• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे -८८

सुरुवातीलाच मला हें सांगितलें पाहिजे कीं विद्यापीठीय शिक्षणाचा लाभ सर्वांनाच मिळतो अशी परिस्थिति जगांतील कोणत्याहि देशांत नाहीं. आपल्या तरुण पिढीला शिक्षण देणें ज्यांना सहज परवडण्यासारखें आहे अशा सधन देशांत सुद्धां, विद्यापीठांतून शिक्षण घेणा-या मुलांमुलींची संख्या, त्या वयाच्या मुलांमुलींच्या एकूण संख्येच्या मानानें अगदी अल्प असते. तेव्हां, विद्यापीठांत प्रवेश मिळवूं इच्छिणा-या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा असें सुचविण्याचा माझा मुळींच उद्देश नाहीं. परंतु त्याचबरोबर हेंहि विसरतां कामा नये कीं, आपल्याकडे विद्यापीठांतून शिक्षण घेणा-या तरुण मुलांमुलींचें प्रमाण आज इतकें अल्प आहे कीं, उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येवर निर्बंध घालणें किंवा विद्यापीठांतून होणारी गर्दी ही एक अनिष्ट गोष्ट आहे असें मानणें योग्यहि नाहीं व न्याय्यहि नाहीं. विद्यापीठांतून शिक्षण घेऊन पदवीधर होणा-या तुम्हां विद्यार्थ्यांची संख्या, तुमच्या वयाच्या तरुणांच्या एकंदर संख्येच्या अवघी एक टक्का आहे, ही वस्तुस्थिति आपणांला विसरून चालणार नाहीं. आपल्या सध्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळें या बाबतींतल्या आपल्या कार्याला ब-याच मर्यादा पडतात ही गोष्ट खरी आहे. तरीसुद्धां शिकण्याच्या तळमळीनें उच्च शिक्षण घेऊं इच्छिणा-या विद्यार्थ्यांची संख्या आज जी सारखी वाढत आहे ती लक्षांत घेतां त्यासाठीं पुरेसा पैसा उपलब्ध करून देणें शक्य व्हावयास पाहिजे. विद्यापीठांतून किंवा महाविद्यालयांतून दिसणारी विद्यार्थ्यांची ही प्रचंड गर्दी म्हणजे समाजाचा जो एक मोठा भाग शतकानुशतकें पददलित राहिला व ज्याला ज्ञानापासून वंचित ठेवण्यांत आलें त्यानें आपल्या अस्मितेसाठीं चालविलेलेल्या धडपडीचें कांहीं प्रमाणांत तरी ती द्योतक आहे. समाजांत उच्च स्थान प्राप्त करून घेण्याचे एक साधन म्हणूनहि शिक्षणाकडे त्यांतील कांहीं लोक पाहत असतील. परंतु जातिभेदानें पछाडलेल्या आणि श्रेष्ठकनिष्ठतेच्या कल्पनांवर आधारलेल्या समाजांत ही वृत्ति स्वाभाविक व निकोप वृत्ति म्हणूनच समजली गेली पाहिजे. ज्यांच्या अनेक पिढ्यांना शिक्षणाचीं द्वारें बंद होतीं अशा तरुण मुलांमुलींना आपली परिस्थिति सुधारण्याच्या दृष्टीनें उच्च शिक्षण घ्यावेंसें वाटलें तर त्यांत आक्षेपार्ह असें कांहींच नाहीं. एवढेंच नव्हे तर दूरदृष्टीनें पाहिल्यास ज्ञानाच्या या प्रसारामुळें शिक्षणाच्या दर्जांत सर्व बाजूंनीं सुधारणा होणें अगदीं शक्य होणार आहे. कारण जेवढे अधिक विद्यार्थी विद्यापीठांत जातील, तेवढा लायक विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठीं अधिक वाव मिळणार आहे. म्हणून शिक्षणाचा दर्जा सांभाळण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनीं त्याच कार्यावर आपलें लक्ष केंद्रित केल्यास कालांतरानें शिक्षणाचा दर्जा सुधारणें फारसें अवघड जाईल असें मला वाटत नाहीं.

आज उच्च शिक्षणाचा जो प्रसार होत आहे त्यामागें, माझ्या मतें, देशांतील लोकशाहीच्या प्रसाराची प्रभावी शक्ति आहे. उच्च शिक्षणाचा लाभ जोंपर्यंत फक्त मूठभर लोकांनाच मिळत होता तोंपर्यंत समाजजीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत पुढे येणा-यांची संख्या अगदीं अल्प असे. अशा परिस्थितींत या मूठभर लोकांची बौद्धिक वाढ खुंटल्यास सर्व समाजाचीच अधोगति होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून निरक्षरता व अज्ञान यांत रुतून बसलेल्या लोकांच्या बुद्धीचा विकास घडवून आणून आणि त्यांच्या अंगच्या सुप्त गुणांचा पुरेपूर विकास होण्यासाठीं त्यांना अधिकाधिक संधि उपलब्ध करून देऊन गुणवत्तेवर आधारलेलें नेतृत्व आपण निर्माण करूं शकूं. तसें झाल्यास सामाजिक दर्जा, जात, कूळ यांसारख्या गोष्टी हळूहळू मागें पडत जातील, आणि परिणामीं आपलें सामाजिक जीवन अधिक निकोप व निर्मळ होईल यांत वाद नाहीं.

विद्यापीठांतील गर्दीमुळें अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हें नाकारण्याचा माझा मुळींच उद्देश नाहीं. आपल्या शिक्षणाचा दर्जा जो खालावला आहे त्याला सुद्धां कांही अंशीं तरी ही गर्दीच कारणीभूत असूं शकेल. परंतु मीं आतांच वर्णन केलेल्या पार्श्वभूमीवरून हे प्रश्न नीट लक्षांत घेतल्यास त्यांचें स्वरूप तुम्हांला अगदीं वेगळें दिसेल व हे तात्पुरत्या स्वरूपाचे प्रश्न आहेत ही गोष्ट समजून येईल. सबंध शिक्षणपद्धतीच धोक्यांत येऊं नये म्हणून या गर्दीच्या प्रश्नाबाबत योग्य ते उपाय शोधून काढले पाहिजेत हें जरी मान्य केलें तरी खुद्द विद्यापीठांनीं किंवा अन्य प्रकारें विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंधन घालणें हा त्यावरील उपाय नाहीं. उलट विद्यापीठे व महाविद्यालयें यांच्या कार्यपद्धतींत सुधारणा घडवून आणणें, चांगले शिक्षक तयार करणें व त्यांचा दृष्टिकोन सुधारणें हाच त्यावरील खरा उपाय असून त्यामुळें आपल्या तरुण पिढींत विधायक व सर्जनशील प्रवृत्ति अधिकाधिक प्रमाणावर वाढीस लागतील.