• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे -८७

विद्यार्थ्यांच्या या वाढत्या संख्येमुळें इमारती, प्रयोगशाळा, वाचनालयें यांच्यावरहि फार ताण पडत असल्यामुळें कोणाचीच पुरेशी सोय होऊं शकत नाहीं. विद्यार्थ्यांना त्यांच्या संख्येच्या मानानें सांघिक जीवनाच्या ज्या संधि मिळावयास पाहिजेत त्या पण दिवसेंदिवस कमी होत आहेत, आणि शिक्षक-विद्यार्थी संबंधहि दुरावत चालले आहेत. शिक्षणाचा दर्जा अशा रीतीनें खालावत आहे, आणि पदव्या मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना निरनिराळया सोयी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांमध्यें केवळ पदव्यांचा हव्यास निर्माण करण्याकडे महाविद्यालयांचा व विद्यापीठांचा कल वाढत असल्याचें दिसत आहे. महाविद्यालयांत पाळीपाळीनें वर्ग चालविणें, संध्याकाळचीं व रात्रीचीं महाविद्यालयें सुरू करणें, बहिःशाल पदव्या देणें, पत्रव्यवहाराच्या द्वारा अभ्यासक्रमाच्या योजना सुरू करणें, या सर्वांमधून हीच प्रवृत्ति व्यक्त होते. या सर्व गोष्टींमुळे विद्यापीठांकडून अपेक्षित असलेलें ज्ञानदानाचें खरें कार्य होत नसून तीं केवळ पदव्यांचा पुरवठा करणा-या पेढ्या बनत आहेत, असें आज कित्येकांना वाटूं लागलें आहे. संख्या आणि विस्तार यांच्या वेदीवर गुणांचा बळी दिला जात आहे.

केवळ पदव्यांच्याच मागें धाव घेण्याच्या विद्यार्थ्यांमधील या प्रवृत्तीस आळा घालण्यासाठीं काय उपाययोजना करावी यासंबंधी अनेक वेळां चर्चा होते. आणि कांहीं वेळां विद्यापीठांतील प्रवेश मर्यादित करण्याच्या दृष्टीनें किंवा केवळ पदवी मिळविण्याच्या उद्देशानेंच विद्यापीठांत येणा-या विद्यार्थ्यांना त्यांच्या निश्चयापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीनें कांही उपायहि योजले जातात. विद्यापीठांतील प्रवेशावर या ना त्या स्वरूपांत निर्बंध घालणें हा वरील उपायांपैकी पहिल्या प्रकारचा उपाय असून विद्यापीठांच्या पदव्या व कनिष्ठ नोक-या यांचा संबंध तोडणें हा दुस-या प्रकारचा उपाय आहे. विद्यार्थ्यांचा विद्यापीठांकडे वाहणारा प्रचंड ओघ थांबविण्यास हे उपाय कितपत यशस्वी होतील याबद्दल शंकाच आहे. तसेंच याच उद्देशानें माध्यमिक शिक्षणांत आणलेली विविधता प्रत्यक्षांत कितपत उपयोगी पडेल हें सांगणे कठीण आहे. या प्रयत्नांना यश येण्याची एकंदरीनें शक्यता कमीच दिसते. माध्यमिक शिक्षणाचा झपाट्यानें होत असलेला प्रसार हें त्याचें एक महत्त्वाचें कारण असून त्यामुळें विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची गर्दी कांही काल तरी अशीच वाढत जाणार आहे. म्हणून विद्यापीठांतील शिक्षणानें ज्यांचा फायदा होऊं शकेल परंतु केवळ गरिबीमुळेंच जे उच्च शिक्षणाचा लाभ घेऊं शकत नाहींत अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठांतून प्रवेश मिळविण्यासाठीं आवश्यक त्या सुधारणा होणें इष्ट आहे. निरनिराळ्या शिष्यवृत्त्या ठेवून मर्यादित प्रमाणांत आज ही गरज भागविली जात आहे. परंतु आवश्यक ती पात्रता किंवा कुवत नसतांनाहि जे महाविद्यालयांत किंवा विद्यापीठांत प्रवेश मिळवूं इच्छितात त्यांना तेथें सहज प्रवेश मिळत असल्यामुळें तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येंत जी बेसुमार वाढ झाली आहे त्याचाच आज आपणांस विचार करावयास पाहिजे.

विद्यापीठांतून सध्या जी बेसुमार गर्दी झाली आहे. त्यासंबंधींचा प्रचलित दृष्टिकोन मी आपणांसमोर थोडक्यांत मांडला आहे. विद्यापीठांत अशी गर्दी होणें इष्ट आहे असें अर्थातच या मताच्या पुरस्कर्त्यांना वाटत नाहीं. उलट ती एक प्रकारची अनिष्ट गोष्ट असून त्यामुळें शिक्षणाचा दर्जा खालावतो असें त्यांचें म्हणणें आहे. आणि म्हणून ही गर्दी कमी करण्याचें शक्य ते प्रयत्नहि होत आहेत. तथापि हा जो दृष्टिकोन आहे तो कितपत बरोबर आहे यासंबंधी माझ्या ज्या कांहीं शंका आहेत त्या मी आतां आपल्यापुढें मांडतों.