• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - ७५

शेतीच्या संदर्भात आणखी एका प्रश्नाचा मी उल्लेख करूं इच्छितों. तो म्हणजे कृषि-उद्योगांचा प्रश्न होय. शेतीच्या धंद्याला महाराष्ट्रांत आम्हांला उद्योगांची जोड द्यावयाची आहे, आम्हांला कृषि-उद्योग निर्माण करावयाचे आहेत. यांत आम्ही कांहीं नवीन गोष्ट करणार आहोंत असा दावा मी करीत नाहीं, तसा आमचा आग्रहहि नाहीं. कारण हे शब्द माझे नाहींत. जे शब्द राजकीय आणि आर्थिक संदर्भात वापरले जातात तेच मीं वापरले आहेत. पण त्यांना मी आतां आमच्या कारभारामध्ये निश्चित अर्थ देऊं इच्छितों. यासंबंधी मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहें. या कृषि-उद्योग शब्दाचा आशय काळाच्या ओघाबरोबर वाढत जाईल, बदलतहि जाईल. पण आपण महाराष्ट्रांतील खेड्यांकडे पाहिलें तर आपल्याला असें दिसेल कीं आज खेड्यांमधील सगळा समाज शेतीच्या मूलभूत उद्योगावर आधारलेला आहे. यांतूनच भूमिहीनांच्या प्रश्नासारख्या अनेक सामाजिक कटकटी आणि तणाव निर्माण झाले असून या सर्व गोष्टी दूर करावयाच्या असतील तर शेती न करणारा जो वर्ग आहे त्याला शहरामध्यें घेऊन आलें पाहिजे. अशा दृष्टीनें आज चालू असलेलें नागरीकरण आपण पाहत आहोंत.

परंतु खेड्यांमध्यें निव्वळ शेतीवर आधारलेला जो समाज आहे त्याच्यासाठीं कृषि-उद्योग काढण्याचा प्रयत्न झाला तर खेडें हें खेडें राहणार नाही. खेडें आणि शहर, खेडें आणि नगर यामधील अंतर कृत्रिम आहे आणि तें दूर झालें पाहिजे. तें करण्याचा मार्ग म्हणजे उत्पादनाचें नवीन तंत्र आणि नवीन विज्ञान निर्माण करणारीं साधनें शेतक-यापर्यंत गेलीं पाहिजेत, शेतीमध्यें त्यांचा वापर करण्यास सुरुवात झाली पाहिजे, शेती हा उद्योग आहे आणि म्हणून त्यांत त्यांचा उपयोग झालाच पाहिजे. आणि त्याचप्रमाणें त्यांच्या मदतीनें दुसरे धंदे काढतां आले पाहिजेत. शेतीच्या कामांत आपण नांगर वापरतों. मी असें म्हणेन कीं शेतीच्या उपयोगाकरितां लागणारा हा नांगर नागपूर, मुंबई किंवा इतर ठिकाणीं निर्माण न होतां खेड्यांतच निर्माण झाला पाहिजे. यांत कांहीं अपुरेपण असेल तर तो नाहींसा करून पूर्णता आणणें आवश्यक आहे.

शेतीमधून निर्माण होणा-या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर औद्योगिक प्रक्रिया करणें म्हणजे कृषि-औद्योगिक समाज नव्हे. त्याच्या पाठीमागें खेड्यांत वीज गेली पाहिजे ही कल्पना आहे. आर्थिक जीवनामध्यें विजेची शक्ति नसेल तर खेड्यांतील शेतक-यांचें जीवन आपण बदलूं शकणार नाहीं. हें म्हणणें माझें नाहीं, तें एका महापुरुषाचें आहे. लेनिननें हें चित्र सुरुवातीलाच जगापुढें ठेवलें होतें. त्याबद्दल आपण त्याचें ऋणी राहिलें पाहिजे. जें चांगलें आहे तें आपण जरूर घेतलें पाहिजे. अनुभवाच्या बाबतींत आपण एकमेकांची उसनवारी करण्यांत कांहींच कमीपणा नाहीं. तेव्हां मला हेंच सांगावयाचें आहे कीं कृषि-उद्योग प्रधान अर्थरचना या शब्दप्रयोगाच्या पाठीमागची विचारसरणी ही अशी आहे. ही कल्पना केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाहीं. जुन्या पद्धतीनें शेती करणा-या सर्व समाजानें स्वीकारण्यासारखी ही गोष्ट आहे. या कल्पनेला मूर्त स्वरूप येण्यास किती वर्षे लागतील हें सांगतां येणार नाहीं. परंतु ज्या वेगानें औद्योगीकरण वाढत जाईल त्या वेगावर कृषि-औद्योगिक समाज निर्माण होणें अवलंबून राहील. आमचा हेतु, आमची विचारसरणी ही अशी आहे. यासाठीं वेगळा शब्दप्रयोग उपयोगी पडणार असेल तर तो आम्ही जरूर घेऊं. शेवटीं मी हें स्पष्ट करूं इच्छितों कीं पुढील निवडणुकीच्या दृष्टीनें आम्हीं ही कल्पना मांडलेली नाहीं. जनता आतां जागृत असल्यामुळें कोणत्या पक्षाच्या लोकांना निवडून द्यावयाचें आणि कोणत्या नाहीं हें पारखूनच ती आपलें काम करील. परंतु मतें मिळविण्यासाठीं ही गोष्ट आम्हीं मांडलेली नाहीं. अर्थात् सरकार जें कांहीं करीत आहे त्याचा सरकार पक्षाला निवडणुकीमध्यें उपयोग झाला तर मला आनंदच होईल. हें धोरण स्वीकारल्यामुळें सरकारला निवडणुकीमध्यें मदत होत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे असें मी म्हणेन. परंतु त्याचबरोबर विरोधी पक्षाला मी असें म्हणेन कीं तुम्हींहि त्यांत आनंद मानला पाहिजे. निदान ज्यांचा समाजवादी विचारसरणीवर विश्वास आहे त्यांना तरी आनंद वाटला पाहिजे.

शेतीसंबंधी अत्यंत महत्त्वाचे असे जे आपले प्रश्न आहेत तें मीं आपणांसमोर अगदी थोडक्यांत मांडले आहेत. आपण त्यांतून कसा मार्ग काढतों यावर महाराष्ट्राची भरभराट आणि उत्कर्ष अवलंबून आहे. आपल्या आर्थिक विकासाचें सूत्रच त्यांत गोवलेलें असल्यामुळें आपण या सर्व प्रश्नांचा साकल्यानें विचार करावा अशी विनंती करून मी आपली रजा घेतों.