विदर्भांत मनुष्यबळ जास्त आहे, तेव्हां त्याबाबत विचार झाला पाहिजे असें सांगण्यांत आलें. मनुष्यबळ जास्त असण्याचा मान मी फक्त विदर्भालाच देऊं इच्छित नाहीं हें मला प्रथम सांगितलें पाहिजे. कामाला लावतां येईल असें मनुष्यबळ सा-या भारतांत आहे आणि तसें तें आमच्या राज्यांतहि सर्व ठिकाणीं विपुल प्रमाणांत आहे. हा जो मनुष्यबळाचा अद्यापि उपयोगांत न आणलेला सांठा-बॅकलॉग आहे त्यावरच आपली सर्व साधनसामुग्री व शक्ति केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या राज्यांत जे अविकसित भाग आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची भीति आहे. म्हणून या भागांना विकसित भागांबरोबर आणण्यासाठीं सर्वसाधारणपणें एक कालखंड ठरवून द्यावा असें जें सांगण्यांत आलें त्याप्रमाणें कालखंड ठरवून त्या भागांचा विकास झाला पाहिजे या मताचा मीहि आहें. त्याप्रमाणें कालखंड समोर ठेवून विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्याकरितां व्यवहार्य योजना आंखल्या पाहिजेत. परंतु त्यासाठीं त्या भागांत पूर्वी रस्त्यांचें मायलेज-रस्त्यांची एकंदर लांबी किती होती आणि दहा वर्षांनंतर ती किती झाली या दृष्टिकोनांतून मी पाहण्यास तयार नाहीं, किंबहुना या दृष्टिकोनांतून कोणींहि पाहूं नये. त्या भागाचा मूलतः आर्थिक विकास किती झाला हें पाहिले पाहिजे. त्या भागांत तांत्रिक शिक्षण किती वाढलें, त्या भागाचें औद्योगीकरण किती झालें ह्यावर त्या भागाचा विकास अवलंबून आहे.
सामाजिक सुखसोयींकडे दुर्लक्ष होतां कामा नये ही गोष्ट मी मान्य करतों, आणि त्यांतल्या त्यांत शिक्षणाकडे तर मुळींच दुर्लक्ष होतां कामा नये. मी 'च'च्या भाषेंत बोलणार नाहीं, परंतु शिक्षणाची बाब इतकी महत्त्वाची आहे कीं त्यासंबंधी 'च'च्या भाषेंत मला बोलावें लागत आहे. आपल्याला नवीन पिढी निर्माण करावयाची आहे. म्हणून मी सांगूं इच्छितों कीं, शिक्षणाच्या बाबीकडे मुळींच दुर्लक्ष होणार नाहीं. मी ही गोष्ट मुद्दाम आग्रहपूर्वक सांगतों आहें.
दारूबंदीच्या प्रश्नासंबंधांने कांहीं विचार व्यक्त करण्यांत आले. दारूबंदीच्या प्रश्नाला कांही सामाजिक बाजू आहेत, कांहीं आर्थिक बाजू आहेत. दारूबंदी जेव्हां अस्तित्वांत नव्हती तेव्हां मुंबईतील कामगारांचें जीवन किती भयानक होतें याचा प्रत्यक्ष अनुभव मींहि घेतलेला आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी मला जेव्हां जेव्हां मुंबईत राहण्याचा प्रसंग येत असे तेव्हां तेव्हां दुसरीकडे राहण्याची सोय नसल्यामुळें मी कामगारांकडेच राहत असें. त्यामुळें मला त्यांच्या जीवनाचें जवळून निरीक्षण करण्याची संधि बरेच दिवस मिळाली आणि त्यांच्या अडचणी माझ्यासमोर साकार झाल्या. संध्याकाळ झाल्यानंतर कामगार वस्तींत काय भीषण प्रकार होत असत याची कल्पना त्या जीवनाचें ज्यांनीं जवळून निरीक्षण केलें आहे, त्या जीवनाचा ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्यांनाच येऊं शकेल, दुस-यांना नाहीं. आज परिस्थिति अशी आहे कीं, सर्व कामगारांनीं आपापल्या कुटुंबियांना मुंबईत आणलें आहे, त्यांचीं मुलें शाळेंत जात आहेत. परंतु पंचवीस-तीस वर्षांपूर्वी काय स्थिती होती ? कामगारांच्या कमाईत बहुतांश हिस्सा दारू पिण्यांत खर्च होत असे. आज स्थिति अगदी वेगळी आहे. दारूबंदीमुळें कामगार वर्गाची परिस्थिति निश्चितपणें सुधारली आहे. त्यांच्यामध्यें सुबत्ता आली आहे असें म्हणावयास प्रत्यवाय नाहीं. ज्यांना दारू पिऊन मरावयाचेंच असेल त्यांना मरूं द्यावें, असें जे म्हणतात त्यांना दारू पिण्यामुळें मनुष्याचें जीवन कसें यातनामय बनतें याचा अनुभव नसावा. चार खोल्यांच्या ऐषआरामी फ्लॅटमध्यें राहून पोटभर जेवण झाल्यानंतर आरामांत बसून पाठीमागें कांहीं काळजी नसतांना दारू पिणा-यासंबंधानें मी सांगत नाहीं. अनंत अडचणींनीं व्यापलेलें ज्यांचें जीवन आहे असे लोक दारूच्या नशेंत आपल्या काळज्या बुडवूं पाहतात, कामगार दारू पिऊन घरीं येऊन आपल्या मुलांच्या देखत बायकोला मारपीट करूं लागला म्हणजे त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. अशा प्रसंगांमुळें त्यांच्या संस्कारक्षम मनावर जे दुष्परिणाम होतील ते, शाळेंत त्यांना कितीहि चांगलें शिक्षण देण्यांत आलें तरी दूर होणार नाहींत, त्या शिक्षणाचा त्यांच्या मनावर कांहींहि परिणाम होणार नाहीं. दारूबंदीमुळें असे प्रकार आतां बंद झाले आहेत हें आपणांस मान्य केलेंच पाहिजे. चोरून दारू गाळण्याचे प्रकार मुंबईत वाढले आहेत, नाहीं असें नाहीं. परंतु त्यांना आळा घालण्याकरितां काय केलें पाहिजे याचा विचार सर्वांनीं केला पाहिजे. दारूबंदीचें धोरण रद्द ठरविणें हा त्यावरील उपाय नाहीं.
आपण निरनिराळ्या राजकीय पक्षांमध्यें वाढलों असलो तरी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामांतून आपली राजकीय क्षेत्रामध्यें वाढ झालेली आहे. जनतेचें जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न व्हावें, त्या जीवनामध्यें नव्या शक्तींची वाढ व्हावी हा दृष्टिकोन, हीं जीं राजकीय क्षेत्रामध्यें काम करणारी माणसें आहेत त्यांचा असणारच. त्यांना मी आग्रहानें सांगूं इच्छितो कीं, आम्ही लोक कल्याणाच्या यात्रेचा मार्ग पत्करला आहे. या यात्रेमध्यें कोणीहि मागें राहूं नये. कदाचित् आपल्या उद्दिष्टांकडे जाण्याच्या मार्गांत फरक असूं शकेल. कांहींचे मार्ग अलग असतील, विचार निराळे असतील. त्या विचारांशी त्यांनी प्रामाणिक राहावें. मात्र लोककल्याणाच्या या यात्रेंत त्यांची आणि आमची, त्यांच्या विचारांची आणि आमच्या विचारांची, कोठें तरी एकत्र गांठ पडल्याशिवाय राहणार नाहीं.