• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे -६

महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनें महाराष्ट्राच्या जीवनांतील ही पहिली महत्त्वाची राजकीय समस्या आहे. याकडे जो दुर्लक्ष करील तो महाराष्ट्राचें नुकसान करील असें मला आपल्याला सांगावयाचें आहे. गेल्या तीन वर्षांत विदर्भांतील अनेक मंडळींना भेटण्याची, त्यांचें कार्य पाहण्याची मला संधि मिळाली. त्यांचीं मनें सांभाळण्याचा मीं प्रयत्न केला; तसेंच त्यांनींहि मला चांगलें वागविलें. जणुं कांहीं मी त्यांच्यामध्यें पांचपंचवीस वर्षे राहिलों आहें इतक्या ममतेनें आणि प्रेमानें त्यांनीं मला वागविलें. परंतु त्यांनी मला चांगले वागविलें किंवा मीं त्यांना चांगलें वागविलें या वैयक्तिक नात्याचा हा प्रश्न नव्हे. प्रातिनिधिक नात्यानें आम्ही एकमेकांशी ज्या त-हेनें वागलो आहोंत तें वागणें आम्हांला पुढें वाढवावयाचें आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला त्याच भावनेनें आमच्याशी एकरूप करण्याची ही जबाबदारी आहे. हळुवारपणानें आपणांस ही जबाबदारी यापुढें पार पाडावयाची आहे. नाहीं तर आपण आपले पडलों कोल्हापूर-साता-याकडे; नागपूर, चांदा, भंडारा दूर आहेत, त्यांच्या प्रश्नांचा विचार करण्याची आम्हांला काय जरुरी आहे, अशा विचारांत जर जनता आणि आपण कार्यकर्ते फसलों तर मग महाराष्ट्राच्या मागणीचा आम्हांला खरा अर्थच कळलेला नाहीं असें म्हणावे लागेल. महाराष्ट्राची घोषणा करणें सोपें आहे, पण महाराष्ट्राची जिम्मेदारी हातांत आल्यानंतर त्यांतून निर्माण होणारे प्रश्न समजून घेऊन आपुलकीच्या नात्यानें ते सोडविण्याचा प्रयत्न करणें हें महत्त्वाचे काम आहे. माझ्या मतें महाराष्ट्राचें राजकारण हीच एक महत्त्वाची समस्या आहे.

महाराष्ट्रापुढें जे महत्त्वाचे सामाजिक प्रश्न आहेत, त्यांपैकीं जो पहिला मोठा प्रश्न आहे त्यासंबंधी मी आतां बोलणार आहें. तो प्रश्न मोठा नाजुक असला तरीसुद्धां त्यासंबंधीं उघड उघड चर्चा झाली पाहिजे आणि मींसुद्धां तिच्यामध्यें भाग घेतला पाहिजे. हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनासंबंधींचा आहे. या विषयावर महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनीं गेल्या दोनचार महिन्यांत लेख लिहिले असून मीं ते काळजीपूर्वक वाचले आहेत. त्यामध्यें महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचें वर्णन ''भंगलेलें मन'' या शब्दांनी केलें आहे. तें खरें कीं खोटें या विषयांत न जातां तें तसें आहे असें आपण गृहीत धरूं. तेव्हां कोणत्या अर्थाने तें भंगलेलें मन आहे, हें पाहणें जरुरीचें आहे. महाराष्ट्राच्या मागणीचा पाठपुरावा करीत असतांना आमचा एक आवाज, एक मन होतें. त्यासारखें चित्र मीं महाराष्ट्राच्या जीवनामध्यें पूर्वी कधींहि पाहिले नव्हतें. मी त्यावेळी शिव्या खात होतों तरी मला आनंद वाटत होता. मी म्हणालों, ठीक आहे. अशी एक शक्ति उभी होत आहे ही चांगली गोष्ट आहे. कारण माझी त्या शक्तीवर एक निष्ठा आहे, विश्वास आहे. पण आश्चर्य पहा ! हें एक दिसणारें मन, एक दिसणारें चित्र, संयुक्त महाराष्ट्र येतो आहे म्हटल्याबरोबर ताबडतोब संशयानें आणि शंकेनें भरलें. म्हणजे भंगलेलें मन आहे यांत शंका नाहीं. महाराष्ट्राच्या जीवनांतील जे सामाजिक प्रश्न आहेत त्यांत सर्वांत महत्वाचा प्रश्न हा आहे कीं, हें जें भंगलेलें मन आहे तें आम्हांला सांधावयाचें आहे. ब्राह्मण ब्राह्मणांकरितां विचार करतो, मराठा मराठ्यांपुरता विचार करतो. महार महारांकरितां विचार करतो, माळी माळ्यांकरितां विचार करतो. हे मासले मीं केवळ नमुन्यादाखल सांगितले. जातीयवादाच्या या विषारी विचारापासून आपण महाराष्ट्राला मुक्त केलें पाहिजे, जातीयवादाचा हा विचारच समूळ नष्ट केला पाहिजे. तेव्हांच महाराष्ट्राचें सामाजिक मन एकजिनसी होईल. परंतु हें कार्य आपण एका दिवसांत, एका रात्रींत करूं शकणार नाहीं. त्यासाठीं विचारी माणसांनी विचारपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय हें घडून येणार नाही.