आज महाराष्ट्रापुढें जे राजकीय प्रश्न आहेत त्यांतील भावनात्मक ऐक्याच्या प्रश्नाला माझ्या मतें आपण पहिलें स्थान द्यावयास पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्यें गेल्या दोन-तीन वर्षांत ज्यांनी प्रवेश केला आहे, पण अजूनही ज्यांच्या मनांत थोडासा संशय आहे, अशा विदर्भाला आणि मराठवाड्याला, भावनेनें आमच्याशीं एकरूप होतां येईल असें वातावरण आतां आपणांला महाराष्ट्रांत निर्माण करावयाचें आहे. इतिहासानें यांत कांही अडचणी निर्माण करून ठेवल्या असल्या तरी त्या आतां आपण बाजूला सारल्या पाहिजेत. पूर्वी हिंदुस्तानचा जो इतिहास घडला त्याला तुम्ही आणि मी जबाबदार नाहीं. कारण तो इतिहास तुम्हीं आणि मी, तुमच्या आणि माझ्या हातांनी घडविला नाहीं. ज्या मराठवाड्यांत आमची मूळ मराठी भाषा बोलली गेली, जिथें ती रांगली आणि चालती-बोलती झाली आणि म्हणून ज्या मराठवाड्यांचे वर्णन मराठी मायबोलीचें माहेर असें आम्ही करतो तो मराठवाडा मोंगलाईत जाऊन पडला. तेथें तो शें-दीडशें, दोनशें, तीनशें वर्षे राहिला; तेथील वातावरणांत, तेथील परंपरेंत, तेथील भावनांच्या आवरणांत त्याची वाढ झाली. त्याचप्रमाणें मध्यप्रदेशचें जें राज्य इंग्रजांनीं निर्माण केलें त्यांत व-हाडाचे कांहीं भाग कांही शतकापासून जाऊन पडले. ते तेथील वातावरणांत, तेथील परंपरेंत आणि तेथील पार्श्वभूमींत वाढले. आणि असे हे आपण सर्व, गेली दोन-तीन वर्षे एके ठिकाणीं नांदावयाचा प्रयत्न करीत आहोत.
परंतु विदर्भांतील कांहीं लोकांच्या मनांत एका स्वतंत्र राज्याची भावना होती. अशा वेळीं, समोर राजकीय संकट दिसत असतांनाहि माझ्या मंत्रिमंडळांत काम करणारे माझे साथी आणि बाहेर काम करणारे आमचे अनेक कार्यकर्ते यांनीं महाराष्ट्रात सामील होण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. मला या विदर्भांतील माझ्या मित्रांचें जाहीर अभिनंदन करावयास पाहिजे. डॉ. खेडेकरांसारख्या माझ्या सहका-यांना मला जाहीर धन्यवाद दिले पाहिजेत. त्याचप्रमाणें विदर्भाची मागणी करून अखेरपर्यंत ती मांडण्याचा ज्यांनीं प्रयत्न केला, परंतु शेवटीं झालेला निर्णय शिरसावंद्य मानून महाराष्ट्राच्या जीवनाशीं समरस होण्याचा ज्यांनी निर्धाराने निर्णय घेतला ते माझे नागपुरांतील साथी श्री. कन्नमवार आणि त्यांचे सहकारी यांनाहि मला जाहीर धन्यवाद दिले पाहिजेत. आतां तुमची व माझी, महाराष्ट्राचें राजकारण चालविणा-यांची जिम्मेदारी आहे कीं, त्यांना आपण आपुलकीनें, प्रेमानें जवळ घेतलें पाहिजे. मेहेरबानी म्हणून नव्हे तर तो त्यांचा हक्क आहे म्हणून; आम्ही त्यांना चांगले वागवणारे कुणी तरी दादा आहोंत अशा भावनेनें नव्हे, तर ते आणि आम्ही भाऊ-भाऊ आहोंत, एका महान् कार्याचे साथीदार आहोंत या भावनेनें. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा विश्वास त्यांच्या मनांत निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हीच आज महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपल्याला विसरून चालणार नाही.
तेव्हां जे आमचे कांहीं विरोधी मित्र छोट्या-छोट्या प्रश्नांचीं दुखणीं घेऊन त्यांचा महाराष्ट्रभर बाजार मांडण्याचा प्रयत्न करतांना दिसतात त्यांना मला सांगावयाचे आहे कीं, या छोट्या-छोट्या प्रश्नांच्या चिंध्या जमविण्यासाठीं आपण जेवढा वेळ खर्च करीत आहांत त्यापैकीं निम्मा वेळ तरी महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनें आज ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्यांच्या विचारासाठीं द्या; विदर्भांतील या मंडळींना जवळ करण्याच्या दृष्टीनें विचार करण्यासाठी कांहीं वेळ द्या. आज विदर्भांतील या मंडळींच्या मनांत जे संशय असतील, जे रागलोभ असतील, किंवा जे पूर्वग्रह असतील ते सर्व संशय, ते सर्व रागलोभ, ते सर्व पूर्वग्रह रेशमाच्या हातानें, आईच्या आणि थोरल्या भावाच्या ममतेनें दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.