आपल्या राज्याच्या विकासांत उद्योगधंद्यांना जें महत्त्व आहे त्याचा खास प्रपंच करण्याची आवश्यकता नाहीं. आपल्या राज्याबाबत एक चमत्कारिक विरोधाभास दृष्टीस पडतो. तो असा कीं, या राज्याची राजधानी औद्योगिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली असून राज्यांतलें फार मोठें क्षेत्र अद्यापि अविकसित अवस्थेंतच आहे. मुंबई शहराचा विकास करण्यास निरनिराळ्या जमातींचे व गटांचे प्रयत्न कारणीभूत झाले आहेत या मताशीं मी संपूर्णपणें सहमत आहें. आजच्या मुंबईचें वैभव वाढविण्यांत या सर्वांनीं महत्त्वाची भूमिका बजाविली असून यापुढेंहि ते आपली भूमिका बजावीत राहतील अशी मला आशा आहे. मुंबई ही आज भारताचें सामर्थ्य व भूषण आहे आणि तिला हें स्वरूप प्राप्त करून देण्यांत या सर्वांचा वांटा आहे. पण त्याबरोबरच उद्योगधंदे चालविण्यासाठी लागणारी बुद्धि ही कोणा एका जमातीचीच मक्तेदारी असूं शकते अथवा एखाद्या जमातींत तिचा अभाव असतो असें समजण्याचें, मला वाटतें, कांहीं कारण नाहीं. विशिष्ट जमाती किंवा गट यांच्याजवळ कांहीं विशिष्ट प्रकारची बुद्धि असते हें श्री. देशमुख यांना मान्य नाहीं. त्यांच्या या मताशीं मी पूर्णपणें सहमत आहे. महाराष्ट्रांतील लोकांनीं त्या त्या काळांतील आवाहनास नेहमींच साथ दिली आहे असें आपणांस दिसून येतें. सोळाव्या आणि सतराव्या शतकांमध्यें त्यांनीं रणांगणावर पराक्रम गाजविले, ब्रिटिश राजवटींमध्यें वेगळेंच चित्र दिसलें; सरकारी नोकरींत त्यांच्या बुद्धीला चांगला वाव मिळतो असें त्यावेळी त्यांना वाटलें. आतां उद्योगधंद्यांची निकडीची गरज लक्षांत घेतां विज्ञान व तांत्रिक क्षेत्रांतील कौशल्य हस्तगत करून उद्योगधंद्यांसंबंधींची आपली जबाबदारी पार पाडण्यास महाराष्ट्रीय लोक तयार राहतील याबद्दल मला मुळींच शंका नाहीं. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणें उद्योगधंद्याच्या क्षेत्रांतहि कोणा एका विशिष्ट जमातीची मक्तेदारी असूं शकत नाहीं. आणि मला खात्री आहे कीं, अशा प्रकारची आत्यंतिक स्वरूपाची विचारसरणी अद्यापिहि कोठें शिल्लक असेल तर काळाच्या ओघांत ती मुळींच टिकून राहणार नाहीं.
तथापि, महाराष्ट्राचें पुरेशा प्रमाणांत औद्योगीकरण घडवून आणण्याचें काम पुष्कळच मोठें व बिकट आहे हें आपणांस मान्य करावें लागेल. औद्योगिक क्षेत्रांत कांहीं कारणांमुळें महाराष्ट्रीय लोक पूर्वी अग्रभागीं चमकूं शकले नाहींत याचा मीं उल्लेख केलेलाच आहे. तसेंच, व्यापारांतहि ते आघाडीवर नव्हते. उद्योगधंद्यांना लागणारा अनुभव व तंत्र आपणांस अवगत होतें. सर्वसाधारणपणें व्यापाराबरोबरच मोठे उद्योगधंदे येत असतात. आतां व्यापाराच्या मागें उद्योगधंद्यांत प्रवेश करण्याऐवजीं, महाराष्ट्रीय लोकांना सरळच त्या क्षेत्रांत प्रवेश करावा लागेल. त्यामुळें नव्या तंत्रांची व नव्या पद्धतींची गरज भासेल. थोडक्यांत म्हणजे, यासाठीं सर्वंकष आणि पराकाष्ठेचे असे प्रयत्न करावे लागतील.
लोकहिताच्या दृष्टीनें अशा प्रकारचे प्रयत्न करण्यांत यावेत यासाठीं मी फार उत्सुक असून असे प्रयत्न यशस्वी रीतीनें निश्चित करतां येतील असा मला विश्वास वाटतो. त्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत देईल. विजेचा व पाण्याचा पुरवठा वाढवून, आणि रस्ते व इतर सर्व सोयींनीं सुसज्ज अशा औद्योगिक वसाहतींचे जाळें तयार करून, सरकार आपल्या परीनें हें कार्य सध्या पार पाडीत आहे. त्यामुळें उद्योगधंद्यांची उभारणी व वाढ करणें सुलभ होईल. उद्योगधंद्यांच्या विकासामध्यें सर्वांत मोठी अडचण म्हणजे भांडवलाची, विशेषतः खेळत्या भांडवलांची आहे, याची सरकारला जाणीव आहे. तथापि, या बाबतींतहि चालू व नव्यानें निघणा-या उद्योगधंद्यांना बँकांकडून सुलभ रीतीनें मदत मिळावी म्हणून महत्त्वाचीं पावलें टाकण्यांत आलीं आहेत. स्टेट बँकेनें जॉइंट स्टॉक बँक व सहकारी बँका यांच्या सहकार्यानें लहान उद्योगधंद्यांसाठीं संघटित केलेली कर्जपुरवठ्याची योजना हें या बाबतींतले एक उदाहरण सांगतां येईल.