नवीं क्षितिजें
... महाराष्ट्राच्या भवितव्याची ही मोठीच मोठी, लांबच लांब सफर आहे... त्या सफरींतील आम्ही प्रवासी आहोंत... ही सफर तुम्हाआम्हांला पुरी करावयाची आहे... ती सफर आज मला माझ्या डोळ्यांसमोर दिसते आहे, विजेच्या प्रकाशानें लखलखल्यासारखी मला दिसते आहे... ती लांबची सफर आहे, कष्टाची सफर आहे, उद्योगाची सफर आहे... पण ती पुरी केलीच पाहिजे... कारण त्यांत जनतेचें कल्याण आहे...
अविकसित देशांचा आर्थिक विकास
आज आपणांसारख्या नामवंत अर्थशास्त्रज्ञांच्या मेळाव्यापुढें भाषण करण्याची मला संधि मिळाली ही माझ्या दृष्टीनें अत्यंत आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. माझ्या भाषणास सुरुवात करण्यापूर्वी आपणां सर्वांचे महाराष्ट्र राज्यांत आणि इतिहासप्रसिद्ध अशा या पुणें शहरांत मी मोठ्या आनंदानें स्वागत करतों.
शास्त्रांतील प्रगति व दळणवळणांत झालेली वाढ यामुळें अंतरासंबंधींच्या आपल्या कल्पना आज भराभर बदलत असून जग जणुं काय संकोच पावत आहे असें वाटतें. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनांतून पाहतां, देशाची आर्थिक व राष्ट्रीय एकात्मता घडून येण्यास यामुळें चांगलीच मदत झाली आहे. एवढेंच नव्हे, तर मानवजातीचें हित चिंतणा-या प्रत्येक माणसापुढें जगाच्या आर्थिक क्षेत्रांत एकात्मता निर्माण करण्याचें जें स्वप्न आहें तें साकार करण्यासहि त्यामुळें एका अर्थानें जोराची चालना मिळाली आहे.
आजच्या परिसंवादांत 'आर्थिक विकासाचे मार्ग' हा जो विषय चर्चेसाठीं ठेवण्यांत आला आहे त्याचा आपल्या या ध्येयाशीं अगदीं निकटचा संबंध आहे. आपल्यापुढील या विषयांतच सूचित झाल्याप्रमाणें देशांतल्या देशांत आणि त्याचप्रमाणें जगांतील प्रगत व अविकसित राष्ट्रें यांच्यामध्यें समतोल आर्थिक विकास घडवून आणण्याचें अनेक आर्थिक मार्ग व पद्धति असून समतोल विकासाचें आपलें उद्दिष्ट साध्य करण्याकरितां आपल्याला त्यांचा अवलंब करतां येईल. या सर्व मार्गांचा व पद्धतींचा सखोल अभ्यास करून त्यांतून आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टिनें कांहीं निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढणें हें आपणांसारख्या तज्ज्ञांचे काम आहे. तथापि, आर्थिक क्षेत्रांत आज आमच्यासमोर असलेल्या प्रश्नांबाबत मी माझे कांही विचार आपल्या परवानगीनें आपल्यापुढें मांडतों.
आर्थिक विकासासंबंधी मी जेव्हां विचार करतों तेव्हां माझ्या मनांत पहिल्यानें आणि प्रामुख्यानें कोणता विचार येत असेल तर तो हा कीं, सबंध जगांतच उत्पन्नाच्या आणि सुखसोयींच्या प्रमाणांत फार मोठी विषमता आहे. ही विषमता त्या त्या देशांतील कांहीं वर्गांपुरतीच मर्यादित आहे असें नाहीं. जगांतील बहुसंख्य देश आज अविकसित असून समृद्ध व आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेले देश मात्र आपल्याला कांहीं खास हक्क आहेत अशा समजुतीनें वागत असल्याचें आपणांस आढळून येतें. आज वस्तुस्थिति अशी आहे कीं, हे सधन देश अधिक सधन व अधिक प्रगत होत असून गरीब देशांचा विकास त्यांच्या वाढत्या लोकसंख्येंमुळें एक तर थांबला आहे किंवा तो अतिशय मंद गतीनें होत आहे. प्रगत आणि अविकसित देशांमध्यें ही जी विषमता आहे ती कमी करण्याच्या दृष्टीनें उपाय शोधून काढणें हीच आजची खरी गरज आहे.