सन्मित्रहो, आणखी काय सांगूं तुम्हांला मी ? माझ्या मनांतला जो भाव आहे तो सांगितला. तुमचें हें प्रेम असेंच राहूं द्या. त्याची मला वारंवार जरूर लागेल. दादांचे आभार मी कसे मानूं? त्याच्यासाठीं माझ्याजवळ शब्द नाहीत. दादा म्हणजे आमच्या दक्षिण साता-यांतल्या माझ्यासकट सगळ्या कार्यकर्त्यांचे एक शक्तीचें स्थान आहे. येथून मी मोठी शक्ति घेऊन आज परत चाललो आहें. विधानसभेमध्यें विभाजनाबाबत मला अनेक वर्णनें ऐकायचीं आहेत. आज त्यांत अनंत अडचणी आहेत. विभाजनाचें बिलहि अगदीं सर्वांगसुंदर, परिपूर्ण आहे असें माझें म्हणणें नाहीं. त्यांतहि कांहीं अपुरेपणा आहे. पण मीं सांगितलें त्याप्रमाणें मैत्रीकरितां, शेजारधर्म निर्माण करण्याकरितां नवीन राज्यांचा जन्म झालेला आहे. म्हणून त्यांत अनेक तडजोडी आहेत आणि त्या बुद्ध्या स्वीकारल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला तत्त्व दाखवा असें म्हणणा-या माणसांना त्यांची तत्त्वनिष्ठा पाहून मी नमस्कार करतो. पण दुनियेमध्ये तत्त्वनिष्ठेनें किंवा नुसत्या तत्त्वाच्या फॉर्मुल्यानें प्रश्न सुटत असते तर पुस्तकें छापणा-या प्रकाशकांनी संयुक्त महाराष्ट्राचे प्रश्न यापूर्वीहि सोडवून टाकले असते. पण हा व्यवहाराचा प्रश्न आहे. जबरदस्त अशा अडचणींचा प्रश्न आहे. याचा अर्थ मात्र असा नव्हे कीं यांत कुठलेंहि मार्गदर्शक तत्त्व नाहीं. माझ्या म्हणण्याचा आशय एवढाच कीं मार्गदर्शक तत्त्वाच्या मदतीनें हे प्रश्न सुटले पाहिजेत, पण त्यांत 'रिजिडिटी' कुठें राहूं शकत नाहीं. आणि म्हणून कुठें कुठें कांहीं देवाणघेवाण मला करावी लागली आहे. पण त्यामध्यें कांहीं गैर आहे असें मी मानीत नाहीं, तत्त्वतः आणि व्यवहारतः तर मुळींच नाहीं. तत्त्वाच्या बाबतींत शक्य तो माझी वृत्ति व्यवहाराची आहे. पण यासंबंधीं मी जास्त कांही बोलता कामा नये. कारण बिलाची चर्चा विधानसभेमध्यें होणार आहे. विधानसभा चालू असतांना, विधानसभेमध्यें चर्चिल्या जाणा-या कुठल्याहि प्रश्नाची चर्चा करायची नाहीं असा दंडक आहे. म्हणून त्या संबंधांनें मी आतां कांही अधिक बोलत नाहीं.
मला येथून आपले सगळे आशीर्वाद घेऊन एका कठीण कामाकरितां जायचें आहे. आपल्या आशीर्वादांची मला फार गरज लागेल. दक्षिण साता-याच्या, उत्तर साता-याच्या, रत्नागिरीच्या, कोल्हापूरच्या, सोलापूरच्या, ठाण्याच्या, पुण्याच्या कितीतरी कार्यकर्त्यांनी मला येथें सद्भावना दिलेल्या आहेत. त्यांचा मी अतिशय आभारी आहे. कोणत्या शब्दांनी मी या मंडळीचे आभार मानूं तें समजत नाहीं. माझ्याजवळ शब्द नाहींत. मी साहित्यिक असतों तर बरें झालें असतें असें अशा वेळी वाटायला लागते. आपण माझ्यावर हा जो प्रेमाचा वर्षाव केला, त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहें. मी कुठेंहि असलों तरी तुमच्या या सद्भावना माझ्या पाठीशीं आहेत. मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करीत राहीन कीं, त्या सदिच्छा आणि त्या सद्भावना यांना पात्र बनण्याची शक्ति त्यानें मला द्यावी.