• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - २२

मीं म्हटलें आपल्याला अजून फारसा उशीर झालेला नाहीं; दहापांच मिनिटें थांबून चौकशी तर करूं या कीं मंडळी कां बसली आहेत ? त्याप्रमाणें आम्हीं गाडी थांबविली. इतक्यांत दोन म्हातारी माणसें पुढें आली आणि म्हणालीं, 'चव्हाणांची गाडी काय ?' मीं 'होय' म्हटलें, आणि आम्ही खालीं उतरलों. मला वाटलें कीं कांहीं तक्रारअर्ज वगैरे असेल तर तो आपण घ्यावा. मीं म्हटलें, 'हो मीच चव्हाण, कांहीं सांगावयाचें आहे का आपल्याला ?' तेव्हां त्यांतल्या एका म्हाता-यानें कांपत कांपत खिशांतून एक पिशवी बाहेर काढली. मला वाटलें पिशवींतून कांही अर्ज काढून देतोय. म्हणून मी हात पुढें करून उभा राहिलों. त्यांने काय काढलें असेल सांगा पाहूं ? त्यानें अर्ज नाहीं काढला. त्यानें फुलांचा हार नाहीं काढला; त्यानें एकेक रुपयांच्या दहा-पांच नोटांनी बांधलेला एक छोटासा हार बाहेर काढला. मी चकित झालों. मला वाटलें या मराठवाड्यामध्यें, या हैद्राबादच्या जुन्या राज्यामध्यें, अशा नोटा द्यावयाची कदाचित् पद्धत असेल. मी माझ्या मनाशीं जरा घाबरलो. मी त्याला म्हणालों, 'आजोबा, तुम्ही मला अर्ज द्याल असें मला वाटत होतें पण तुम्ही हें काय देतां ? मी या पैशाचें काय करूं ?' तर त्यानें मला उत्तर दिलें, 'बाबा, तुझ्यासारखा पुत्र व्हावा अशी इच्छा होती. तुला खाऊला हे पैसे आणले आहेत'. मी पितृवंचित आहे. माझे वडील माझ्या लहानपणींच वारले. पण या वयांतहि आपल्याला खाऊ द्यायला कोणी तरी आहे या भावनेनें माझें मन भरून आले. माझे अश्रु मी थांबवू शकलो नाहीं. मघांच मीं सांगितले त्याप्रमाणे मातेचें हें हृदय जनतेजवळ आहे असें मला वाटतें.

आणि म्हणून जनता रागावली होती ही गोष्ट जशी माझ्या लक्षांत आहे, तशाच जनतेच्या प्रेमाच्या अनेक आठवणीहि माझ्या मनांत आहेत. जनतेचें हे प्रेम आणि या प्रेमाची शक्ति ज्याच्याजवळ आहेत तोच समर्थ मनुष्य बनतो अशी माझी श्रद्धा आहे. माझा विचार बरोबर आहे ही भावना जर माझ्या मनाशीं असेल आणि शेवटीं ज्यांची चाकरी करावयाची आहे, सेवा करावयाची आहे, त्यांची जर ती भावना असेल, त्यांचें जर प्रेम असेल, तर परमेश्वराजवळ आणखी काय मागावयाचें ? मुख्यमंत्रिपद नाहीं मागावयाचें. माझी तशी आकांक्षा नाही. माझी आकांक्षा अशी आहे कीं, यापुढें संयुक्त महाराष्ट्राचें राज्य हें भारताची शक्ति वाढविणारी एक जबरदस्त शक्ति बनली पाहिजे. आणि ती शक्ति देण्याचें काम मंत्रिमंडळामध्यें नसणा-या माणसांनी केलें पाहिजे. त्यांतला जर मी एक होऊं शकलो तर त्यामुळें मला अधिक आनंद वाटेल. मी कांहीं अगदींच आपलें तोंडदेखलें बोलतों आहें असें आपण समजूं नका. ती माझ्या मनांतली एक इच्छा आहे. कारण मी असें मानतो कीं राज्ये जीं चालतात तीं, राज्यें चालविणा-या माणसांपेक्षां राज्यशक्तीच्या बाहेर जीं माणसें असतात त्यांच्या पुण्याईनें चालतात. तीं माणसें ज्या परंपरा आणि ज्या शक्ति निर्माण करतात त्यांच्या साहाय्यानें तीं चालतात. आणि म्हणून मी हे माझे विचार, हें माझें तत्त्व, कधीं सोडणार नाहीं. पण मला जें पाहिजे होतें ते मिळालें. मराठवाड्याच्या अनोळख्या भूमीमध्यें मला खाऊला पैसे देणारा माझा पिता भेटला असें मला जें वाटलें त्यापेक्षां मला आणि काय मागावयाचें आहे ? माझें मन व्यक्तिशः तृप्त आहे; पण सामाजिक दृष्ट्या तें अतृप्त आहे, असंतुष्ट आहे. मघाशीं मीं ज्यांचा उल्लेख केला त्या घरांची, त्या दैन्याची, त्या अज्ञानाची, त्या गरिबीची आठवण झाली म्हणजे मन रागानें उठतें. हें सर्व बदलले पाहिजे, याचा आम्हांला विसर पडतां कामा नये.