• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १४८

एवढें जबरदस्त सामर्थ्य मराठी संस्कृतींत जन्म घेणा-या त्या महाग्रंथामध्यें आहे. आणि याचें कारण त्यांत नुसते शब्द नाहींत, ज्ञानेश्वरांची शक्ति त्यांच्या काव्यांत आहे, त्यांच्या उपमा-उत्प्रेक्षात आहे, त्यांच्या दृष्टांतांमध्यें आहे; ती त्यांच्या कविगुणांमध्यें तर आहेच, परंतु त्याचबरोबर ह्या सगळ्या कल्पनाविलासाला आणि ह्या शब्दसंपत्तीला एक नवीन अर्थ देणा-या त्यांच्या अलौकिक सामर्थ्यांतहि ती आहे. रवीन्द्रनाथ महाकवि झाले, कादंबरीकार झाले, चित्रकार झाले. पण काव्य, कादंबरी, चित्र वगैरे हीं सर्व माध्यमें आहेत. एक प्रकारच्या मर्यादित राष्ट्रवादानें ज्या वेळीं सर्व लोकांना भारून टाकलें होतें त्या वेळीं रवीन्द्रनाथांच्या विचारांतून आणि कादंब-यांतून व्यक्त झालेले विचार आज वाचले म्हणजे भाषेच्या आणि तात्पुरत्या प्रश्नांच्या सीमा ओलांडून त्यांचें मन किती दूर गेलें होतें याची कल्पना येते. त्यांच्या 'घरे बाईरे'चें मराठी भाषांतर मीं वाचलेलें नाहीं. पण इंग्रजींतील 'दि होम अँड दि वर्ल्ड' हें भाषांतर ब-याच वर्षांपूर्वीं मीं वाचलें आहे. माझ्या मनावर झालेला त्याचा परिणाम आजहि मला आठवतो. वंगभंगाच्या आणि त्यापूर्वीच्या दहशतवादाच्या चळवळींत काम करणा-या तरुणांशीं झगडणारा, आणि त्यांच्यासारखीच देशभक्तीची भावना असणारा पण या सगळ्या विचारांच्या पलिकडे गेलेला एक मोठा आदर्श तरुण, त्यांनीं त्यांच्या त्या 'घरे बाईरे' कादंबरीचा नायक म्हणून दाखविलेला आहे. त्या नायकाचा विचार आजहि मनामध्यें आला कीं मन थरारून जातें. एक तत्त्वचिंतक, ध्येयवादी आणि मानवतेचा आणि त्याचबरोबर साधनशुद्धतेचा विचार करणारा असा नायक त्यांच्या विचारांतून निर्माण करण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. यावरून एक कल्पना येते कीं, ज्या वेळीं रवीन्द्रनाथ बंगालीची पूजा करीत होते, बंगालची पूजा करीत होते आणि भारताची पूजा करीत होते, त्याच वेळीं मानवतेचें दर्शन घडविणा-या विचारांच्या दृष्टीनेंहि ते वाटचाल करीत होते. आणि मानवतेचा एक पुजारी हाच रवीन्द्रनाथांचा खरा मूळ संदेश होता, ही गोष्ट आज आपणांला विसरतां येणार नाहीं. आणि म्हणून त्यांच्या बंगाली भाषेंतून व्यक्त झालेल्या विचारांना जेव्हां इंग्रजीचें माध्यम मिळालें तेव्हां बाहेरच्या दुनियेंतील विचारवंत आणि तज्ज्ञ साहित्यिक यांना वाटलें कीं भारतांत एक नवीन सामर्थ्य निर्माण झालें आहें; आणि म्हणून रवीन्द्रनाथांना त्यांना नोबेल प्राइझ द्यावें लागलें. परंतु दुर्दैव असें कीं आमच्यामध्यें एक महाकवि जन्माला आला असल्याचा शोध त्यांना नोबेल प्राइझ मिळाल्यानंतर भारतामध्यें लागला. आमच्यांतील चांगला माणूस शोधण्याकरतां जेव्हां पाश्चिमात्य चष्मा आमच्या डोळ्यांवर बसतो तेव्हां आम्हांला कळतें कीं आमच्यामध्येंही फार मोठीं माणसें निर्माण झालीं आहेत. निदान हें नंतर तरी आम्हांला समजतें आणि उमजतें, ही सुद्धां चांगली गोष्ट म्हटली पाहिजे.

१९३०-३२ ची गोष्ट मला आठवते. त्या वेळीं माझ्या लहानपणीं मी जेलमध्यें असतांना आम्हीं रवीन्द्रांच्या कविता वाचीत असूं. आमच्यामध्यें त्या वेळीं जेलमध्यें खूप शहाणीं आणि विचारवंत माणसें होतीं. त्यांच्यामुळें इंग्रजी भाषेशीं खेळ खेळण्याची मला नुकतीच संवय लागली होती. तरुण, भावनाप्रधान माणसाला गीतांजलि समजावी असें त्या वेळीं वाटे आणि म्हणून मीं गीतांजलि घेतली आणि मोडक्या-तोडक्या इंग्रजीच्या आणि डिक्शनरीच्या मदतीनें ती वाचायला मीं सुरुवात केली. पण त्यांतला तो 'दाऊ' कांही समजेना. कशासाठीं कवि हें सांगतो आहे, त्यांत त्याच्या काय भावना आहेत, त्यांत काय अर्थ आहे, कांहीं सुद्धा त्या वेळीं कळेना. पण आज हें सर्व कळतें. जीवनाचा अर्थ समजल्याशिवाय या कवितांचा अर्थ कळणार नाहीं. आणि जेव्हां पुढें त्यांचा अर्थ कळावयास लागला त्या वेळीं समजलें कीं खूप दूरची नजर ठेवणारा, मानवतेची चिंता वाहणारा, असा एक अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचा आणि थोर संवेदनाक्षम आत्मा या सर्व कवितांतून बोलत होता. आपले विचार, आपल्या भावना व्यक्त करण्याकरितां त्याला जें जें माध्यम मिळालें त्या त्या माध्यमाचा त्यानें उपयोग केला.

रवीन्द्रांसंबधी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे कीं, चित्रकलेचे ते अत्यंत मोठे अभिमानी होते. पण त्यांनीं स्वतः चित्रकलेच्या क्षेत्रांत जें कार्य केलें आहे, तें ख-या अर्थानें वयाच्या साठाव्या वर्षानंतर केलें आहे. आपल्या मराठींतील एक प्रसिद्ध टीकाकार श्री. बेडेकर यांचा मी एक निबंध वाचीत होतों. त्यामध्यें बेडेकरांनीं त्याचा जो खुलासा केला आहे तो मला विचार करण्यासारखा वाटला. त्यांचा तो खुलासा खरा आहे किंवा नाहीं हें मला माहीत नाहीं. परंतु तो विचार करण्यासारखा जरूर आहे.