• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १४७

मानवतेचे पुजारी महाकवि रवीन्द्रनाथ टागोर

भारताचे दोन सुपुत्र रवीन्द्रनाथ टागोर आणि मोतीलाल नेहरू यांच्या जन्माला चालू सालीं शंभर वर्षे पूर्ण झालीं म्हणून काल आणि आज, सबंध भारतभर आम्ही दोन महत्त्वाच्या संवत्स-या साज-या करीत आहोंत. यांपैकीं महाकवि रवीन्द्रनाथ टागोर यांची संवत्सरी साजरी करण्यासाठीं आपण सर्वजण आज येथें जमलों आहोंत. १८५७ नंतर अवघ्या चार वर्षांनीं येणारें १८६१ हें साल, या दोन महाभागांच्या जन्मामुळें भारताच्या इतिहासांतील एक फार महत्त्वाचें साल म्हणून गणलें जाणार आहे. १८५७ सालीं या देशांत सुरू झालेली स्वातंत्र्याची प्रेरणा इतकी महत्त्वाची ठरली कीं त्यासाठीं किती तरी महापुरुषांना भारतामध्यें जन्म घ्यावा लागला. आज ज्या महाकवीची संवत्सरी आपण येथें साजरी करीत आहोंत तो कवि या महापुरुषांपैकींच एक असून त्याचें जीवन इतकें विशाल व उदात्त आहे कीं आणखी अनेक शतकें आपल्या देशामध्यें त्याची जन्मसंवत्सरी साजरी केली जाईल. आज त्या महाकवीच्या जीवनासंबंधीं मराठीच्या राजकवींनीं आपले विचार आपल्यापुढें मांडले असतांना माझ्यासारख्या राजकारणामध्यें वावरणा-या माणसानें काय सांगावें असा माझ्यापुढें प्रश्न पडला आहे. परंतु महाकवीचें जीवन इतकें थोर, इतकें उदात्त आणि सर्वस्पर्शी असतें कीं राजकारणाच्या खटाटोपांत असणा-या माणसाच्या मनालाहि स्पर्श करण्याचें सामर्थ्य त्यामध्यें असतें. माझें आजचें हें भाषण हीच त्याची उत्तम साक्ष आहे.

रवीन्द्रनाथ टागोर जन्माला आले त्यावेळीं भारतांत एक विशिष्ट परिस्थिति होती आणि बंगालचीहि परिस्थिति, एका विशिष्ट अर्थांनें, एका निराळ्या त-हेची होती. सामाजिक नवजीवनाची चळवळ भारतामध्यें बंगालनें पहिल्या प्रथम सुरू केली हें आपणांला मान्य करावें लागेल. राजा राम मोहन रॉय यांनीं सुरू केलेल्या नवजीवनाच्या चळवळीचा वारसा बंगालला लाभला होता. रवीन्द्रांचे पिताजी देवेन्द्र ह्यांनीं तीच पुरोगामी परंपरा पुढें चालू ठेवली होती. अशा या नवविचारांनीं भारलेल्या एक सुखासीन घरामध्यें रवीन्द्रांचा जन्म झाला. त्यांच्यासारख्या प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या तरुणाच्या संवेदनाक्षम मनाची कसकशी वाढ होत गेली त्याचा पुरावा त्यांच्या जीवनामध्यें आपणांला पाहावयाला मिळतो. थोर कवि, थोर कादंबरीकार, थोर तत्त्वज्ञ, थोर कलोपासक म्हणून रवीन्द्रनाथांना आम्हां भारतीयांच्या जीवनांत फार महत्त्वाचें स्थान आहे.

त्यांच्या काव्यासंबंधानें बोलण्याचा अर्थात् माझा अधिकार नाहीं. त्यांच्या वाङ्मयासंबंधानें आज किती तरी थोर साहित्यसेवक बोलत आहेत, लिहीत आहेत. गेल्या कांही आठवड्यांत रवीन्द्रांच्या संबंधानें सर्व भाषांमध्यें किती तरी लिहिलें गेलें आहे. तरी सुद्धां त्यांच्या जीवनासंबंधीं अद्यापिहि किती तरी विचार करण्यासारखें, किती तरी लिहिण्यासारखें आहे हाच विचार मनांत येतो. शिवाजीमहाराजांच्या जीवनाचा संदेश बंगालीमध्यें पोंचविण्याचें काम रवीन्द्रांनी केलें. तुकारामाच्या अभंगांचेंहि त्यांनीं बंगालीमध्यें भाषांतर केलें. म्हणजे मराठी पराक्रमी पुरुषांच्या आणि मराठी संतांच्या जीवनाचा संदेश बंगालीपर्यंत पोंचविण्याचा प्रयत्न रवीन्द्रांनी केला ही गोष्ट आम्हांला कबूल केली पाहिजे. परंतु इतकें सांगितल्यानंतर सुद्धां एक गोष्ट बाकी राहते ती ही कीं, त्या रवीन्द्राच्या जीवनाचा आणि काव्याचा संदेश मराठीमध्यें ज्या प्रमाणांत यावयास पाहिजे होता तितका तो आला नाहीं. ही गोष्ट संशोधकांना व विचारवंतांना आज विचार करावयास लावते आहे. कुठलाहि महाकवि किंवा कुठलाहि कवि निव्वळ शब्दांचा जुळारी होऊन कवि होऊं शकत नाहीं. नादमाधुर्य म्हणजेच काव्य असें आपणांला म्हणतां येणार नाहीं. आपल्या मराठी वाङ्मयामध्येंहि असा एक काळ होता कीं ज्या वेळीं शब्दलालित्य म्हणजेच साहित्य असें समजून अशा साहित्यामागें लोक धाव घेत. परंतु निव्वळ नादमाधुर्यांतूनच निर्माण होणा-या काव्यांत जनतेचें मन काबीज करण्याचें सामर्थ्य निर्माण होऊं शकत नाहीं. त्या जुळणा-या सुंदर नादमधुर शब्दांच्या पाठीमागें एक नवा सामर्थ्यवान संदेश देणारें मन आणि विचार असल्याशिवाय कवि किंवा महाकवि निर्माण होऊं शकत नाहीं. आमच्या मराठीचें भाग्य असें आहे कीं तिचा पहिलाच कवि एवढा मोठा महाकवि होऊन गेला कीं त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारें सामर्थ्य अजून मराठींत निर्माण झालेलें नाहीं. मी तर नेहमीं अभिमानानें सांगतों कीं मराठीचा जन्मच मुळीं, कवि यशवंतांनीं आतांच म्हटल्याप्रमाणें हनुमंतासारखा झाला. हनुमंतानें जन्मतांच जें पहिलें उड्डाण केलें ते सूर्यबिंबाला गांठण्यासाठीं. मराठींतला पहिला ग्रंथ ज्ञानेशांची ज्ञानेश्वरी; तिनेंहि पहिलेंच एवढें जबरदस्त उड्डाण केलें आहे कीं तिच्या जवळपास जाऊन पोचण्यासाठीं बाकीच्या कवींना सारखी धावपळ करावी लागते.