• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १४४

मीं कुठल्याहि पक्षीय दृष्टीनें हा विचार येथें मांडलेला नाहीं. कारण आजचें हें व्यासपीठ कांहीं तशा अर्थाचें व्यासपीठ नाहीं. आजचे हें व्यासपीठ लोकमान्यांच्या सगळ्या वंशजांचें व्यासपीठ आहे. निव्वळ जयंतरावांचें हें व्यासपीठ नाहीं आणि निव्वळ टिळक स्मारक मंदिराच्या ट्रस्टी बोर्डाचेंहि नाहीं. लोकमान्यांना आपलें म्हणणा-या, लोकमान्यांच्या स्तुतीला आपली स्तुति समजणा-या, लोकमान्यांच्या जीवनाला आपलें स्फूर्तिस्थान मानणा-या, लोकमान्यांच्या स्मृतीला वंदन करणा-या आणि भारताला आपला देश मानणा-या सर्व भारतीयांचें हें व्यासपीठ आहे. आज आम्हांला अनेक दृष्टींनीं लोकमान्यांचें जीवन स्फूर्तिदायक होणार आहे. शेवटीं, कितीहि पक्ष असले, कितीहि राजकीय विचार असले तरी या सर्वांपेक्षां मोठें असें जें लोकजीवन आहे, त्या लोकजीवनाचे प्रश्न सोडविण्यासाठीं, त्या लोकजीवनाची सेवा करण्यासाठींच त्या सर्व पक्षांचा, त्या सर्व विचारांचा जन्म झालेला असतो. हा मूळ विचार तुम्हांला आम्हांला विसरतां येणार नाहीं. आणि अशीं कित्येक क्षेत्रें आहेत, असे कित्येक विचार आहेत, अशा कित्येक बाबी आहेत कीं ज्यामध्यें लोकमान्यांचे मूलभूत विचार, लोकमान्यांची मूलभूत श्रद्धा आजहि तुम्हां-आम्हांला मार्गदर्शक होईल.

त्यांच्या या विचारांतला राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा विचार मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. हिंदुस्तान स्वतंत्र झाल्याला आज जवळजवळ चवदा-पंधरा वर्षे होत आली. तरी आजहि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न एक समस्या समजला जातो. या प्रश्नाचा उल्लेख, केवळ मेजॉरिटी-मायनॉरिटीचा प्रश्न, हिंदु-मुसलमानांचा प्रश्न एवढ्याच मर्यादित अर्थानें करून मी आज बोलत नाहीं. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न हा अजूनहि आमच्या देशामध्यें आहे याची चिंता देशांतील सर्व माणसांना आहे यांत कांहीं शंका नाहीं. राष्ट्रीय एकता आणि एकराष्ट्रीयत्व ही आपल्या देशाला नवी गोष्ट आहे हें आपण नाकारण्यांत कांहीं फारसा अर्थ नाहीं. आज जी एक जिऑग्रॅफिकल एन्टिटी - भौगोलिक एकता - आमची आहे, आणि जी पाकिस्तानच्या पूर्वीसुद्धां होती असें आपण गृहीत धरलें, तरी राष्ट्रीय एकता ही एका अर्थानें ज्याला आपण मॉडर्न कन्सेप्ट म्हणतों अशी अलीकडची एक आधुनिक कल्पना आहे. आज ती प्रत्यक्ष जीवनांत आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतांना यांत लाख अडचणी उभ्या राहिल्या आहेत. एक राष्ट्र म्हणून जगावें असें सांगणें व एका घटनेच्या कायद्यानें एकत्र येणें ही एक गोष्ट आहे. पण दैनंदिन जीवनामध्यें येणा-या सगळ्या संकंटांना तोंड देऊन ती गोष्ट प्रत्यक्ष अंमलांत आणणें आणि ती एक शक्ति आहे असें स्वतः सिद्ध करून त्याची प्रचीती दुस-याला आणून देणें हा इतिहासाचा एक दुसरा भाग आहे. इतिहासाच्या त्या कालखंडांतून आपण आज चाललों आहोंत. त्यांतून कांहीं अडचणी निर्माण होत असतात. अनेक आंतरराज्य स्वरूपाचे प्रश्न निर्माण होत असतात. महाराष्ट्रापुरतें बोलायचें झालें तर तूर्त तरी आमचे दोन राज्यांशीं प्रश्न आहेत. एक आंध्र आणि दुसरें म्हैसूर. पण मी यापेक्षां जास्त व्यापक त-हेच्या प्रश्नाला हात घालून बोलतों आहें. असे हे प्रश्न येणारच. थोड्याच वर्षांपूर्वी म्हैसूर विभाग आणि आंध्र विभाग हीं आपआपल्या क्षेत्रांमध्यें छोटीं राज्यें होतीं. पण आज तीं एका संघराज्यांतलीं शेजारी राज्यें म्हणून जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतिहासकालांतला निदान मला माहीत असलेल्या परिस्थितींतला आपल्याकडील हा पहिला प्रयोग आहे.

तेव्हां दोन शेजारी याप्रमाणें एकत्र आल्यामुळें कांहीं नवे प्रश्न उत्पन्न होणारच. त्याचमुळें कित्येक नवीन त-हेच्या समस्या आज आपल्या देशांत निर्माण होत आहेत. नद्यांच्या पाण्याचा वापर करण्याचा प्रश्न नद्यांचा उगम झाल्यापासून आपण पहिल्या प्रथमच उत्पन्न करीत आहोंत. इतिहासकालीं घडणारी ही एक नवीन गोष्ट आहे. गोदावरीच्या पाण्याचा वाद आंध्र आणि महाराष्ट्र यांमध्यें गोदावरी जेव्हां जन्माला आली त्या वेळेस झाला असता तर या गोदावरीचें 'गोदावरी' असें एकच नांव राहिलें नसतें. तेव्हां एका नव्या त-हेचें एकतेचें जीवन जगण्याचा आम्ही जो प्रयत्न करीत आहोंत त्यांतून कांहीं नव्या समस्या निर्माण होणें साहजिक आहे. या नव्या समस्या सोडवून, त्यांच्यावर स्वार होऊन, आमचें हें भारतीय जीवन आहे, आमचें हें एकराष्ट्रीयत्वाचें जीवन आहे, या त-हेची प्रचीति घेणें आणि देणें हें काम या देशामध्यें जर यशस्वी करायचें असेल तर, शेवटीं लोकमान्य टिळक आणि त्यांच्याबरोबरचे जे आमचे थोर राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनीं भारतासंबंधानें बोलतांना एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेसंबंधीं जी निष्ठा दाखविली त्या निष्ठेची जोपासना आम्हीं आजहि केली पाहिजे.

एकराष्ट्रीयत्वाची ही कल्पना आज जरी कांहींशी नवी असली तरी सुद्धां आमच्या परंपरेंतून आम्ही एक होतों, आमच्या संस्कृतीमुळें आम्ही एकत्र आलों होतों, या आमच्या जुन्या इतिहासानें दिलेल्या ज्या कांहीं देणग्या आहेत त्यांच्यासंबंधींची आठवण देऊन एकत्र राहण्याची त्यांनी आम्हांला जी शिकवण दिली ती शिकवण माझ्या मतानें आमचा फार मोठा वारसा आहे. एका नवीन होतकरू पण बुद्धिमान अभ्यासू माणसानें त्याच्या 'डेंजरस डिकेड्स' या पुस्तकांत हिंदुस्तानच्या सध्यांच्या जीवनाचें वर्णन करतांना त्याच्या मनाशीं आलेला विचार बोलून दाखविला आहे. तो असा आपणांला बाजूला काढतां येण्यासारखा विचार नाहीं. त्यानें असें म्हटलें आहे कीं, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर निर्माण होणारे आवेश, आनंद व उत्साह यांत आपली पहिलीं आठ-दहा वर्षे गेल्यानंतर एकराष्ट्रीयत्वाच्या जीवनांतल्या अत्यंत कठीण अशा दशकाच्या तोंडाशीं, उंबरठ्याशीं आम्ही उभे आहोंत. आणि म्हणून ज्यांनीं एकराष्ट्रीयत्वाचा विचार भारताला दिला आणि शिकविला, जे सबंध जन्मभर त्यासाठीं झगडत राहिले, त्यांचें जीवन आणि त्यांचे विचार, त्यांचा व्यासंग आणि त्यांची निष्ठा यांच्या पूजेची हिंदुस्थानमध्यें यापूर्वी कधींहि भासली नव्हती एवढी आवश्यकता आज निर्माण झाली आहे. लोकमान्यांच्या जीवनाचा मला समजलेला हा अर्थ आहे.