• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १४३

परंतु त्याचबरोबर त्यांचे जे कांहीं वैयक्तिक गुण दिसले त्या गुणांचें मोल फार मोठें आहे. आणि तुम्हां आम्हांला, महाराष्ट्राला, पुण्याला, या गुणांची जरुरी आहे असें मला वाटतें. त्यांची पुण्याला जरुरी आहे असें मी म्हणतों म्हणजे पुण्यामध्यें ते गुण नाहींत असा त्याचा अर्थ नाहीं. ते गुण पुण्यानें पुष्कळ प्रमाणामध्यें दाखविलेले आहेत. त्या गुणांचा आपल्या पंतप्रधानांनीं अलीकडेच अत्यंत गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला आहे. परंतु संकट आल्यानंतर त्याला कसें तोंड द्यावें ही गोष्ट आज आम्हीं शिकली पाहिजे. चिरोल केस लोकमान्य हरल्यानंतर लंडनहून त्यांनीं जें पत्र लिहिलें आहे त्यांतील चारदोन वाक्यें या दृष्टीनें मला फार महत्त्वाचीं वाटलीं. चिरोल केस जिंकण्याकरितां ते लढले, पण अखेर ते ती केस हरले. त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळांतील ती एक अत्यंत कठीण अशी गोष्ट होती. पण ती केस लोकमान्य हरल्यानंतर लोकमान्य या निकालामुळें मनानें खचले आहेत अशा प्रकारचा प्रचार पुण्यामध्यें चालू होता. त्याला उत्तर देण्याकरितां म्हणून लोकमान्यांनीं जें पत्र लिहिलें आहे तें त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचें पूर्ण निदर्शक आहे. त्यांतलीं चार वाक्यें मी तुम्हांला वाचून दाखवितों. प्रत्येक मूळ इंग्रजी वाक्य आणि त्याचें भाषांतर मी तुम्हांला सांगतों. लोकमान्यांचें पहिलें वाक्य असें आहे : "The news about my being dejected by the unexpected result of the case i.e. Chirol Case, is entirely groundless. - या चिरोल केसच्या अनपेक्षित निकालामुळें मी मनानें खचलों आहें अशी जी बातमी आहे ती निराधार आहे.''

त्यांनीं पुढें म्हटलें आहे, "I am now too old a hand to be upset even if the heavens were to fall down. - मी आतां इतका वृद्ध झालों आहें कीं, आकाश जरी कोसळलें तरी मीं त्याची क्षिति करावी अशा मनःस्थितींत किंवा अशा परिस्थितींत मी राहिलेलों नाहीं.''

आणि शेवटीं ते म्हणतात, "I would rather utilise the fall of the heavens for my purpose than be dismayed thereby. - आकाश जरी कोसळलें तरी त्या कोसळलेल्या आकाशावर पाय रोवून त्याचा उपयोग मी करून घेईन, पण मी घाबरणार नाहीं.''

लोकमान्यांची अशी ही दृष्टि आहे. आजच्या पुण्यालाच नव्हे, आजच्या महाराष्ट्रालाच नव्हे, तर आजच्या हिंदुस्तानला आणि कदाचित् आजच्या मानवतेलाहि अत्यंत उपयुक्त ठरावें असें विलक्षण निर्धाराचें तें शेवटचें वाक्य आहे. कुठल्याहि देशाच्या नेत्यांनीं ध्येयवाक्य मानावें, बावरलेल्या आजच्या मानवतेला सुखाकडे नेण्याचा प्रयत्न करणा-या प्रत्येक माणसानें आपल्या हृदयावर कोरून ठेवावें, इतकें थोर तें घोषवाक्य आहे. त्याची नुसती घोषणा त्यांनीं केली असें नव्हें, तर त्याप्रमाणें जीवनाचा प्रत्येक क्षण ते जगले. कुठल्याहि सभेंत उच्चारलेलें तें वाक्य नव्हतें, तर आपल्या मित्राला त्यांनीं लिहिलेल्या एका पत्रामधलें तें वाक्य आहे. त्या वाक्यामधून व्यक्त झालेला निर्धार वयाच्या अखेरच्या वर्षांतला आहे. म्हातारपणीं लिहिलेलें तें वाक्य आहे. तरुणपणीं लोकमान्य जर हें बोलले असते तर कसें बोलले असते याची अजून मला कल्पना येत नाहीं. जीवनाची संध्याकाळ अगदीं जवळ आली असतांना, मी वृद्ध झालों असें सांगत सांगत त्यांनीं हें वाक्य लिहून जो निर्धार व्यक्त केला आहे तो निर्धार तुम्हांला आम्हांला आज, उद्यां आणि सतत मार्गदर्शन करणार आहे. तुम्हां-आम्हांला जन्मभर संदेश देणारें हें वाक्य ज्यांनीं लिहिलें त्या लोकमान्य टिळकांची पुण्यतिथि तुम्ही-आम्ही आज साजरी करीत आहोंत.

लोकमान्यांसारख्या थोर पुरुषाचें जीवन आपल्याला कोणत्या दृष्टीनें मार्गदर्शक झालें पाहिजे याचा विचार करण्याची आज आवश्यकता आहे. निव्वळ मी पुण्याच्या पुरापुरतें मर्यादित बोलूं इच्छीत नाहीं. लोकमान्यांच्या पुण्यांतला पूर हा एक मोठा हृदयद्रावक प्रसंग आहे; परंतु निव्वळ पुण्याच्या पुराच्या प्रसंगापुरताच संदेश घेऊन लोकमान्यांच्या जीवनाला मी पुण्याच्या पूर्व - पश्चिम सीमेमध्ये मर्यादित ठेवूं इच्छीत नाहीं. कारण फार थोर असें तें जीवन आहे. लोकमान्यांचें व्यक्तिमत्त्वच असें आहे कीं आज सर्वच पक्षांना लोकमान्य आपले आहेत असें वाटतें. घरांतल्या सगळ्यांत मोठा मनुष्य हा सगळ्यांचा असतो. तेव्हां लोकमान्यांनीं एका विशिष्ट त-हेच्या विचारांचें राजकारण त्या काळीं मांडलेलें असलें तरी आज लोकमान्य ही कांहीं निव्वळ व्यक्ति राहिलेली नाहीं, निव्वळ एक संस्था राहिलेली नाहीं. लोकमान्य हा अत्यंत स्फूर्तिदायी असा एक संदेश, असा एक विचार आहे आणि तो आमच्या इतिहासांतला एक ठेवा आहे.