लोकशाहींतील प्रशासन
पोलिटिकल सायन्स आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या दोन असोसिएशनच्या सदस्यांपुढें एकत्र भाषण करण्याची मला ही संधि मिळाली त्याबद्दल मला आनंद होत आहे. राज्यशास्त्र व प्रशासन ह्या दोन्हींचा एकमेकांशीं फार निकटचा संबंध आहे. राज्यशास्त्राचा मी विद्यार्थी होतों व अद्यापिहि आहें. आणि प्रशासनाचा मीं कधीं अभ्यास केला नसला तरी गेल्या कांहीं वर्षांपासून प्रत्यक्ष प्रशासनाच्या क्षेत्रांत मी काम करीत आहें. लोकशाहींतील प्रशासनासंबंधीं जेव्हा आपण बोलतों, त्यावेळीं त्यासंबंधींच्या आपल्या कल्पना स्पष्ट असणें जरुरीचें आहे असें मला वाटतें. लोकशाहीची कल्पना हीच मुळीं बदलत जाणारी कल्पना असून तशी ती असणें अगदीं स्वाभाविक आहे. लोकशाही हा शब्द शेंकडो वर्षांपूर्वी ज्या मानवानें प्रथम उच्चारला त्यानें कोणत्या अर्थानें तो उच्चारला असेल हें नक्की सांगतां येणें आज अशक्यच आहे. परंतु लोकांशीं ज्याचा प्रत्यहीं संबंध येतो व जें जनमनाचें प्रतिनिधित्व करतें असें शासनाचें तंत्र म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीसंबंधीं एक कल्पना पूर्वी सर्वत्र प्रचलित होती. तथापि इतिहासाच्या ओघांत लोकांच्या विचारांत परिवर्तन झालें, त्यांच्या सभोवतींची परिस्थिति बदलली, त्यांच्यापुढील प्रश्न बदलले आणि त्यांच्यातील संबंधांत देखील बदल घडून आला. त्यामुळें त्यांच्या राजकीय कल्पनांत उत्क्रांति होऊन लोकशाहीबद्दलच्या त्यांच्या कल्पना साहजिकपणेंच बदलत गेल्या. आपण जेव्हां एखाद्या सामाजिक शास्त्राचा विचार करूं लागतों, तेव्हां आपण बदलत्या जगांत राहात आहोंत व सामाजिक जीवन परिवर्तनशील आहे हें सत्य आपल्याला लक्षांत घ्यावें लागतें. ह्या परिवर्तनाच्या बरोबरीनें त्या सामाजिक शास्त्रानें आपलीं पावलें टाकलीं पाहिजेत हें ओघानेंच आलें. राज्यशास्त्र हेंहि एक सामाजिक शास्त्र असल्यामुळें निरनिराळ्या काळी आणि निरनिराळ्या देशांत लोकशाहीची कल्पना निरनिराळी असावी यांत आश्चर्य नाहीं. आपल्या देशांत आपण ज्या संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे ती सुद्धां लोकशाहीची एक विशिष्ट पद्धत असून तिचेंहि स्वरूप पुढें हेंच राहील अशी खात्री मी तरी देऊं शकणार नाहीं. कारण भविष्यांतील बदलत्या परिस्थितींत तिचें स्वरूप हेंच राहिलें तर तिचें प्रातिनिधिक स्वरूप नष्ट होऊन भावी पिढ्यांच्या आशाआकांक्षाचें प्रतिबिंब तिच्यांत पडूं शकणार नाहीं.
लोकांचें, लोकांसाठीं आणि लोकांनी चालविलेलें शासन म्हणजे लोकशाही असें लोकशाहीचें वर्णन करण्यांत येतें. परंतु ही अगदीं औपचारिक स्वरूपाची व्याख्या आहे, कारण या व्याख्येवरून लोकशाही सरकारच्या कार्यपद्धतीचा नक्की बोध होत नाहीं. माझ्यापुरतें मी असें म्हणेन कीं, प्रशासनांतील लोकशाही म्हणजे एकमेकांच्या सतत विचारविनिमयानें चालणारा राज्यकारभार होय. कोणत्याहि प्रकारचा साचेबंद दृष्टिकोन न ठेवतां लोकांचे प्रतिनिधि एकत्र येऊन जिथें विचारविनिमय करतात अशा शासनाच्या पद्धतीला मी लोकशाही म्हणतों. लोकशाहींत जनतेच्या मूलभूत प्रश्नांसबंधीं एकवाक्यता व्हावी व ते सोडविले जावेत म्हणून चर्चा करून मार्ग काढण्याचा लोकप्रतिनिधि प्रयत्न करीत असतात. पण लोकशाहीच्या ह्या किंवा आतांच मीं उल्लेख केलेल्या दुस-या व्याख्येंत, शासन आणि प्रशासन यांचाच विचार प्रामुख्यानें आहे असें आपणांस आढळून येईल. परंतु लोकशाहीचें तत्त्व ज्या वेळीं आपण मान्य करतों तेव्हां आपण शासनाचें फक्त बाह्य स्वरूपच मान्य करतों असें मला वाटत नाहीं. लोकशाहीचा अर्थ शासनाचा केवळ एक प्रकार असा होत असेल तर अशा लोकशाहीसंबंधीं मला बिलकुल आकर्षण वाटणार नाहीं.
या प्रश्नाचा अधिक खोल विचार करण्यापूर्वी शासन आणि प्रशासन या दोन निराळ्या गोष्टी आहेत हें प्रथम समजून घेणें आवश्यक आहे. एखादी व्यक्ति यशस्वी प्रशासक आहे असें म्हटलें जातें. तेव्हां शासन म्हणून जी कल्पना आहे ती डोळ्यापुढें उभी राहात नाहीं. प्रशासन म्हणजे राज्यकारभार ही शासनाची फक्त एक बाजू आहे. शासनाची दुसरी बाजू राजकीय आहे. राजकीय दृष्ट्या म्हणजे जनतेच्या दृष्टिकोनांतून आपण जेव्हां लोकशाहीसंबंधीं बोलतों आणि हुकुमशाहीपासून ती निराळी आहे असें मानतों, तेव्हां राज्यकारभाराच्या यशापयशाचें मूल्यमापन एक विशिष्ट कसोटी लावून आपण करतों. लोकांचे समाधान कशांत आहे हें शोधणें अत्यंत कठीण असतें. लोकांना आज ज्यांत समाधान आहे त्यांत कांही दिवसांनी त्यांना समाधान वाटेलच असें नाहीं. परंतु लोकशाही सरकार जें कांहीं करीत असतें त्यापासून लोकांना समाधान मिळालें पाहिजे, ही गोष्ट निःसंशय. म्हणून लोकांचे समाधान हा लोकशाही राज्यकारभाराचा एक निकष म्हणून आपण मानतों तेव्हां त्याच्या मुळाशीं कोणतें तत्त्व आहे हे आपण पाहिलें पाहिजे. लोकशाही म्हणजे शासनाची केवळ एक पद्धत असें पूर्वी समजलें जात असें. परंतु शासनाची अशी पद्धत निर्माण करणें हा राजकीय लोकशाहीचा अंतिम हेतु आहे असें आतां कोणी मानीत नाहीं. केवळ मतदानाचा औपचारिक स्वरूपाचा हक्क सर्वांना मिळणें व आपले प्रतिनिधि लोकसभेंत पाठवितां येणें म्हणजेच लोकशाही इतका मर्यादित अर्थ लोकशाहीचा असेल तर समाजाच्या दृष्टीनें यापेक्षां अधिक हानिकारक अशी दुसरी गोष्ट असूं शकणार नाहीं.