• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १३२

मला एवढेंच सांगावयाचें आहे कीं, समाजवादाच्या दिशेनें आज आम्हीं दोन पावलें टाकलीं आहेत. परंतु अजून शें-दीडशें पावलें आम्हांला टाकावयाचीं आहेत. हिंदुस्तानांत समाजवादाची व्याख्या नव्यानें करावयास हवी, अशा अर्थाचें कुठल्या तरी लेखांतील एक वाक्य श्री. भंडारे यांनीं येथें उद्धृत केलें. मी तर असें म्हणेन कीं, प्रत्येक देशालाच आपल्या परिस्थितीनुरूप समाजवादाची अशा प्रकारें नव्यानें व्याख्या करावी लागेल. तेव्हां, हिंदुस्तानच्याच बाबतींत असें म्हणण्याचें कांही कारण नाहीं. समाजवादाचीं दोनतीन गमकें आहेत. त्यांचा उल्लेख मीं अगोदरच केला आहे. परंतु पुन्हा एकदां त्यांचा मी थोडक्यांत उल्लेख करतों. सर्वांना समान संधि मिळाली पाहिजे, उत्पन्नांत जो फार मोठा फरक आहे तो कमी झाला पाहिजे, आर्थिक विषमतेमुळें जी पिळवणूक होते ती बंद झाली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीचें जें व्यक्तिमत्त्व असतें त्याचा विकास करण्याची संधि त्या व्यक्तीला मिळाली पाहिजे. आमची समाजवादाची व्याख्या ही अशी आहे. पण मीं हें जें सांगितलें तें देखील मोघम आहे. ही गोष्टच अशी आहे की, ती शब्दांत उभी करण्याचा कितीहि प्रयत्न केला तरी ती अस्पष्टच राहते.

पण निश्चित अशा समाजवादाकडे जाण्याची आमची इच्छा आहे. शास्त्रशुद्ध समाजवादाचा आम्हीं पुरस्कार केला आहे असें कम्युनिस्ट पक्ष गेल्या तीसचाळीस वर्षांपासून सांगत आलेला असला, तरी दहा कम्युनिस्ट राष्ट्रांतील परिस्थिति वेगवेगळी आहे हें आपल्याला कबूल करावें लागेल. रशिया आणि चीन यांचा कांहीं गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदीं वेगवेगळा आहे. सांप्रदायिक निष्ठा म्हणून पूर्वी जो सिद्धांत सांगण्यांत आला आहे त्याविषयीं देखील आज वाद आहे. लेनिन, मार्क्स, एन्जल्स आज जर असते तर काय झालें असतें हें सांगतां येणें कठीण आहे. परंतु मी त्या वादांत जाऊं इच्छीत नाहीं. आम्हांला जो अनुभव येईल त्याप्रमाणे हिंदुस्तानांतील समाजवादाची रचना आम्हांला स्वतंत्रपणें करावयाची आहे. त्या दृष्टीनें कशीं पावलें टाकलीं पहिजेत एवढेंच फक्त आम्हीं सूचित केलें आहे. येत्या दहा वर्षांत समाजवाद निर्माण होईल असें आम्हीं म्हटलेलें नाहीं. चाळीस वर्षें उलटून गेल्यानंतरहि रशियांत संपूर्ण समाजवाद स्थापन झाला आहे असा दावा रशियाला आजहि करतां येत नाहीं. मी त्यांची अलीकडची सप्तवार्षिक योजना पाहिली. तिच्या प्रारंभीं असें म्हटलें आहे कीं, आम्हांला जो समाजवाद प्रस्थापित करावयाचा आहे त्याची वाटचाल सुरू आहे. समाजवादाकडे जाण्याचा त्यांचा प्रवास अद्यापि संपलेला नसून त्यांच्याकडे जो आदर्श आहे त्याकडे जाण्याची त्यांची अजून तयारी चालू आहे. त्याचप्रमाणें आम्हांलाहि आमच्या समाजाला समाजवादी निष्ठा द्यावयाची आहे. त्या ध्येयाकडे जाण्याचा निर्धार आम्ही आतां व्यक्त करूं लागलों आहोंत, दिशा कायम करण्याचा प्रयत्न करूं लागलों आहोंत. यासंबंधींचा संपूर्ण कार्यक्रम या शासनानें मांडलेला आहे असा आमचा मुळींच दावा नाहीं. तो कार्यक्रम जनतेचीं मनें तयार करून निर्माण करावा लागेल. परंतु समाजवादाकडे जाण्याचा आमचा निर्धार आहे, तें आमचें ध्येय आहे असें आम्ही आतां सांगूं लागलों आहोंत. हा आमचा मूलभूत उद्देश आहे आणि तेवढ्याच मर्यादेंत आम्हीं आतां केलेल्या घोषणेचा विचार आपण करावयास पाहिजे.

आम्हीं आमचे धोरण जाहीर करून स्वतःच्या परीक्षेच्या कसोट्या आम्हीं जनतेच्या ताब्यांत दिल्या आहेत. आम्हांला या दिशेनें जावयाचें आहे असें आम्हीं जाहीर केलें आहे. महाराष्ट्र शासनाच्या कार्याची योग्य परीक्षा व योग्य मूल्यमापन जनतेला करावयाचें असेल तर तें आम्हीं जाहीर केलेल्या कसोट्यांवरून जनता करूं शकते. त्या कसोट्या आम्हीं जनतेच्या हातांत दिल्या आहेत. परंतु समाजवादाचें धोरण आम्हीं जाहीर केल्याबरोबर, कोठें आहे समाजवाद, असें ताबडतोब विचारून चालणार नाहीं. कारण लक्षावधि माणसांच्या दैनंदिन प्रयत्नांतून हळूहळू निर्माण होणारें असें तें चित्र आहे. विणकर जेव्हां महावस्त्र विणण्यासाठीं बसतो तेव्हां तें महावस्त्र ताबडतोब तयार होत नाहीं. सुरुवातीला जेव्हां तो आपल्यासमोर गुंतागुंतीचे सगळे लांब धागें टाकून बसतो तेव्हां आपल्याला सगळा गोंधळ दिसतो. एका धाग्याशीं दुसरा धागा समांतर अशा पद्धतीनें टाकलेले अनेक धागे आपल्याला दिसतात. त्यावरून यांतून हा कसलें महावस्त्र निर्माण करणार अशी आपल्याला शंका येते. परंतु तो जेव्हां त्या समांतर धाग्यांतून आडवे धागे टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हां त्यांतून हळूहळू सुंदर महावस्त्र तयार होत चालल्याचा प्रत्यय आपणांस येतो. समाजवाद आणण्यासाठी अशाच त-हेचा प्रयत्न हिंदुस्तानमध्यें करावा लागेल आणि तो सर्वांना करावा लागेल. आमची अशी इच्छा आहे कीं, तो समाजवाद लवकरांत लवकर यावा. परंतु त्याची कांहीं विशिष्ट प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेंतूनच आपल्याला जावें लागेल, ही गोष्ट आपण लक्षांत ठेविली पाहिजे, एवढेंच आज मला आपल्याला सांगावयाचें आहे.